‘ओबीसींना आरक्षण मिळवून न दिल्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांना गावबंदी करू !’ – चंद्रशेखर बावनकुळे, भाजप

नागपूर येथे ‘ओबीसी आरक्षण’ रहित केल्याच्या विरोधात भाजपचे आंदोलन !

चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांमधील ओबीसींचे आरक्षण रहित झाले आहे. याला राज्य सरकार उत्तरदायी असल्याचा आरोप करून येथील भाजपच्या वतीने राज्य सरकारच्या निषेधार्थ येथील संविधान चौक येथे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली ३१ मे या दिवशी आंदोलन करण्यात आले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘‘राज्यात भाजपचे सरकार असतांना आरक्षण मिळावे, यासाठी अध्यादेश काढण्यात आला; मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये छगन भुजबळ, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे ओबीसी नेते असतांनाही त्यांनी अध्यादेशाकडे दुर्लक्ष केले. परिणामी आरक्षण रहित झाले आहे. सरकारने ३ मासांच्या आत आयोगाचे गठण करावे, जनगणना करून ओबीसींना आरक्षण मिळून द्यावे. असे न झाल्यास महाविकास आघाडीच्या नेत्यांना गावबंदी करू.’’