पटकथा वाचल्यानंतरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला राज्यात अनुमती देणार ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

‘आश्रम-३’ वेब सिरीजच्या चित्रीकरण स्थळाची तोडफोड करण्यात आल्याचे प्रकरण

मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांचा अभिनंदनीय निर्णय ! असे असले, तरी चित्रपटाचे परीनिरीक्षण करतांना केंद्रीय परीनिरीक्षण मंडळाला (सेन्सॉर बोर्डाला) हिंदु धर्माचा अवमान करणारे प्रसंग, वाक्य, गाणी, संगीत आदी कसे दिसत नाही, हाही प्रश्न उपस्थित होतोच !

मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

भोपाळ (मध्यप्रदेश) – बहुसंख्य समाजाची भावना लक्षात घेता दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ‘आश्रम’ वेब सिरीजचे नाव पालटण्याच्या मागणीचा विचार करायला हवा. तोडफोड चुकीची असून त्यावर कारवाई चालू आहे; मात्र वेब सिरीजला ‘आश्रम’ हे नाव का देण्यात आले ? हे प्रकरण लक्षात घेता यापुढे राज्य सरकारकडून एक वेगळा विभाग बनवला जाईल. आता कोणताही चित्रपट बनवला जाण्यापूर्वीच हा विभाग त्याची पटकथा वाचणार. त्यानंतरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला राज्यात अनुमती देणार. त्यासह धर्माला चुकीच्या पद्धतीने दाखवणारी छायाचित्रे, दृश्ये, व्हिडिओ हटवल्यानंतरच राज्यात संबंधित चित्रपट बनवण्याची आणि प्रदर्शित करण्याची अनुमती दिली जाईल, अशी माहिती मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली.

भोपाळ येथे २४ ऑक्टोबर या दिवशी प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम-३’ या वेब सिरीजच्या चित्रीकरण स्थळावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करत झा यांच्यावर शाई फेकली होती. या वेब सिरीजमधून हिंदु धर्माचा अवमान होत असल्याने ही तोडफोड करण्यात आल्याचे बजरंग दलाने म्हटले होते. यावर गृहमंत्री मिश्रा यांनी वरील माहिती दिली. या वेब सिरीजमध्ये भोंदू बाबा वाईट कृत्ये करतांना दाखवण्यात आले आहे.

नरोत्तम मिश्रा यांनी ‘डाबर’ या आस्थापनाने ‘करवा चौथ’च्या (उत्तर भारतात सुवासिनी करत असलेल्या धार्मिक विधीच्या) निमित्ताने समलैंगिक जोडप्यांवर आधारित काढलेल्या विज्ञापनावर बोलतांना म्हटले की, नेहमीच हिंदु धर्माच्या सणांच्या वेळी अशी विज्ञापने का प्रसारित केली जातात ? आज ते समलैंगिक जोडप्यांना करवा चौथ करतांना दाखवत आहेत. उद्या समलैंगिक मुलांना विवाहाची विधी करतांना दाखवतील. ‘डाबर’च्या विज्ञापनाविषयी पोलीस महासंचालकांना कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.