अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजकीय नेते उपस्थित रहाणार असल्यामुळे साहित्यिक अप्रसन्न !

श्री. सचिन कौलकर, नाशिक

नाशिक – येथे ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे; मात्र संमेलनात मराठी साहित्यिकांऐवजी उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत राजकीय नेत्यांचीच अधिक उपस्थिती असण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे साहित्यिक अप्रसन्न आहेत.

१. संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘ऑनलाईन’ करणार असून संमेलनाच्या समारोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित असतील, तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हेही उपस्थित असणार आहेत.

२. ‘साहित्य महामंडळाने राजकीय व्यक्तींना साहित्य संमेलनात प्राधान्य द्यायचे नाही’, हे यापूर्वीच ठरवले आहे; मात्र तरीही नाशिक येथे राजकीय लोकांचाच भरणा अधिक असणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आहेत.

३. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ‘नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी राजकीय व्यक्तींना शक्यतो टाळा’, अशा सूचना करूनही निमंत्रकांनी पत्रिकेमध्ये राजकीय व्यक्तींची नावे घुसडली.

४. साहित्य संमेलनाचे उद्घाटन ३ डिसेंबर या दिवशी संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर, मावळते संमेलन अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रमुख पाहुणे गीतकार जावेद अख्तर आणि उद्घाटक साहित्यिक विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे; मात्र गीतकार जावेद अख्तर सतत हिंदुविरोधी भूमिका घेत असल्याने त्यांच्या नावाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आक्षेप आहे. तसेच ‘साहित्यिक विश्वास पाटील यांच्यावर आर्थिक अपव्यवहाराचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांना का बोलावले ?’, असाही साहित्यिकांना प्रश्न आहे.