गोव्यात वर्ष २०१६ पासून महिलांवर बलात्कार केल्याची एकूण ३८७ प्रकरणे नोंद

आतापर्यंत केवळ ९ घटनांमध्ये आरोपी दोषी

  • केवळ २.३ टक्के घटनांतील आरोपींना शिक्षा होणे हे अन्वेषणाचे अपयश समजायचे कि कायदे कमकुवत आहेत ? – संपादक
  • ही स्थिती देशातील बलात्कारांच्या घटना रोखू शकणार नाही आणि पीडितांनाही न्याय मिळणार नाही ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २० ऑक्टोबर (वार्ता.) – गोव्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये बलात्काराच्या घटना सर्वाधिक घडलेल्या आहेत. गोवा विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार गोव्यात जानेवारी २०१६ पासून बलात्काराच्या ३८७ घटनांची नोंद झाली आहे. वर्ष २०१६ पासून प्रतिवर्ष महिलांवर बलात्कार केल्याची किमान ६० प्रकरणे नोंद झाली आहेत. चालू वर्षी ३० सप्टेंबरपर्यंत बलात्काराच्या ५४ घटनांची नोंद झालेली आहे. यामध्ये पर्वरी पोलीस ठाण्यांमध्ये ९, म्हापसा पोलीस ठाण्यात ८ आणि मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात ५ प्रकरणे यांचा समावेश आहे. उर्वरित प्रकरणे अन्य पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातील आहेत.

वर्ष २०१६ पासून नोंद झालेल्या ३८७ प्रकरणांमधील बहुतांश प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत आणि यामध्ये ५ ते ६ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचाही समावेश आहे. आतापर्यंत केवळ ९ घटनांमध्ये आरोपी दोषी सिद्ध झालेला आहे, तर अनेक प्रकरणांचे अन्वेषण विविध कारणांमुळे बंद करण्यात आलेले आहे. महिलांवरील अत्याचारामध्ये बलात्कारापाठोपाठ अपहरणाची प्रकरणे सर्वाधिक आहेत. राज्यात जानेवारी २०१६ पासून अपहरणाची २३८ प्रकरणे नोंद झाली आहेत. त्याखालोखाल महिलांना वेश्याव्यवसायात ढकलण्याच्या घटना घडल्या आहेत. वर्ष २०१६ पासून अपहरणाची एकूण १९३ प्रकरणे नोंद झालेली आहेत. कोरोना महामारीच्या काळात अपहरणाची प्रकरणे उणावली आहेत. जानेवारी २०१६ ते सप्टेंबर २०२१ या काळात प्रत्येक मासाला एका महिलेचा खून झालेला आहे. ६ वर्षांच्या या काळात खुनाची एकूण ६८ प्रकरणे नोंद झाली आहेत. (गोव्यासारख्या साक्षरतेचे प्रमाण अधिक असणार्‍या आणि छोट्या राज्यात बलात्कार, अपहरण, वेश्याव्यवसाय आणि खून यांच्या घटनांची संख्या पहाता अन्य राज्यांत काय स्थिती असेल, याचा विचारच नको ! – संपादक)