किल्ले अजिंक्यतारा येथे ‘रोप वे’साठी प्रयत्न करणार ! – श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार, भाजप

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा, २४ सप्टेंबर (वार्ता.) – सातारा जिल्ह्यात अनेक गडकोट आहेत. नागरिकांनी येथे येऊन आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे. किल्ले अजिंक्यतारा हे सातारा शहराचे सौंदर्य आहे. त्यामुळे येथे पर्यटनवृद्धीसाठी ‘रोप वे’ झालाच पाहिजे. सातारावासियांनाही ‘रोप वे’मध्ये बसायला मिळाले पाहिजे. यासाठी किल्ले अजिंक्यतारा येथे ‘रोप वे’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली. खासदार भोसले पुढे म्हणाले, ‘‘मी मुंबई येथे नुकतीच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. तेव्हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, कास, किल्ले अजिंक्यतारा येथील पर्यटनवृद्धीविषयी चर्चा झाली. नवरात्रीनंतर आदित्य ठाकरे यांना सातारा दौर्‍याचे निमंत्रण दिले आहे. किल्ले अजिंक्यतारा येथे ‘रोप वे’ झाल्यास सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाईल, तसेच सातारा नगरपालिकेच्या तिजोरीतही भर पडेल.’’