सौ. सिद्धी सहारे यांना स्वतःच्या विवाहाच्या वेळी आणि विवाहानंतर आलेल्या अनुभूती अन् यजमान श्री. सचिन सहारे यांच्यातील ‘भाव आणि तळमळ’ या गुणांचे झालेले दर्शन !

नागपूर येथील साधिका सौ. सिद्धी सहारे यांना स्वतःच्या विवाहाच्या वेळी आणि विवाहानंतर आलेल्या अनुभूती अन् यजमान श्री. सचिन सहारे यांच्यातील ‘भाव आणि तळमळ’ या गुणांचे झालेले दर्शन !

श्री. सचिन सहारे

१. विवाहापूर्वी साधिकेला मानसिक ताण येणे आणि साधकांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे लग्नाच्या आदल्या दिवशी तो ताण नाहीसा होणे

‘प.पू. गुरुमाऊली, आपल्याच कृपाशीर्वादाने २७.११.२०२० या दिवशी माझा विवाह नागपूर येथील श्री. सचिन सहारे यांच्याशी झाला. लग्नाच्या आधी १५ दिवसांपासून मला मानसिक ताण जाणवत होता. ‘मला नवीन घरी व्यवस्थित जुळवून घेता येईल कि नाही?’, अशी शंका माझ्या मनात होती; पण वेळोवेळी मला व्यष्टी साधनेचा आढावा घेणारे साधक आणि सहसाधक यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे लग्नाच्या आदल्या दिवशी माझ्या मनावर असलेला ताण पूर्णपणे नाहीसा झाला.

२. विवाहाच्या दिवशी साधिकेला श्रीकृष्णाचे स्मरण होऊन गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे आणि ‘लग्नसमारंभ प्रत्यक्ष रामनाथी आश्रमात होत आहे’, अशी अनुभूती येणे

आमच्या लग्नाच्या दिवशी मी माझे अस्तित्वच विसरले होते. प्रत्येक क्षणी मला श्रीकृष्णाचे स्मरण होत होते. प.पू. गुरुदेव, त्या दिवशी मला तुमचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाही, तरी तुमचे अस्तित्व मला जाणवत होते आणि ‘लग्नसमारंभ प्रत्यक्ष रामनाथी आश्रमात होत आहे’, अशी मला अनुभूती येत होती. माझी ही भावस्थिती २ दिवस टिकून होती.

सौ. सिद्धी सहारे

३. यजमान श्री. सचिन सहारे यांच्यामध्ये असलेले साधकत्व

३ अ. आर्थिक पाठबळ नसतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि देवी अष्टभुजा यांच्या कृपेने लग्न सुरळीत पार पडले’, असा साधिकेच्या यजमानांचा भाव असणे : माझे यजमान श्री. सचिन हे कुटुंबात एकटेच कमावणारे असल्याने त्यांना कोणतेही आर्थिक पाठबळ नव्हते. विवाहाच्या सिद्धतेला आरंभ केल्यावर त्यांना वेळोवेळी कामाचे पैसे मिळत गेले आणि कुणाकडे आर्थिक साहाय्य मागायची वेळ देवाने त्यांच्यावर येऊ दिली नाही. श्री. सचिन म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर आणि देवी अष्टभुजा यांच्या कृपेनेच सगळे सुरळीत पार पडले.’’ सासरच्या व्यक्तींनीही मला व्यवस्थित सांभाळून घेतले.

३ आ. यजमानांनी स्वतः नामजप करण्यास आरंभ करणे आणि नातेवाइकांनाही नामजपाचे महत्त्व सांगणे : श्री. सचिन यांना कुलदेवता आणि दत्तगुरु यांच्या नामजपाचे महत्त्व कळल्यावर त्यांनी नामजपाला आरंभ केला. पितृपक्षात त्यांनी त्यांच्या नातेवाइकांच्या घरी जाऊन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप का आणि कसा करावा ?’, याचे महत्त्व सांगितले. ‘ते सर्वजण नामजप करत आहेत ना ?’, याचा पाठपुरावाही सचिन घेत होते. त्यांनी सगळ्या नातेवाइकांच्या घरी जाऊन त्यांना देवतांच्या नामपट्ट्या दिल्या. नातेवाइकांच्या घरांत पूर्वजांची छायाचित्रे दिसल्यास सचिन यांनी त्या छायाचित्रांना दत्ताची नामपट्टी लावायला सांगितली.

सचिन यांचा भाव आणि तळमळ पाहून मला वाटले, ‘सनातन संस्थेच्या माध्यमातून मी साधना करते’, याचाच मला अहं झाला आहे.’

प्रार्थना

‘प.पू. गुरुमाऊली, ‘माझ्यातील हा अहं नष्ट होऊन मलाही भावस्थितीत रहाता येऊ दे, आम्हा दोघांमध्ये आध्यात्मिक नाते निर्माण होऊन एकमेकांच्या साहाय्याने आम्हाला साधनेत पुढे जाता येऊ दे’, अशी मी आपल्या चरणी संपूर्ण शरणागतीने प्रार्थना करते.’

– आपली कृपाभिलाषी,

सौ. सिद्धी सचिन सहारे (पूर्वाश्रमीची कु. रेणुका संजीव हरदास), नागपूर (३०.१२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक