सातारा, ७ ऑगस्ट (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग अद्याप अल्प झालेला नाही. तोपर्यंत शहरामध्ये हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये नागरिक तपासणीसाठी येत आहेत. त्यातच डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांनीही डोके वर काढले आहे. याविषयी आरोग्य विभागाच्या वतीने शहरामध्ये जनजागृती करण्यात येत आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळणार्या भागांची पहाणी हिवताप अधिकारी अश्विनी जंगम यांनी केली.
नव्याने आलेल्या ‘झिका’ विषाणूचा धोका वाढला असून पुण्यामध्ये त्याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे सातारा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ‘नागरिकांनीही स्वत:चे घर आणि परिसर यांची स्वच्छता ठेवावी’, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत नसतांना आता डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यांसारख्या आजारांचा संसर्ग वाढत आहे. याचे मुख्य कारण परिसरातील अस्वच्छता हेच आहे. शहरातील विविध भागांमध्ये सध्या कचर्याचे ढीग साठले आहेत. या कचर्याची योग्य वेळेत विल्हेवाट लागणे आवश्यक आहे. याकडे संबंधित पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांनी गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. |