४.८.२०२१ या दिवशी पुणे येथील चि. सुयोग जाखोटिया आणि सांगली येथील चि.सौ.कां. गायत्री बुट्टे यांचा शुभविवाह श्रीक्षेत्र औदुंबर (जिल्हा सांगली) येथे होत आहे. यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. सुयोग जाखोटिया आणि चि.सौ.कां. गायत्री बुट्टे यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
चि. सुयोग जाखोटिया यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
श्री. सुरेश जाखोटिया (चि. सुयोग यांचे वडील, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि सौ. विद्या जाखोटिया (चि. सुयोग यांची आई, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), पुणे
१. शिकण्याची वृत्ती
‘सुयोग शिकण्याची एकही संधी सोडत नाही. त्याचा सतत नवीन गोष्टी, उदा. संगीत किंवा वादन इत्यादी शिकण्याचा प्रयत्न असतो. ‘हे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनाच्या कार्यासाठी फार उपयोगी पडणार आहे’, असे तो मला सांगतो. तेव्हा ‘गुरुमाऊलीने हे ज्ञान आत्मसात करण्यासाठीच त्याला पाठवले आहे’, असे मला वाटते.
२. वैशिष्ट्यपूर्ण चलत्चित्रे बनवणे
तो छोटी छोटी चलत्चित्रे (व्हिडिओज्) बनवतो. त्यांना एक वेगळीच छटा असते. त्यांतून त्याचा भाव दिसतो. काही दिवसांपूर्वी सुयोगला सायकलने पंढरीची वारी करणार्या एका गटाचे चलत्चित्र बनवायचे काम मिळाले होते. त्याने ते चलत्चित्र बनवल्यावर इतरांनी ते चलत्चित्र अनेक ठिकाणी पाठवले. सुयोगची त्यांतील कुणाशीही ओळख नसतांना त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. त्या चलत्चित्राविषयी इतरांनी पुष्कळ चांगले लिहून पाठवले. अनेक जणांनी त्याचे पुष्कळ कौतुक केले.
३. निःस्वार्थी वृत्ती
सुयोगमध्ये जे कौशल्य आहे आणि त्याला जो तांत्रिक भाग येतो, त्यातील थोडेसेही हातचे न राखता तो समोरच्याला शिकवतो. तो जिथे नोकरी करतो, तिथे ध्वनीचित्र-चकत्यांच्या संकलनासाठी साहाय्य करतांना हा भाग प्रकर्षाने जाणवतो.
४. चौकटबद्ध विचार न करणे
त्याचा कुठलाही विचार चौकटबद्ध नसतो. प्रत्येक प्रसंगात त्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. त्यातून त्याला त्या प्रसंगाकडे नव्या दृष्टीने पहाता येते आणि नवीन शिकण्याचा आनंद मिळतो.
५. चि. सुयोगमध्ये जाणवलेला पालट
प्रसंगाला सामोरे जाण्याची मनाची क्षमता वाढणे : गेल्या २ – ३ वर्षांत त्याला अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. ‘प्रत्येक प्रसंगात होऊन होऊन शेवटी काय होणार ?’, या विचाराने तो त्या प्रसंगाकडे पहातो. त्यातून ‘प्रसंगाला सामोरे जाण्याची त्याच्या मनाची क्षमता वाढली आहे’, असे आम्हाला जाणवते.
‘हे गुरुमाऊली, परिस्थिती कशीही असली, तरी आमच्यावर आपल्या कृपेचा अखंड वर्षाव होत आहे. आजपासून सुयोगच्या जीवनात नवीन पर्व चालू होत आहे. ‘त्याची साधना अखंड व्हावी’, अशी आपल्या चरणी प्रार्थना !’ (२.८.२०२१)
सौ. सुप्रिया राघवेंद्र जाजू (चि. सुयोग यांची बहीण), इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर.
बहिणीला साधनेत साहाय्य करणे : ‘माझ्या जीवनात काही प्रसंग घडला, तर सुयोग माझ्या स्थितीला जाऊन मला समजून घेऊन साहाय्य करतो. सुयोगने दिलेले आध्यात्मिक दृष्टीकोन माझ्या अंतर्मनात जातात. त्यामुळे मी त्या प्रसंगातून लगेच बाहेर पडते. ‘सुयोगची अखंड साधना व्हावी’, अशी गुरुमाऊलीच्या चरणी आर्त प्रार्थना !’ (२.८.२०२१)
श्री. आनंद जाखोटिया (चि. सुयोग यांचा चुलत भाऊ, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), देहली
१. अभ्यासू वृत्ती
‘पूर्वीपासून सुयोग अभ्यासू आहे. त्याने चित्रीकरणाच्या सेवेतील अनेक बारकाव्यांचा अभ्यास करून प्रभावीपणे सेवा करण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रसंगाचे विश्लेषणही तो अभ्यासपूर्ण करतो.
२. मनमोकळेपणा
सुयोग अत्यंत मनमोकळेपणाने संवाद साधतो. त्यामुळे ‘त्याच्याशी बोलत रहावे’, असे मला वाटते. माझी आई (कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) रुग्णाईत असतांना तिलाही सुयोगशी बोलून एकदम चांगले वाटायचे.
३. ‘व्यवहारातही साधना कशी होईल ?’, असा सुयोगचा विचार असणे
लहानपणापासून सेवेमध्ये असल्यामुळे आणि नंतर पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात गेल्यामुळे व्यवहारातील गोष्टींशी त्याचा अधिक संपर्क आला नाही. आता कौटुंबिक दायित्वामुळे त्याला व्यवहारासाठी पूर्णवेळ द्यावा लागत आहे. ‘व्यवहारातसुद्धा साधना कशी होईल ?’, हा विचार त्याच्या बोलण्यातून दिसून येतो.’ (२.८.२०२१)
सौ. प्रीती आनंद जाखोटिया (चि. सुयोग यांची वहिनी), देहली
सुयोगदादांशी बोलणे, म्हणजे एक सत्संगच असणे : ‘सुयोगदादांना एका संतांचा पुष्कळ सहवास मिळाला. ते आम्हाला त्या संतांच्या सत्संगातून शिकायला मिळालेली सूत्रे सांगतात. त्यामुळे त्यांच्याशी बोलणे, म्हणजे एक सत्संगच असतो.’ (२.८.२०२१)
श्री. संपत जाखोटिया (चि. सुयोग यांचा चुलत भाऊ), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१. प्रेमभाव
‘तो माझ्याशी किंवा इतर कुणाशी प्रतिक्रियात्मक बोलला’, असे आजपर्यंत मी कधी पाहिले नाही. तो सर्वांशी प्रेमाने बोलतो.
२. सेवेची तळमळ
पुढाकार घेऊन सेवा करणे : आनंदच्या (चि. सुयोग यांच्या चुलत भावाच्या) विवाहाच्या वेळी त्याने अनेक सेवा पुढाकार घेऊन केल्या. त्या वेळी आम्हाला त्याचे पुष्कळ साहाय्य झाले.’ (२.८.२०२१)
श्री. गौरीश पुराणिक (मित्र), पुणे
१. ‘सुयोग शांत आणि समजूतदार आहे.
२. सुयोग कुणाला साहाय्य हवे असल्यास ते लगेच करतो.
३. सेवेची तीव्र तळमळ
अ. तो सेवा मनापासून आणि अधिकाधिक चांगली करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला सेवेतील पुष्कळ बारकावे सुचतात. सेवा अचूक करण्याकडे त्याचा कल असतो.
आ. कोणतेही व्यावसायिक शिक्षण घेतलेले नसतांनाही तो ध्वनीचित्रीकरणाची सेवा उत्कृष्टपणे करतो.
४. सुयोग समोरच्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेतो. एखाद्या विषयावर त्याचे मत घेतल्यास तो पुष्कळ चांगल्या प्रकारे त्या विषयातील बारकावे सांगतो.’ (२.८.२०२१)
आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. ध्वनीचित्रीकरण आणि छायाचित्रीकरण प्रयत्नपूर्वक शिकणे अन् त्यांत कौशल्य प्राप्त करणे
खरेतर ध्वनीचित्रीकरणाच्या संदर्भातील सेवा करण्यापूर्वी सुयोगचे त्या संदर्भातील प्रशिक्षण झालेले नव्हते. असे असतांनाही त्याने या सेवेतील सर्व अंगे प्रयत्नपूर्वक शिकून घेतली. इतकेच नव्हे, तर त्यात अशी कुशलता प्राप्त केली की, ‘या सेवेअंतर्गत असणारी कोणतीही तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी ‘सुयोगला विचारूया’, हा परवलीचा शब्द कधी बनला ?’, हे आम्हाला समजले नाही.
त्याला उत्तम छायाचित्रीकरणही करता येते. ‘तो एका मोठ्या संस्थेत त्याविषयी शिकवतो’, यावरून हे लक्षात येते. थोडक्यात, तो जेथे असेल आणि जे करत असेल, तेथे त्या त्या क्षेत्रातील सर्वकाही तो सहजतेने शिकतो. अधिकाधिक क्षेत्रांत सेवा करू इच्छिणार्या युवा साधकांनी या संदर्भात त्याचे उदाहरण विचारात घ्यायला हवे.
२. उत्तम निरीक्षणक्षमता
एकदा एक संत त्यांच्या भक्तांसह प्रथमच रामनाथी आश्रमात येणार होते आणि त्यांचे विविध कार्यक्रम आश्रमात असणार होते. त्यांच्या कार्यक्रमांचे चित्रीकरण चांगल्या रितीने होण्यासाठी ‘कोणते कार्यक्रम चित्रीकरण कक्षात करावेत ? आणि कोणते कार्यक्रम कक्षाबाहेर करावेत ?’, याविषयी चर्चा चालू होती. तेव्हा सुयोगने लगेच याविषयी सांगितले होते, ‘‘त्यांच्या कार्यक्रमात मोठे ढोल वाजवण्यात येतात; म्हणून ढोल वाजवण्याचे कार्यक्रम चित्रीकरण कक्षात नकोत. तसे केल्यास कक्षातील भिंतींवर दिलेले विशिष्ट प्रकारचे लेपन त्या आवाजामुळे तुटेल.’’ त्यामुळे निर्णयप्रक्रिया सुकर बनली होती.
‘या कलेच्या माध्यमातून आणि त्यातून घडलेल्या साधनेच्या आधारे त्याची पुढची साधना अन् जीवन दोन्ही सुफल होवो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’ (२.८.२०२१)
आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. गुरुसेवेची तीव्र तळमळ असणे
‘गेली १० – १५ वर्षे सुयोगने झोकून देऊन अथक गुरुसेवा केली आहे. अनेकदा विश्रांती न घेता आणि शारीरिक किंवा मानसिक स्थिती नीट नसतांनाही त्याने गुरुसेवेलाच प्राधान्य दिले आहे. ‘गुरुसेवा प्रभावी पद्धतीने करता यावी’, यासाठी तिच्यातील बारकावे शिकण्यासाठी त्याने पुष्कळ कष्ट घेतले आहेत.
२. गुरूंवर अपार श्रद्धा असणे
‘सुयोगने अगदी लहान वयातच साधनेला प्रारंभ केला आणि तो लहान वयातच सेवारतही झाला. गेल्या अनुमाने १५ वर्षांपासून तो अविरत साधना करत आहे. या प्रदीर्घ कालखंडात त्याच्यावर अनेक प्रसंगांना सामोरे जाण्याची वेळ आली; परंतु गुरूंवरील अपार श्रद्धेच्या आधारे त्याने प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाऊन त्यावर मात केली. विविध प्रतिकूल परिस्थितींमध्येही त्याची गुरूंवरील श्रद्धा अबाधित राहिली.’ (२.८.२०२१)
चि.सौ.कां. गायत्री बुट्टे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
चि. सुयोग जाखोटिया (भावी यजमान), पुणे
१. आध्यात्मिक त्रास होत असूनही गायत्रीने व्यष्टी साधनेचे काटेकोर नियोजन करणे
‘गायत्रीला आध्यात्मिक त्रासामुळे सेवा करता येत नसे. तिला अधिक वेळ नामजपादी उपाय करायला सांगितले होते; पण त्यातही तिने व्यष्टी साधनेचे इतके बारीक नियोजन केलेले असायचे की, ती पूर्णवेळ काहीही करत नसली, तरी पूर्णवेळ व्यस्त असायची.
२. संशोधक वृत्ती
नामजपादी उपाय करतांना ‘केवळ सांगितले आहे, तेवढे पूर्ण करणे’, असे तिचे नसते. ती त्या संदर्भात नेहमी विविध प्रयोग आणि अभ्यास करते. त्यामुळे तिला नवीन नवीन प्रायोगिक ज्ञान मिळत रहाते. आपण तिला एखादा वैशिष्ट्यपूर्ण विचार किंवा उपायांचा प्रयत्न सांगायला गेलो, तर तिने त्यातील १० पावले पुढचे प्रयत्न आधीच करून ठेवलेले असतात. त्यामुळे अनेकांना तिचे साहाय्य होते.
३. साधनेची तळमळ
गायत्रीचे एका गुणात वर्णन करायचे झाल्यास तो गुण म्हणजे साधनेची तीव्र तळमळ ! गेल्या अनेक वर्षांत अनेक प्रसंग आणि परिस्थिती यांतही तिची साधनेची ओढ अन् तळमळ कणमात्र ढळली नाही. त्यामुळे ती प्रत्येक प्रसंग आणि परिस्थिती यांमध्ये गुरूंची कृपा अनुभवते. तिच्यात जिद्द आणि चिकाटी कमालीची असून ‘साधना ही तिची आवड नसून वृत्ती आहे’, हे क्षणोक्षणी लक्षात येते.
४. विविध पद्धतींनी प्रभावीपणे अध्यात्मप्रसार करणे
अ. ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेत तिचे विशेष प्रावीण्य होते. अनेक मोठमोठ्या ग्रंथप्रदर्शनांची रचना तिने अतिशय सुरेख आणि सुंदर पद्धतीने केली होती.
आ. ग्रामीण भागांत प्रसार करतांना तिचा लोकांवर प्रभाव पडायचा आणि पुष्कळ लोक अन् बालसाधक संस्थेला जोडले जायचे.
इ. तीव्र आजारपणातही तिने रुग्णालयात पुष्कळ अध्यात्मप्रसार केला. लोकांनाही येता-जाता ‘हिची खोली वेगळी आहे’, असे जाणवायचे. ती लोकांना ज्ञानापेक्षा प्रेमाने जिंकायची आणि साधनेला प्रवृत्त करायची.
ई. पूर्वीपासून कुणीही छोटेसे साहाय्य केले, तरी ती त्यांना नामपट्टी, देवतांची चित्रे आणि लघुग्रंथ द्यायची. त्यामुळे लोक पुष्कळ आनंदी होऊन संस्थेशी जोडले जायचे. तिला शब्दांतून प्रसार करायची आवश्यकताच पडत नसे.
५. गायत्रीला अनेक अनुभूती येणे आणि त्या अनुभूतींतून देवावरील श्रद्धा वाढण्यास साधकांना साहाय्य होणे
गायत्रीचे जीवन हे आध्यात्मिक अनुभूतींनी युक्त आहे. पूर्वीच्या काळी संतांना यायच्या, तशा असंख्य अनुभूती तिला आलेल्या आहेत. आध्यात्मिक आणि मानसिक त्रास झाल्याने मी साधनेपासून दूर जाऊ लागलो, तरी ‘आपले त्रास हिच्या संघर्षापेक्षा पुष्कळ अल्प आहेत’, या जाणिवेने मी साधनेकडे परत वळायचो. ‘तिच्या सर्व अनुभूतींतून आपली देवावरची श्रद्धा वाढते’, असे अनेकांनी अनुभवले आहे.
६. अनेक व्यष्टी आणि समष्टी गुणांमुळे संतांचे मन जिंकणारी गायत्री !
तिच्यात ‘भाव, प्रेमभाव, नम्रता, सौम्य बोलणे, सतत देवाशी अनुसंधान’, असे व्यष्टी साधनेसाठी आवश्यक गुण आणि ‘नियोजनकौशल्य, कलात्मक मांडणी, व्यापक विचार’, असे समष्टी साधनेसाठी आवश्यक गुण आहेत. त्यामुळे ती सनातनच्या आणि इतर संतांचीही लाडकी बनली आहे. ‘एक संत तर तिचे नेहमी ‘गुणांची खाण’ असे वर्णन करायचे आणि ‘पुढे ती नक्की जिंकणार अन् साधनेत पुढे जाणार !’, असा आशीर्वाद द्यायचे.’ (२.८.२०२१)
सौ. वैष्णवी पिसोळकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. व्यष्टी साधनचे गांभीर्य
‘ताई तिच्या मनात आलेले सर्व विचार प्रांजळपणे सांगते. त्यामुळे तिच्याशी बोलतांना हलकेपणा जाणवतो. अयोग्य विचारप्रक्रिया मांडल्यावर त्यातून लक्षात आलेले तिचे स्वभावदोषही ती सहजतेने स्वीकारते आणि त्यांत योग्य तो पालट करते. ताई ‘त्रासाच्या स्थितीत होणारे पालट आणि त्यांवर करायचे नामजपादी उपाय’ इत्यादी उत्तरदायी साधकांना विचारून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेते.
२. संतांच्या मार्गदर्शक चौकटींचा संग्रह करणे
तिने दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणार्या संतांच्या मार्गदर्शक चौकटींचा संग्रह केला आहे. ती त्या चौकटी मधे मधे वाचते आणि इतरांनाही पाठवते. त्या चौकटी वाचून मनाला उभारी मिळते आणि सेवा चांगली होण्यास साहाय्य होते.
३. ईश्वरप्राप्तीची तळमळ
ईश्वरप्राप्तीची तळमळ हा तिचा सर्वांत मोठा गुण आहे. त्यामुळे तिने इतक्या तीव्र त्रासातही साधना केली. ताईची प्राणशक्ती अल्प असल्याने तिला नामजप लिहायला जमायचे नाही; परंतु अनुसंधानात रहाण्याची तळमळ असल्याने ती भ्रमणभाषमध्ये नामजप लिहायची. नामजप अधिकाधिक व्हावा; म्हणून तिने १ लक्ष वेळा नामजप लिहिण्याचे ध्येय ठेवले होते. त्यानुसार ती संगणकीय धारिकेत नामजप लिहायची. ती धारिका तिने मलाही पाठवली होती. त्यामुळे मला हे शिकायला मिळाले.’ (२.८.२०२१)
भावी पत्नीकडे ‘साधिका’ या नात्याने पहाणारे चि. सुयोग जाखोटिया !
‘चि. सुयोग यांनी चि.सौ.कां. गायत्रीची, म्हणजे भावी पत्नीची गुणवैशिष्ट्ये लिहिली आहेत. त्यावरून ‘ते तिच्याकडे साधिका म्हणून पहातात आणि तिच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतात’, हे लक्षात येते. हे कौतुकास्पद आहे.’ – संकलक
हर पल खुशियों से महकते रहो, गुरुकृपा से चमकते रहो ।पथ एक मार्ग एक, जीवन का ध्येय एक । सुयोग संग गायत्री । कृष्ण की मुरली बन गायत्री जीवन में आई । हर पल खुशियों से महकते रहो, गुरुकृपा से चमकते रहो । – श्री. सुरेश जाखोटिया आणि सौ. विद्या जाखोटिया (चि. सुयोग यांचे वडील अन् आई), पुणे आणि सौ. सुप्रिया जाजू (चि. सुयोग यांची बहीण), इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. (२.८.२०२१) |
उखाणेवधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणे
– कु. पूजा धुरी, साळगाव, कुडाळ. (१५.८.२०१८) |
|