जनता आणि शेतकरी यांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारने क्षमा मागावी ! – सदाभाऊ खोत, आमदार, भाजप

मध्यभागी सदाभाऊ खोत

सांगली – महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील सहस्रो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे. शेतकर्‍यांची दिवाळी काळी करण्यास सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने आणि घोषणा यांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणार्‍या सरकारने जनता अन् शेतकरी यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी क्षमा मागावी, अशी मागणी भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी २५ ऑक्टोबर या दिवशी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. या वेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, प्रदेश चिटणीस पृथ्वीराज पवार, सांगली जिल्हा सरचिटणीस केदार खाडिलकर उपस्थित होते.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील ५५ लाख हेक्टरहून अधिक भूमीवरील पिकांची अतीवृष्टीमुळे हानी झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात १०० लाख हेक्टरहून अधिक भूमीवरील पिके पूर्ण नष्ट झाल्याची आकडेवारी आहे. पुरामुळे शेतभूमी नापीक झाल्या आहेत. भूमीचा कस संपल्यामुळे पुढील १० वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नाही आणि सरकार केवळ हेक्टरी १० सहस्र रुपयांची घोषणा करत आहे. घोषित केलेल्या साहाय्यापैकी एक रुपयाही अद्याप शेतकर्‍यांपर्यंत पोचला नाही. सरकारी अधिकारी अणि दलाल यांनी संगनमत करून राज्यातील शेतकर्‍यांची फसवणूक चालवली आहे.’’