देवद आश्रमातील साधक श्री. कृष्णकुमार जामदार यांच्या जवळील परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे फिकट गुलाबी रंगाची होणे आणि त्यांत निर्गुण तत्त्व येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकात प्रसिद्ध झालेले परात्पर गुरु डॉक्टरांचे पूर्णाकृती छायाचित्र !

१ अ. ‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राचे कात्रण काढून ‘लॅमिनेशन’ करणे आणि ते देवघरात ठेवून त्याची पूजा करणे : ‘वर्ष २०११ मध्ये आम्ही कर्णावती (अहमदाबाद), गुजरात येथे रहात होतो. त्या वेळी प्रकाशित झालेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या एका अंकात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पूर्णाकृती छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. ‘ते पृथ्वीवर उभे आहेत आणि आकाशातून ५ देवता त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे ते छायाचित्र होते. मला हे छायाचित्र फार आवडले; म्हणून मी त्याचे कात्रण कापून ‘लॅमिनेशन’ करून घेतले आणि घरातील देवघरात ठेवून त्याची पूजा करणे चालू केले. नंतर मी देवद आश्रमात रहायला आलो. तेथे रहात्या खोलीत देवघर बनवून मी ते छायाचित्र ठेवले. मी प्रतिदिन त्याची पूजा करून प्रार्थना करतो.

श्री. कृष्णकुमार जामदार

१ आ. छायाचित्रातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा पांढरा सदरा फिकट गुलाबी होणे आणि त्यांच्या भोवतीच्या प्रभावळीत वाढ होणे : अलीकडच्या काळात ‘हे छायाचित्र फार बोलके झाले आहे’, असे मला वाटते. जणू ‘त्या छायाचित्रातून परात्पर गुरु डॉक्टर मला ‘काय म्हणते तुमची साधना ?’, असे म्हणत असल्याचे मला जाणवते. या छायाचित्रातील त्यांच्या मुखावरील भाव पाहून माझ्या मनाला स्वस्थता लाभते. त्यांचा पांढरा सदरा आता पूर्णपणे फिकट गुलाबी झाला आहे. त्यांच्या भोवती असलेल्या प्रभावळीतही वाढ झाली आहे. त्यांचे मस्तकापासून चरणांपर्यंतचे दर्शन घेतल्याने आणि त्यांना प्रार्थना केल्याने मला पुष्कळ चैतन्य मिळते अन् माझ्या डोळ्यांत भावाश्रू येतात.

२. निळी पार्श्वभूमी असलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे एक ‘लॅमिनेटेड’ छायाचित्र !

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे निळी पार्श्वभूमी असलेले एक ‘लॅमिनेटेड’ छायाचित्र नेहमी खिशात ठेवणे, प्रतिदिन छायाचित्राभोवती उदबत्ती ओवाळणे, हे छायाचित्र फिकट गुलाबी रंगाचे होणे : मी काही वर्षांपूर्वी निळी पार्श्वभूमी असलेले परात्पर गुरु डॉक्टरांचे एक ‘लॅमिनेटेड’ छायाचित्र विकत घेतले होते. तेव्हापासून ते सदैव माझ्या सदर्‍याच्या खिशात असते. मी प्रतिदिन या छायाचित्राला उदबत्तीने ओवाळतो. ते मला नित्य सेवा करण्यासाठी प्रेरणा आणि बळ देते. छायाचित्र विकत घेतले, तेव्हा ते व्यवस्थित रंगीत दिसत होते. मागील काही मासांपासून त्यातील रंगात पालट होऊन ते फिकट गुलाबी होत चालले आहे.

‘या दोन्ही छायाचित्रांमध्ये कशामुळे पालट होत आहेत ?’, याविषयी मी आश्रमातील काही साधक आणि संत यांना विचारले. तेव्हा त्यांनी मला सांगितले, ‘‘दोन्ही छायाचित्रांत निर्गुण तत्त्व आले आहे.’

– श्री. कृष्णकुमार जामदार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.३.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक