‘नेट पॅक रिचार्ज’साठी पैसे नसल्याने सातार्‍यात दीड सहस्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सातारा, ७ ऑगस्ट (वार्ता.) – ‘ऑनलाईन’ शाळा चालू ठेवण्यासाठी ‘नेट पॅक’ आवश्यक आहे; परंतु पैशांअभावी सर्वांना प्रतिमास ‘नेट पॅक रिचार्ज’ करणे शक्य नाही. यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने ‘नेट पॅक’ योजना चालू केली आहे. याच धर्तीवर सातारा नगरपालिकेनेही ‘नेट पॅक’ योजना चालू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे; मात्र ‘अंदाजपत्रकात याविषयी तरतूद नसून वसुलीअभावी ही योजना राबवता येणार नाही’, असे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सातारा नगरपालिकेच्या १८ शाळांतील १ सहस्र ५०० विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात दिसत आहे.

मुंबई महानगरपालिकेने तिच्या शाळांतील विद्यार्थ्यांना ‘नेट पॅक’साठी ६ मास १ सहस्र रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई एवढी सातारा नगरपालिका मोठी नसली, तरी पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे दायित्व सातारा नगरपालिकेचेच आहे. पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक गरीब असून मोलमजुरी करून पोट भरतात. कोरोनामुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम झाला असून दोन वेळचे पोटभर अन्नही मिळेनासे झाले आहे, तर भ्रमणभाष आणि ‘नेट पॅक’ कोठून आणणार ?, असा प्रश्न पालकांसमोर आहे.

याविषयी सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे म्हणाले की, सातारा नगरपालिकेच्या वतीने नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विनामूल्य गणवेश आणि शालेय साहित्य पुरवले जाते; परंतु कोरोनामुळे पालिकेचीही काही विशेष वसुली न झाल्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे.