अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी मंदिरांसाठी मोठा न्यायालयीन लढा दिला ! – ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, प्रवक्ते, राष्ट्रीय वारकरी परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘संविधान के रक्षक’ पुरस्कार प्राप्त झाल्याविषयी राष्ट्रीय वारकरी परिषदेकडून कौतुक

ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे

रायगड, ६ जुलै (वार्ता.) – हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘संविधान के रक्षक’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यासाठी त्यांचे अभिनंदन ! अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी देवस्थानांसाठी मोठा न्यायालयीन लढा दिला आहे. अनेक मंदिरांची भूमी त्यांच्यामुळेच परत मिळाली आहे, असे कौतुकोद्गार राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ते ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून काढले आहेत.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,

१. देव, संत, तसेच हिंदु धर्म यांच्या रक्षणासाठी अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी केलेले कार्य मोलाचे असल्यामुळेच राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या वतीने श्री क्षेत्र पैठण येथील वारकरी अधिवेशनात त्यांना वैकुंठवासी ह.भ.प. गुरुवर्य धर्माचार्य पू. निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. ईश्वराची कृपा आणि संतांचे आशीर्वाद संपादन करणारे ते स्वभावाने अगदी नम्र आणि चिकाटीने काम करणारे अधिवक्ता आहेत.

२. हिंदु विधीज्ञ परिषद, दैनिक ‘सनातन प्रभात’, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य हे वर्तमान परिस्थितीत अत्यंत प्रभावी आणि अत्यावश्यक आहे. कायदेशीर लढा हा सर्वांत मोठा लढा असतो. त्यासाठी धर्मनिष्ठ अधिवक्त्यांची आवश्यकता असते. त्यांना देण्यात आलेल्या पुरस्काराने पुरस्काराचाही बहुमान वाढणार आहे. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी ऐकून आम्हाला पुष्कळ आनंद झाला. राष्ट्रीय वारकरी परिषदेकडून त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा !