उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अनय मोहन घाटगे एक आहे !
अनय : अनय हे श्री विष्णूचे एक नाव आहे. – संकलक
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२७.८.२०२१) या दिवशी चि. अनय मोहन घाटगे याचा पाचवा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याची आई आणि त्याचे नातेवाईक यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
१. गर्भारपण
१ अ. स्तोत्रपठण, नामजप, तसेच ग्रंथवाचन करणे : ‘अनय पोटात असतांना मला शांत वाटत होते. मी हरिपाठ, रामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र म्हणत असे, तसेच दासबोध आणि गर्भसंस्कारांविषयीचा ग्रंथ वाचत होते. मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हे नामजपही करायचे. त्रास होत असतांना नामजप केल्यावर माझा त्रास न्यून होत असे.’
– सौ. सुषमा मोहन घाटगे (चि. अनयची आई), कोल्हापूर (२४.११.२०१९)
१ आ. मुलीला (अनयच्या आईला) लाभलेला सत्संग आणि संतांचा आशीर्वाद ! : ‘मुलीने ‘वडवानलस्तोत्र’ आणि सनातनचा ‘आपले बाळ जन्मापूर्वी’ हा ग्रंथ वाचला होता. एकदा ती सांगवडेकर महाराज यांच्या आश्रमात त्यांच्या दर्शनासाठी गेली होती. एकदा आमच्या घरी मथुरा येथील ‘योगेश्वर आश्रमा’तील एक संत आले होते. त्यांनी मुलीला ‘‘बेटी, तुझे लडका ही होगा । मेरा आशीर्वाद सदा तुम्हारे साथ रहेगा, चिंता मत करो ।’’, असा आशीर्वाद दिला होता.’
– श्रीमती उषा जाधव (अनयची आजी), कोल्हापूर (२४.११.२०१९)
२. जन्मानंतर
२ अ. जन्म ते ६ मास
२ अ १. शांत स्वभाव : ‘बाळाच्या जन्मानंतर मला हलके वाटत होते. बाळाने मला कधीही दमवले नाही, तर तो शांत झोपायचा. तो ३ मास पूर्ण झाल्यानंतर हात जोडून नमस्कार करायचा.’
– सौ. सुषमा मोहन घाटगे (अनयची आई)
२ अ २. सहनशील
अ. ‘बाराव्या दिवशी बाळाचे कान टोचले, तरी तो रडला नाही किंवा त्याने कोणाला कसलाही त्रास दिला नाही. ते पाहून कान टोचणारे सोनार म्हणाले, ‘‘लहान मुलांचे कान टोचणे कठीण असते; पण याने कसलाही त्रास दिला नाही.’’ – श्रीमती उषा जाधव (अनयची आजी)
आ. ‘लसीकरण करतांना अनय शांत रहात असे. त्याने एकाही लसीकरणाच्या वेळी आम्हाला त्रास दिला नाही.
२ अ ३. सात्त्विकतेची आवड
अ. अनय ४ मासांचा असतांना ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हटल्यावर टाळ्या वाजवत असे.
आ. आम्ही त्याला पैजारवाडी येथील प.पू. चिले महाराज यांच्या समाधीचे दर्शन करण्यासाठी घेऊन गेलो होतो. तेव्हा त्याने महाराजांच्या प्रतिमेकडे बोट करून ‘बाबा’, असे म्हटले.
इ. तो ४ मासांचा असतांना त्याला हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या बालकक्षात झाशीच्या राणीचे बाळ केले होते. तेव्हा पूर्णवेळ तो शांत होता. सभा संपेपर्यंत त्याने कुठलाही त्रास दिला नाही.
ई. त्याला स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेच्या सत्संगाला घेऊन गेले, तर तो सत्संग संपेपर्यंत खेळत असे.
उ. अनयला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव विशेषांक दाखवला असता त्याने अंक पकडून परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राची पापी घेतली आणि अंक हृदयाजवळ गच्च पकडून ठेवला.
२ आ. वय – ६ ते ९ मास
१. अनय ९ मासांचा असतांना माझी आई (श्रीमती उषा जाधव) सकाळी कार्यालयात जाण्यास निघाली, तर अनय अकस्मात रडू लागला; म्हणून आईने त्या दिवशी सुट्टी घेतली. त्याच दिवशी आमच्या घरी चोर आला होता. आई घरी होती; म्हणून त्या चोराला पकडता आले आणि आमची होणारी हानी टळली.
२. अनय सकाळी ६ वाजता उठून ‘बाप्पाला जाऊया’, असे म्हणायचा. मंदिरात गेल्यावर आरती आणि पूजा होईपर्यंत शांत बसायचा.
२ इ. वय – १ ते २ वर्षे
१. चालायला लागल्यावर अनय सतत देवघरात जात असे. सर्व देवतांना कुंकू लावल्यावर तो घरातील सर्वांना कुंकू लावण्याचा आग्रह करत असे.
२. सकाळी पूजा करतांना अनय मांडीवर येऊन बसायचा आणि आरती करतांना टाळ वाजवायचा.
३. एकदा मी त्याला कोल्हापूरच्या सेवाकेंद्रात घेऊन गेले होते. तेथे त्याने सर्वांना नमस्कार केला आणि नंतर खेळू लागला. काही वेळानंतर त्याला ‘घरी जाऊया’, असे म्हटल्यावर ‘घरी जायला नको, मी इथेच रहाणार आहे’, असे त्याने सांगितले.
४. तो प्रतिदिन रात्री झोपतांना ‘नामजप लाव’, असे सांगतो. तो सव्वा वर्षाचा झाल्यापासून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करतो आणि इतरांनाही करायला सांगतो.
५. त्याला कुणाचेही नाव सांगितले, तरी तो ते लगेच लक्षात ठेवतो. तो दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सद्गुरु स्वातीताई, सद्गुरु अनुराधाताई आणि परात्पर गुरु डॉक्टर यांची छायाचित्रे दाखवतो अन् त्यांची नावे सांगतो, तसेच देवतांची चित्रे ओळखून त्यांचेही नाव सांगतो.’
– वैद्या (कु.) सुजाता जाधव (अनयची मावशी), कोल्हापूर
६. ‘अनयला लहानपणापासून देवाप्रती ओढ आहे. तो सकाळी लवकर उठतो आणि आमच्या घराशेजारी असलेल्या शिवाच्या आणि स्वामी समर्थांच्या मंदिरात आम्हाला घेऊन जातो. तो व्यवस्थित दर्शन घेतो आणि त्या त्या देवतेचा नामजपही करतो. मंदिरात तो पुष्कळ आनंदी असतो आणि सर्वांच्या पुढे उभे राहून आरती करतो. त्याला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जायलाही पुष्कळ आवडते. तो मंदिरात गेल्यानंतर आवडीने तीर्थप्रसाद मागून घेतो. एखाद्या मंदिरात रांगोळी काढली नसल्यास तो ती काढायला सांगतो आणि रांगोळी पूर्ण होईपर्यंत तेथेच थांबतो.
७. आम्ही एकदा तुळजापूरला गेलो होतो. तेथे तो श्री. अमितदादांची (मंदिरातील साधक-पुरोहित श्री. अमित कदम यांची) जपमाळ सारखी घेत होता. तेव्हा अमितदादा म्हणाले, ‘‘या माळेचा भवानीमातेच्या मूर्तीला सतत स्पर्श होतो; म्हणून तो ती घेत आहे.’’
८. त्याला देवतांच्या मूर्ती, सनातन पंचांगातील सात्त्विक छायाचित्रे पहायला आवडतात.
९. आमच्या दारात मधुमालतीचा वेल आहे. अनय त्याची फुले तोडतो आणि माझ्याकडून त्या फुलांची वेणी बनवून घेतो अन् श्रीकृष्णाला घालायला सांगतो.
१०. त्याला सात्त्विक पदार्थ आवडतात.
२ ई. वय – २ ते ३ वर्षे
१. अनय सर्व नातेवाईकांची आठवण काढतो आणि मला त्यांना भ्रमणभाष करण्यास सांगतो. तो सर्वांची आस्थेने विचारपूस करतो.
२. अनयला चालायला पुष्कळ आवडते. मी त्याला कधी उचलून घेतले, तर ‘आजी, मी चालतो, तुझे हात दुखतील ना’, असे म्हणून तो माझा विचार करतो.
३. अनयकडे सर्वजण आकर्षित होतात आणि तो कुणाकडेही जातो.
४. आम्ही एकदा कोल्हापूर येथील सेवाकेंद्रात श्री. गोरेकाका-काकू (६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य(डॉ.) शिवदान गोरे आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उमा गोरे) यांना भेटायला गेलो होतो. तेव्हा तो आईला म्हणाला, ‘‘आपण येथेच राहूया.’’ तो गोरेकाका-काकूंना म्हणाला, ‘‘मी रामनाथीला प.पू. डॉक्टरांना भेटायला जाणार आहे.’’
५. त्याला नामजप करण्याची आवड आहे आणि तो ‘श्री गुरुदेव दत्त’ आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हे नामजप करतो.
३. चि. अनयचे स्वभावदोष
हट्टीपणा करणे.
– श्रीमती उषा जाधव (अनयची आजी), उंचगाव, कोल्हापूर (२४.११.२०१९)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता |