विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
मुंबई – महाराष्ट्र सरकारमधील विद्यमान मंत्री नवाब मलिक यांनी वर्ष १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांची भूमी २० लाख रुपयांमध्ये घेतली, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ९ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केला. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ‘याविषयीचे सर्व पुरावे केंद्रातील संबंधित अन्वेषण यंत्रणा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देणार आहे. हे अतिशय गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेले सूत्र असल्याचे नमूद करत बॉम्बस्फोटातील आरोपींनी नवाब मलिक यांना इतक्या स्वस्त दरात भूमी का विकली ?’ असा प्रश्न फडणवीस यांनी या वेळी उपस्थित केला.
LIVE | Media interaction in #Mumbai https://t.co/VvpeZTlHNw
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 9, 2021
फडणवीस पुढे म्हणाले,
१. सरदार शहावली खान हा मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो कारागृहात आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा कायम केली आहे. टायगर मेमन याच्या नेतृत्वाखालील गोळीबाराच्या प्रशिक्षणात तो सहभागी झाला होता. टायगर मेमनच्या घरी बॉम्बस्फोटाचे कारस्थान करण्यासाठी तो उपस्थित होता. टायगर मेमन याच्या घरी गाड्यांमध्ये त्यानेच ‘आर्डीएक्स’ भरले होते.
२. महंमद अली इशाक पटेल तथा सलीम पटेल हा दाऊद याची बहीण हसीना पारकर यांचा अंगरक्षक, वाहनचालक आणि मुख्य माणूस होता. हसीना पारकर हिला वर्ष २००७ मध्ये अटक झाली. त्या वेळी सलीम पटेल यालाही अटक झाली. सलीम पटेल भूमी लाटण्याच्या धंद्यातील सर्वांत प्रमुख व्यक्ती होती.
३. सलीम पटेल याने कुर्ला येथील २.८० एकर, म्हणजे १ लाख २३ सहस्र चौरस फूट लांबीची जागा मरियमबाई गोवावाला आणि मुदीरा प्लंबर या दोघांकडून घेतली. या जागेची विक्री करणारा सरदार शहावली खान आहे. पटेल आणि खान यांनी मिळून या भूमी विक्री ‘सॉलिड्स’ आस्थापनाला केली. वर्ष २०१९ मध्ये नवाब मलिक हेही या आस्थापनात होते. आजही नवाब मलिक यांचे कुटुंबीय या आस्थापनात आहेत.
४. या भूमीच्या खरेदीतील १५ लाख रुपये मालकाला न मिळता सलीम पटेल याच्या खात्यात जमा झाले. १० लाख रुपये शहावली खान याला मिळाले. वर्ष २००३ मध्ये हा व्यवहार झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते.
५. मुंबईत बॉम्बस्फोट करणार्यांकडून नवाब मलिक यांनी भूमी का खरेदी केली ? या आरोपींवर ‘टाडा’ कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या कायद्यानुसार आरोपींची सर्व मालमत्ता सरकार कह्यात घेते. यासाठी आरोपींची भूमी तुमच्याकडे देण्यात आली का ? हा थेट गुन्हेगार जगताशी संबंध दिसत आहे.
६. अशा एकूण ५ मालमत्ता आहेत. त्यांपैकी ४ मालमत्तांच्या व्यवहारांमध्ये १०० टक्के गुन्हेगार जगताचा संबंध आहे.
मला आता हा प्रकार कळल्याने मी तो उघड केला ! – फडणवीस
‘तुम्ही गृहमंत्री असतांना हा प्रकार का उघड केला नाही ?’ या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, ‘वर्ष २००५ पासून जे गृहमंत्री झाले, त्यांनी हा प्रकार का उघड केला नाही ? मला आता हा प्रकार कळला. त्यानंतर मी तो उघड केला’, असे देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.