बंगालमध्ये भाजपचे खासदार दिलीप घोष यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमण !

  • गुंड कार्यकर्त्यांचा भरणा असलेला सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्ष राज्य करण्याच्या पात्रतेचा आहे का ? – संपादक 
  • असा पक्ष हा लोकशाहीला लागलेला कलंक आहे. अशा पक्षांवर बंदीच हवी ! – संपादक 
  • ज्या राज्यात भाजपचे खासदार सुरक्षित नाहीत, त्या राज्यात सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल, याचा विचारही न केलेला बरा ! – संपादक

कोलकाता – बंगाल राज्यातील भवानीपूर येथे ३० सप्टेंबरला होणार्‍या पोटनिवडणुकीच्या वेळी तेथे प्रचारासाठी गेलेले भाजपचे खासदार दिलीप घोष यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले. घोष यांची पदयात्रा चालू होती. त्या वेळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे आक्रमण केले. या वेळी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. घोष यांच्यावर आक्रमण झाल्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी त्यांच्या सुरक्षारक्षकांनी जमावावर बंदुका रोखल्या.

घोष यांची पदयात्रा चालू असतांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या आणि घोष यांना माघारी जाण्यास सांगितले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच घोष तेथून निघून जात असतांना त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले. तृणमूल काँग्रेसने केलेल्या आक्रमणात घोष यांच्या समवेत असलेले भव नारायण सिंह यांच्यावरही तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण केले.

भवानीपूर येथे होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत, तर भाजपने अधिवक्त्या प्रियांका तिब्रेवाल यांना उमेदवारी दिली आहे.  बंगालमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी नंदीग्राम येथून निवडणूक लढवली होती; मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे भवानीपूर येथून निवडून आलेल्या तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने आमदारकीचे त्यागपत्र दिले. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे. आमदार म्हणून निवडून येण्यासाठी आणि स्वतःची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची टिकवण्यासाठी ममता बॅनर्जी यांना ही निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे ही निवडणूक तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांनी प्रतिष्ठेची बनवली आहे.