५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. राधिका महेश घोळे (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र  (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. राधिका महेश घोळे ही एक आहे !

(‘वर्ष २०१८ मध्ये कु. राधिकाची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)

चि. राधिका घोळे

कु. राधिका महेश घोळे हिच्याविषयी तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. समजूतदारपणा

अ. ‘राधिका वयाच्या मानाने समजूतदार आहे. एखादी कृती न करण्यामागचे कारण समजून सांगितल्यावर ती ते लगेच स्वीकारते. ती दीड वर्षाची असतांना इतर मुलांचे पाहून कुरकुरे, चिप्स इत्यादी विकत घेण्यासाठी हट्ट करायची; परंतु ‘ते का खाऊ नये ?’, हे तिला समजावून सांगितल्यावर तिने पुन्हा ते घेण्यासाठी हट्ट केला नाही.

आ. दळणवळण बंदीमुळे बाहेर का जाऊ नये ?’, हे सांगितल्यावर तिने बाहेर जाण्याचा हट्ट केला नाही.

२. प्रेमभाव

सौ. योगेश्री घोळे

अ. काही व्यक्तींचा तिच्याशी अनेक मास संपर्क येत नाही, तरीही ती खेळण्यातील भ्रमणभाषवर त्यांच्याशी बोलते.

आ. ‘दळणवळण बंदीमुळे तिची आजी (बाबांची आई) शेतातल्या घरी असते; पण घरी खेळण्यातला स्वयंपाक करतांना ती आजीसाठीही आठवणीने पदार्थ काढून ठेवते.

. पावसाळ्यात मला दम्याचा पुष्कळ त्रास होत होता. त्या वेळी खोकला आला की, जवळ ठेवलेली खडीसाखर, लवंग किंवा गूळ-पाणी ती लगेच मला द्यायची. तेव्हा ती माझ्या पाठीवरून हात फिरवत ‘बाप्पा आहे ना !’, असे मला सांगायची.’

– सौ. योगेश्री घोळे (आई), पुणे

ई. ‘ती दीड वर्षाची असतांना एकदा नागपूरला रहायला आली होती. त्या वेळी तिचे आजोबा (श्री. श्रीकांत पाध्ये  (आईचे वडील)) चालतांना पडले होते. त्यामुळे त्यांना चालता येत नव्हते. तेव्हा त्यांना आतल्या खोलीत घेऊन जाण्याविषयी सांगितल्यावर ती प्रेमाने आणि हळुवारपणे त्यांचे बोट धरून त्यांना आतल्या खोलीत घेऊन जात असे.’

– सौ. अंजली पाध्ये (चि. राधिकाची आजी (आईची आई)), नागपूर

उ. ‘तिला मिळालेला खाऊ ती सगळ्यांना देते.

३. प्राण्यांविषयीचे प्रेम

ती ‘शेतातील कुत्रे आणि मांजरी यांना बिस्किटे अन् पाणी देणे, गायींना चारा खायला देणे’, या कृती आनंदाने करते.

४. इतरांचे कौतुक करणे

केलेला कोणताही पदार्थ ‘छान झाला आणि मला आवडला’, असे सांगून ती लगेच धन्यवाद म्हणते.

५. देवाला आणि मोठ्या माणसांना नमस्कार करणे

प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी देवापाशी दिवा लावल्यावर ती देव, परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र, तुळस आणि घरातील मोठी माणसे यांना आनंदाने नमस्कार करते. एकदा माझ्या (सौ. योगेश्री यांच्या) आई-वडिलांचा व्हिडिओ कॉल चालू होता. त्या वेळी तिने भ्रमणभाषच्या समोर येऊन त्यांना खाली वाकून नमस्कार केला.

६. देवाची आवड

अ. रात्री झोपतांना ती माझ्या समवेत प्रार्थना करते. माझ्या लक्षात राहिले नसेल, तर ती मला आठवणही करून देते.

आ. ती तिला शिकवलेले छोटे श्लोक पाठ करून म्हणून दाखवते.

इ. पूर्वी तिला श्रीकृष्णाचा पाळणा ऐकून झोपण्याची सवय होती; मात्र आता झोपतांना ती ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’मधून तिचा आवडता श्री दुर्गादेवीचा नामजप लावते.

(प्रश्न : तिने लहानपणापासून श्रीकृष्ण, श्रीराम आणि दत्त या देवतांचा नामजप ऐकला आहे; पण सध्या ‘ती मला श्री दुर्गादेवीचाच नामजप पुष्कळ आवडतो’, असे म्हणून प्रतिदिन तो नामजप लावते.  तिने अकस्मात् असे का केले ?

उत्तर : काळाप्रमाणे हे झाले आहे.)

७. नियमित उपाय करणे

श्री. महेश घोळे

ती स्वतः नियमित कापूर आणि विभूती लावते अन् इतरांनाही लावते. ती उदबत्ती किंवा मोरपीस यांनी आवरण काढते.’

– श्री. महेश रघुनाथ घोळे (वडील) आणि सौ. योगेश्री महेश घोळे (आई), उरुळीकांचन, पुणे.

८. आध्यात्मिक पातळी चांगली असलेल्या साधकांच्या समवेत आनंदी असणे

अ. ‘एकदा माझ्या माहेरी साधक श्री. आणि सौ. पागनीस आले होते. पागनीसकाकूंची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आहे. तिने काकूंना मुख्य दारातून आत येतांना पहाताच तिला पुष्कळ आनंद झाला. प्रत्यक्षात पागनीसकाकूंना तिने प्रथमच पाहिले होते. काकू घरात आल्यावर ती त्यांना तिची खेळणी उत्साहाने दाखवत होती. काकू घरी असेपर्यंत ती त्यांच्याशीच खेळत होती. हे बघून आम्हाला सर्वांनाच आश्चर्य वाटले.

आ. माझ्या धाकट्या बहिणीचा मुलगा चि. आदिनाथ देशपांडे (वय ५ वर्षे) याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे. चि. आदिनाथला भेटल्यावर राधिका त्याच्याशी पुष्कळ छान खेळते. त्याच्या समवेत राहून तिच्यामध्ये ‘कार्यक्षम रहाणे, कृतींमधील आणि बोलण्यातील मोकळेपणा वाढणे’, असे पालट झाले आहेत’, असे जाणवले.

९. परात्पर गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्याप्रतीचा भाव

अ. एका साधिकेच्या घरी गेल्यावर तेथे असलेले परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र पाहून तिला पुष्कळ आनंद झाला. ‘हे आबा आपल्याकडेपण आहेत ना ?’, असे सांगून ‘हे आबा भूतबाबाला (अनिष्ट शक्तींना) फटके देतात’, असेही ती म्हणाली.

आ. एकदा दुपारी ती म्हणाली, ‘‘आई, लवकर चल. समोरच्या खोलीत श्रीकृष्णबाप्पाचा वाढदिवस आहे.’’ मी तिच्यासह तेथे गेल्यावर तिला विचारले, ‘‘बाप्पा कुठे आहे ?’’ त्यावर तिने एका चौरंगाकडे बोट करून त्यावर बाप्पा बसला असल्याचे सांगितले. तिचे बोलणे ऐकताच माझ्या अंगावर शहारे आले आणि माझी भावजागृती झाली. त्यानंतर तिने श्रीकृष्णाला ओवाळले.

इ. अनेक वेळा ती खेळतांना मला सांगते, ‘‘मी आता आबांकडे (परात्पर गुरुदेवांकडे) चालले आहे. त्यांचा वाढदिवस आहे ना !’’

१०. प.पू. गुरुदेवांवरील श्रद्धा

रात्री झोपतांना तिला वेगवेगळ्या गोष्टी ऐकायची सवय आहे. एक गोष्ट तिला पुष्कळ आवडली. ती काही दिवस सतत ती गोष्ट सांगायला सांगत असे. त्या गोष्टीतील ‘घनदाट जंगलातून मोहन नावाच्या मुलाला गोपाळ नावाचा मुलगा घरी आणून सोडायचा’, हे तिच्या लक्षात राहिले. (त्या गोष्टीत ‘श्रीकृष्ण गोपाळ नावाच्या मुलाचे रूप घेऊन यायचा’, असा उल्लेख आहे.) ते ऐकल्यापासून ती गळ्यातील श्रीकृष्णाच्या पदकाला हात लावून आत्मविश्वासाने मला सांगते, ‘‘आई, तू काम करून ये. मी एकटी घरात थांबते. मी घाबरणार नाही. गोपाळदादा (श्रीकृष्ण) आहे ना माझ्याजवळ ? आबाही (प.पू. गुरुदेव) माझ्या समवेत आहेत.’’ हे ऐकून माझा भाव जागृत होतो आणि मला कृतज्ञता वाटते.

११. स्वभावदोष

‘हट्टीपणा’ हा तिच्यातील तीव्र स्वभावदोष आहे. ‘या स्वभावदोषामुळे तिचा त्रास वाढतो’, असे मला वाटते. ‘तिचा त्रास पौर्णिमा आणि अमावास्या या कालावधीत उफाळून येतो’, असे लक्षात येते. त्या वेळी ती संपूर्ण दिवस चिडचिड करते. त्यामुळे मीही पुष्कळ त्रस्त होते.’ – सौ. योगेश्री महेश घोळे

‘हे श्रीकृष्णा, राधिकाच्या माध्यमातून तुमच्या अस्तित्वाची जाणीव तुम्ही आम्हाला करून दिली. याबद्दलची कृतज्ञता या लिखाणाच्या माध्यमातून तुमच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आमच्यावर आपली अखंड कृपा राहो’, हीच आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’ – श्री. महेश रघुनाथ घोळे आणि सौ. योगेश्री महेश घोळे, पुणे (मे २०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता