नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पालकमंत्र्यांसह ६ आमदार ५५ लाख रुपये देणार !

नाशिक – येथे होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह ६ आमदार ५५ लाख रुपये देणार आहेत. साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा व्यय पुष्कळ आहे. त्यामुळे आमदारांनी विशेष गोष्ट म्हणून प्रत्येकी १० लाख रुपये द्यावेत, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, आमदार सीमा हिरे, पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे आणि सटाणा येथील आमदार डॉ. दिलीप बोरसे यांनी १० लाख रुपयांचा निधी देण्याचे संमतीपत्र जिल्हा नियोजन विभागास दिले आहे. सर्व आमदारांची पत्रे मिळाल्यानंतर एकत्रित प्रस्ताव मंत्रालयातील नियोजन विभागाला देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी दिली.

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमधील कविवर्य कुसुमाग्रज नगरी, मेट भुजबळ नॉलेज सिटी कॅम्पस्, आडगाव येथे ३ ते ५ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. स्वागताध्यक्ष नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन कादंबरीकार विश्वास पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. २ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ७ वाजता संमेलनस्थळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ डिसेंबर या दिवशी सायंकाळी स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे.