ब्राह्मणद्वेषाची कीड दूर व्हावी !

वरील छायाचित्रात भिंतीवर लिहिलेले ब्राह्मणविरोधी लिखाण दिसत आहे. हिंदूंनी केलेल्या विरोधानंतर लिखाण पुसलेली भिंत खालील छायाचित्रात दिसत आहे.

पुणे शहराच्या काही भागांतील भिंतींवर ब्राह्मणांच्या विरोधात लिखाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे लिखाण त्वरित पुसले, तसेच भविष्यात अशा गोष्टींना आळा घालणार असल्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी केलेली कारवाई समाधानकारक असली, तरी मुळात ब्राह्मणद्वेषाची वृत्ती समाजात कशा प्रकारे मुरलेली आहे ? हे या घटनेतून लक्षात येते.

पूर्वी समाजात ब्राह्मणांना मानाचे स्थान होते. इंग्रजांनी जाणीवपूर्वक ब्राह्मणद्वेषाचे विष कालवले. मुळात काही दशकांमधील काही लोकांकडून चुका झाल्या, तर संपूर्ण समाजाला आणि त्याही पुढे जाऊन परिस्थिती पालटून काही दशके लोटली, तरी त्या समाजाप्रती वैमनस्य बाळगणे, कितपत योग्य ? स्वातंत्र्यानंतर निरपराध ब्राह्मणांवर अत्याचार झाल्याने या वर्गातील अनेक लोक विदेशात निघून गेले. याद्वारे भारताचे बौद्धिक सामर्थ्य विदेशात गेले. हिंदु समाजात श्रेष्ठ अशी वर्णाश्रमव्यवस्था आहे. ब्राह्मण वर्णातील लोक हे समाजाला धर्मशिक्षण देण्याचे आणि त्याद्वारे समाजातील धर्माचे चैतन्य अबाधित ठेवण्यासाठी कार्यरत असतात. आज निधर्मीपणाचा अतिरेक म्हणा किंवा अन्य अनेक कारणांमुळे धर्मशिक्षण देणार्‍यांची संख्या पुष्कळ प्रमाणात न्यून झाली आहे. या अनेक कारणांपैकी ‘ब्राह्मण समाजाची केलेली निर्भत्सना’, हेही एक कारण असल्याचे नाकारता येणार नाही. विविध प्रकारे हिणवल्यामुळे अथवा लक्ष्य केल्यामुळे अनेकांनी पारंपरिक ज्ञानदानाची व्यवस्था आणि पौरोहित्य यांकडे दुर्लक्ष केले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अशा प्रकारे ब्राह्मणद्वेषामुळे धर्माची आणि पर्यायाने देशाची किती मोठ्या प्रमाणात हानी होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी पहिल्यांदा समाजातील ब्राह्मणद्वेषाची कीड दूर करायला हवी. ती पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. ब्राह्मण ही जात नसून तो समाजाला संतुलित ठेवणारा वर्ण आहे, हे रुजवायला हवे. यासाठी समाजाला धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था करायला हवी. असे प्रयत्न झाल्यास ‘मुळापासून आणि देशाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न झाले’, असे म्हणता येईल. विद्वेषी मंडळी करत असलेल्या प्रचाराला आळा घालायला हवा, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही !

– कु. प्राजक्ता धोतमल, सनातन आश्रम, देवद, पनवेल.