तंबाखूच्या उत्पादनावरच बंदी हवी !

प्रतिवर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनानुसार ३१ मे या दिवशी ‘जागतिक तंबाखू सेवनविरोधी दिन’ पाळला गेला. तंबाखूयुक्त पदार्थांचे वाढते सेवन हा जागतिक स्वरूपाचा गंभीर प्रश्न झाला आहे. जगभरात प्रतिवर्षी तंबाखू सेवनामुळे ६ कोटी लोक मृत्यूमुखी पडतात, ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या दिनानिमित्त जगातील सर्व देशांना आवाहन केले आहे की, त्यांनी मनापासून प्रयत्न करून धूम्रपानाच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सहकार्य करावे.

तंबाखूमुळे कर्करोग होतो. भारतात सध्या अनुमाने २५ लाख कर्करोगी आहेत. यामध्ये प्रतिवर्षी ७ लाख लोकांची भर पडते. एकूण रुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांचा तंबाखूशी संबंध आहे, तसेच धूम्रपान करणार्‍यांचा धूर श्वासावाटे आत घेतल्यामुळे धूम्रपान न करणारे ६ लाख लोक प्रतिवर्षी दगावतात, तर धूम्रपानामुळे होणार्‍या रोगांवरील वाढत्या व्ययाचा फटका हा आणखी गंभीर परिणाम आहे. सिगारेटच्या सेवनामुळे २५ हून अधिक जीवघेणे रोग होऊ शकतात, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

वर्ष २००८ मध्ये सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन करणार्‍यांविरुद्ध ‘धूम्रपान प्रतिबंधक कायदा’ करण्यात आला. यामध्ये दंडाची शिक्षा केवळ २०० रुपये असल्याने त्याचा काहीच परिणाम झाला नाही. यातून कायदा करतांना ‘त्याचा वचक लोकांवर बसावा’, असा उद्देश दिसत नाही, असेच म्हणायला हवे. वर्ल्ड बँकेच्या अंदाजानुसार जागतिक पातळीवर धूम्रपानामुळे होणार्‍या आजारांवर प्रतिवर्षी केला जाणारा व्यय कोट्यवधी रुपये आहे.

तंबाखूमुळे होणार्‍या हानीची आर्थिक आणि शारीरिक बाजू पाहिल्यास यावर ठोस उपाययोजना निघणे अपेक्षित होते; परंतु असे होतांना दिसत नाही, हे गंभीर आहे. या व्यसनाचे बळी तरुण आहेत, हे वेगळे सांगायला नको. युवा वर्ग कमकुवत होणे, ही देशाची होणारी मोठी हानी आहे. असे असतांना तंबाखू उत्पादनावर बंदीचा निर्णय न होणे, हे दुर्दैवी आहे. अजून किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय होणार आहे, असा प्रश्न सूज्ञ नागरिकांना पडत आहे. केवळ ‘जागतिक धूम्रपान सेवनविरोधी दिन’ पाळण्यापेक्षा ‘धूम्रपान बंदी’ आणि पुढे जाऊन तंबाखूच्या उत्पादनावरच बंदी होणे अधिक योग्य आहे. हिंदु राष्ट्रात तंबाखूवर बंदी असेल.

– श्री. सचिन कौलकर, मिरज.