नियोजनबद्ध कृती करणारे, प्रेमळ आणि परिस्थिती आनंदाने स्वीकारणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता रामदास केसरकर (वय ६८ वर्षे) !

गेल्या १५ वर्षांपासून अधिवक्ता रामदास केसरकर आणि त्यांच्या पत्नी सौ. प्रमिला केसरकर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ राहून साधना अन् सेवा करत आहेत. स्वतःचा व्यवसाय आणि मुंबईसारखे मायाविश्व यांची आसक्ती सोडून असे करणे पुष्कळच कठीण आहे; पण त्या दोघांनी ते सहज साध्य केले आहे. ६ वर्षांपूर्वी सौ. केसरकरकाकूंना ‘पांढर्‍या पेशींपैकी एका प्रकारच्या पेशीचा कर्करोग (मल्टीपल मायलोमा)’ झाला. तेव्हापासून केसरकरकाका त्यांची सेवा करत आहेत. या कालावधीत काकांमधील अनेक दैवी गुण त्यांच्यासमवेत सेवा करणार्‍या सहसाधिकांना अनुभवायला आणि शिकायला मिळाले. सहसाधिकांना काकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

अधिवक्ता रामदास केसरकर

१. स्वयंशिस्त

‘हा काकांचा सर्वांत महत्त्वाचा गुण आहे. त्यांचा सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंतचा दिनक्रम ठरलेला असतो. प्रसाद-महाप्रसाद असो, व्यायाम असो अथवा अन्य सेवा असो; काका प्रत्येक कृती वेळेतच करतात.

अधिवक्त्या (कु.) दीपा तिवाडी

२. नियोजनबद्ध कृती

२ अ. वेळेआधीच सेवेची पूर्ण सिद्धता करणे : पूर्वी काका न्यायालयात जायचे. तेव्हा ते न्यायालयाने दिलेल्या दिनांकांना उपस्थित रहायचे. नंतर ‘पुढील दिनांकाला कसलीही अडचण येऊ नये’, यासाठी ते त्याच दिवशी पुढील दिनांकाचे कामकाज पूर्ण करून दाव्याची धारिका कपाटात ठेवायचे. ‘तहान लागली की, विहीर खणणे’ या म्हणीप्रमाणे ‘ऐन वेळी कामे करणे’, हे काकांच्या तत्त्वात बसत नाही.

२ आ. सहसाधकांचे योग्य तेथे साहाय्य घेऊन वैयक्तिक कामे वेळेत पूर्ण करणे : कोरोनामुळे दळणवळण बंदी लागू झाली होती आणि त्या वेळी काकू रुग्णाईत होत्या. असे असूनही काकांनी त्यांची अधिकोषाची आणि अन्य कामे यांचे नियोजन वेळच्या वेळी केले. काकूंचे ‘केसपेपर्स’ (आजाराविषयीच्या नोंदींचे कागद) आणि वैद्यकीय अहवाल इत्यादीही ते व्यवस्थित अन् वेळोवेळी धारिकेमध्ये नीट ठेवतात. दळणवळण बंदीच्या काळात आधुनिक वैद्यांना ‘व्हॉट्सॲप’ किंवा ‘ई-मेल’द्वारे केसपेपर पाठवणे इत्यादी गोष्टी त्यांना कराव्या लागल्या. काकांना ‘ई-मेल’सारख्या आधुनिक गोष्टींचा वापर करणे कठीण वाटते. अशा वेळी ते सेवेतील सहसाधकांचे साहाय्य घेऊन वेळच्या वेळी सर्व कामे पूर्ण करतात. ‘मला त्यातील काही येत नाही’; म्हणून सोडून देण्याची त्यांची वृत्ती नाही.

२ इ. काकूंच्या उपचारांसाठी बाहेरगावी जाण्याचे सुयोग्य नियोजन करून तिकिटाचे आरक्षण करणे : काकांना अनेक वेळा काकूंना बाहेरगावी किंवा स्थानिक वैद्यांकडे उपचारांसाठी घेऊन जावे लागते. उपचारांसाठी बाहेरगावी जायचे ठरल्यास ते एक मास आधीच त्यांचे जाण्या-येण्याचे रेल्वे किंवा विमान यांच्या तिकिटांचे आरक्षण करतात. आतापर्यंत त्यात काही पालट झाला किंवा तिकीट रहित करावे लागले, असे क्वचित्च झाले असावे.

२ ई. आश्रमातून बाहेर जातांना त्याविषयी आवश्यक असलेल्या सर्वांना वेळेत निरोप देणे : काका प्रसाद किंवा महाप्रसाद ग्रहण करणार नसतील किंवा काही कारणाने त्यांना रुग्णालयातून येण्यास विलंब होणार असेल, तर ते तसा निरोप स्वयंपाकघरात आणि सेवेच्या ठिकाणी देतात. आश्रमातून बाहेर जातांना आश्रमातील वाहनसेवा करणारे साधक, स्वयंपाकघरातील साधिका यांना त्याविषयी निरोप देणे अपेक्षित असते. काकूंच्या वैद्यकीय तपासणीसाठी बाहेर जातांना काका या सर्व साधकांना निरोप देऊन आश्रमातील कार्यपद्धतीचे पालन करतात. ‘त्यांच्याकडून एखाद्याला निरोप द्यायचा राहिला’, असे झाल्याचे आमच्या स्मरणात नाही. ‘इतरांना आणि स्वतःलाही कुठल्याच दृष्टीने अडचण येऊ नये’, या दृष्टीने त्यांचे प्रयत्न असतात.

अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर

३. सहजता

अ. काकांमधील सहजतेमुळे ते इतरांशी लगेच ओळख करून घेतात. काकू रुग्णाईत असतांना ‘त्यांना उसाचा रस चालेल का ?’, असे आम्ही काकांना विचारले होते. त्यांनी ‘चालेल’, असे सांगितल्यावर २ दिवस आम्ही काकूंसाठी रस आणून दिला. त्यानंतर काकांनी आम्हाला त्या रसविक्रेत्याचा संपर्क क्रमांक आणण्यास सांगितले. त्यांनी त्या रसविक्रेत्याची भ्रमणभाषवरूनच विचारपूस करून त्याच्याशी ओळख करून घेतली आणि प्रतिदिन रस आणण्याचे नियोजन केले. काकांनी अशा अनेक दुकानदारांशी एका भेटीतच ओळखी केल्या आहेत.

आ. एखाद्या व्यक्तीला काका पुष्कळ दिवसांनी भेटले असतील, तरी काका चांगली ओळख असल्याप्रमाणेच तिच्याशी सहजतेने बोलतात. त्यामुळे समोरची व्यक्तीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देते.

४. प्रेमभाव

४ अ. सहसाधकांची वेळोवेळी विचारपूस करणे : आम्हाला भेटल्यावर काका नेहमी आमच्याकडे आमचे कुटुंबीय आणि सहसाधक यांच्याविषयी विचारपूस करतात. कधी सेवेतील कुणी साधक दिसले नाहीत, तर ते त्यांचीही विचारपूस करतात. काका १ – २ दिवसांसाठी रुग्णालयात गेले असतील आणि काही निरोप देण्यासाठी त्यांच्याशी भ्रमणभाषवरून संपर्क झाला, तरी ते ‘तुम्ही कशा आहात ?’, ‘आश्रमातील साधक बरे आहेत ना ?’, असे आवर्जून विचारतात.

४ आ. सहसाधकांना खाऊ देणे : त्यांच्याकडे काही खाऊ असल्यास ते आठवणीने आम्हाला खाऊ देतात. ‘एखादा विशेष पदार्थ कुठे चांगला मिळतो ?’, हे काकांना ठाऊक असते. एकदा त्यांनी एका चांगल्या खाद्यपदार्थाच्या दुकानातून सर्वांसाठी कचोरी मागवली आणि ‘चव कशी वाटली ?’, असे आम्हाला आवर्जून विचारले. यातून आम्हाला काकांमधील ‘प्रेमभाव आणि ‘लहान गोष्टीतून आनंद घेणे अन् देणे कसे शक्य आहे ?’, हे शिकायला मिळाले.

५. सहसाधकांना सेवेत साहाय्य करणे

कधी एखादी सेवा लगेच पूर्ण करायची असल्यास काका ती सेवा तत्परतेने पूर्ण करून देतात. आमच्या चुकीमुळे एखादी सेवा त्यांना ऐन वेळी करावी लागली, तर ते आम्हाला त्याची जाणीव करून देतात; परंतु ती सेवाही पूर्ण करून देतात.

६. इतरांचा विचार करणे

अ. काकू रुग्णाईत झाल्यानंतर त्यांना काही गोष्टी करणे अशक्य झाले. तेव्हा ‘त्यांना प्रसाद आणि महाप्रसाद आणून देणे, कपडे धुणे, खोलीची स्वच्छता’ इत्यादी सर्व कृती काका स्वतःच करतात. ‘आपल्यामुळे इतरांचा वेळ जायला नको’, असा दोघांचाही प्रामाणिक विचार असतो’, असे आम्हाला प्रकर्षाने जाणवते.

आ. तीव्र आध्यात्मिक त्रास असल्यामुळे काकांना बरीच वर्षे थकवा होता. साधारण ५ वर्षांपूर्वी त्यांचा त्रास न्यून झाला. त्यानंतर काकूंना कर्करोग झाला. खरेतर काका-काकूंचे वय आणि त्यांना झालेले त्रास पहाता त्यांच्या जागी अन्य कुणी असते, तर दैनंदिन नियोजनात त्यांना इतरांचे साहाय्य घ्यावे लागले असते; मात्र काका-काकू जवळपास सर्वच कृती स्वतःच्या स्वतःच करत आहेत.

इ. काका अनेक वर्षांपासून रात्री जेवत नाहीत; पण काकू रुग्णाईत असल्यामुळे औषधे घेण्यासाठी त्यांना काहीतरी खाणे आवश्यक असते. ‘काकूंनी काहीतरी खावे’, यासाठी काकाही त्यांच्या समवेत रात्री थोडे काहीतरी खातात’, असे त्यांनी सांगितले. काकूंसाठी त्यांनी स्वतःच्या नियोजनात पालट केला.

ई. ‘दोघांच्या जेवणासाठी वेगवेगळे पदार्थ घेऊन जायला नकोत’, यासाठी काकू जे पदार्थ खातात, तेच पदार्थ काकाही खातात.

हे सर्व ते सहज करत आहेत. यामागे ‘इतरांचा विचार’ इतकाच त्यांचा उद्देश आहे’, असे लक्षात येते.

७. तारतम्य असणे

७ अ. आवश्यक त्या ठिकाणी साधकांचे निःसंकोचपणे साहाय्य घेणे : अत्यावश्यक असल्याविना त्यांनी कधीच इतरांचे साहाय्य घेतले नाही. जमेल तेवढे स्वतःच करण्यावर त्यांचा भर असतो; मात्र आवश्यक तेथे ते निःसंकोचपणे साहाय्य मागतात. हा त्यांचा गुण लक्ष वेधणारा आहे. अन्यथा ‘इतरांचे साहाय्य कसे घेऊ ?’, या भावनिक विचारांमध्येही काहींचा वेळ जातो. काका-काकू सतत वर्तमानात रहाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्वतःचे त्रास आणि प्रारब्ध यांकडे त्यांना साक्षीभावाने पहायला जमते.

७ आ. ‘कुठल्या सेवेला प्राधान्य द्यायचे ?’, याचे तारतम्य चांगले असणे : काकू रुग्णाईत असल्यामुळे सेवा आणि वैयक्तिक दैनंदिन कामे यांत समतोल राखण्याचा काकांचा प्रयत्न असतो. दोन्ही गोष्टी हाताळणे, म्हणजे खरेतर तारेवरची कसरतच आहे, तरी काका जमेल तशी सेवा करतात. त्यासाठी कधी जागरण करावे लागले, तरी त्यासाठी त्यांची सिद्धता असते. ‘सेवा आणि वैयक्तिक कामे यांत कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यावे ?’, याविषयीच्या निर्णयप्रक्रियेत गोंधळ झाला’, असे त्यांचे कधीच झाले नाही. ‘कुठल्या गोष्टीला कधी प्राधान्य द्यावे ?’, हे त्यांना चांगले जमते. ‘तारतम्य’ हा त्यांच्यातील दैवी गुणच आहे.

८. परिस्थिती आनंदाने स्वीकारणे

वर्ष २०१६ मध्ये काकूंना कर्करोग असल्याचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर अनेक उपचार करण्यात आले. आजही उपचार चालूच आहेत; मात्र काकांच्या बोलण्यात ‘त्यांना काकूंचे किती करावे लागते !’, असे म्हटल्याचे कधीच ऐकण्यात नाही. ‘कुटुंबियांकडूनही त्यांच्या कोणत्याही अपेक्षा नाहीत’, असे लक्षात येते.

ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।।

– तुकाराम गाथा, अभंग २८६७, ओवी २

अर्थ : भगवंताने आपणाला ज्या स्थितीत ठेवले, त्या स्थितीत रहावे. चित्ती मात्र समाधान असावे.

याप्रमाणे काकांचे वागणे आहे.

९. त्यांचे सर्व दृष्टीकोन स्पष्ट आहेत. ते प्रत्येक कृतीतून आनंद घेतात. ‘सकारात्मकता आणि स्थिरता’, या गुणांमुळे प्रत्येक कृतीतून त्यांची साधनाच होते’, असे वाटते.

पूर्वसूचना

मध्यंतरीच्या काळात स्वभावदोष आणि अहं यांमुळे काकांची आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांहून अल्प झाली होती; मात्र आता पुन्हा ‘त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असावी’, असे वाटते.’ (प्रत्यक्षातही २६ जुलै २०२१ या दिवशी अधिवक्ता केसरकरकाका यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. – संकलक)

– अधिवक्त्या (कु.) दीपा तिवाडी आणि अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०२१)


कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही साधनेमुळे आनंदी रहाणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. प्रमिला केसरकर (वय ६६ वर्षे) !

सौ. प्रमिला केसरकर

१. सहनशील

‘मागील ६ वर्षांपासून सौ. प्रमिला केसरकरकाकू ‘पांढर्‍या पेशींपैकी एका प्रकारच्या पेशीच्या कर्करोगाने (मल्टीपल मायलोमाने)’रुग्णाईत आहेत. कर्करोगावरील उपचार घेतांना असह्य वेदना होत असूनही त्यांच्या तोंडवळ्यावर कधीच काळजी, निराशा किंवा निरुत्साह दिसत नाही. सतत ‘किमोथेरपी’ (कर्करोगावरील उपचारपद्धत) आणि ‘रेडिएशन’ (कर्करोगावरील किरणोत्सर्ग उपचारपद्धत) यांमुळे काकूंचे वजन न्यून झाले आहे. त्यांना पुष्कळ वेळ एका ठिकाणी बसणे किंवा झोपणे जमत नाही, तरी त्याविषयी त्यांचे कोणतेच गार्‍हाणे नसते.

२. सातत्य आणि चिकाटी

‘किमोथेरपी’सारख्या उपचारांमुळे काकूंची शारीरिक क्षमता उणावली आहे, तरी त्या नियमितपणे पहाटे लवकर उठून नामजप आणि व्यायाम करतात. मी काही दिवसांपासून पहाटे उठून २० मिनिटे चालते. एकदा पहाटे मला काकू चालण्याचा व्यायाम करतांना दिसल्या. शरिराने इतक्या थकलेल्या असूनही त्या ३० मिनिटे तरी चालत होत्या अन् मी २० मिनिटांतच दमून गेले होते !

३. परिस्थिती स्वीकारणे

रुग्णाईत असल्यामुळे काकूंच्या तोंडाला चव नाही. त्या काही ठराविक पदार्थच खाऊ शकतात, तरी त्यांचे कसलेही गार्‍हाणे नसते. त्यांनी ती परिस्थिती आनंदाने स्वीकारली आहे.

४. कठीण परिस्थितीतही आनंदी रहाणे

एप्रिल २०२१ मध्ये अकस्मात् काकूंच्या डाव्या हाताच्या संवेदना न्यून झाल्या. त्यांच्या त्या हाताची काहीच हालचाल होत नव्हती. त्यामुळे त्यावर १२ दिवस ‘रेडिएशन’द्वारे उपचार करायचे होते. तेव्हा काकूंना नेहमीप्रमाणे साडी नेसणेही अशक्य झाले. त्यामुळे त्यांना ‘इलास्टिक’ असलेला पायजमा घालावा लागला. काकूंचे रहाणीमान पूर्वीपासूनच अगदी साधे आहे. त्यांनी कधीच पंजाबी पोशाख परिधान केलेला नाही; मात्र आता या वेळी त्यांना तो घालावा लागला. त्या वेळी काका त्यांना म्हणाले, ‘‘आयुष्यात कधी ‘फॅशन’ केली नाही; म्हणून देवाने ‘फॅशन’ करण्याची संधी दिली.’’ यावर काका आणि काकू दोघेही हसू लागले.

त्यांच्यातील ही सहजता पाहून आमचा भाव जागृत झाला. ‘स्वतःच्या त्रासांकडे साक्षीभावाने पहाणे आणि स्थिर रहाणे’, खरेतर किती कठीण आहे ! पण ‘देवाची कृपा आणि साधनेचे बळ यांमुळे त्यांच्यात सहनशीलता निर्माण झाली असल्याने हे शक्य होत आहे’, असे आम्हाला वाटले.

५. काकूंना गंभीर दुखणे झाले असल्यामुळे त्यांना दैनंदिन कृती करण्यातही बर्‍याच मर्यादा येतात. असे असले, तरी काकू त्यांना जमेल त्या गोष्टी करतात.

६. प.पू. भक्तराज महाराज यांची ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा ।’, ही भजनपंक्ती आचरणात आणणार्‍या सौ. केसरकरकाकू !

मागील ६ वर्षे काकू कर्करोगाशी झुंज देत आहेत; मात्र काकूंना होत असलेल्या त्रासांच्या तुलनेत त्यांची साधनाच वरचढ ठरली आहे. त्यांनी या दुखण्यावर मात करत ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. ‘किमोथेरपी’मुळे त्यांचे शरीर अशक्त झाले आहे; मात्र ‘त्यांच्या तोंडवळ्यावरील आध्यात्मिक तेज त्यांनी प्रारब्धावर विजय मिळवल्याचे जणू प्रतीकच आहे’, असे आम्हाला वाटते. काकूंना पाहून प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनातील ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा ।’, ही ओळ आठवते. ‘काकूंनी या भजनांच्या ओळी तंतोतंत आचरणात आणल्या आहेत’, असे जाणवते.’

– अधिवक्त्या (कु.) दीपा तिवाडी आणि अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.५.२०२१)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.