सप्तर्षींच्या आज्ञेने अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना आणि ध्वजारोहण या विधींचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘सप्तर्षींच्या आज्ञेने १४.५.२०२१ या दिवशी, म्हणजे अक्षय्य तृतीयेला सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या परिसरातील श्री तन्नोटमाता, त्रिनेत्र गणेश आणि व्यास शिळा यांच्या मंदिराच्या जवळ ६ मीटर उंचीच्या स्तंभावर भगव्या रंगाच्या धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. या भगव्या रंगाच्या कापडी ध्वजावर एका बाजूला सिंहासनावर बसलेल्या प्रभु श्रीरामाचे चित्र आणि दुसर्या बाजूला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रभु श्रीरामाच्या रूपातील चित्र आहे. या ध्वजाचे पूजन आणि त्याची स्थापना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केली. या विधींचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.
१. संकल्प
‘हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी श्री दुर्गादेवीचे स्वरूप असणारी श्री तन्नोटमाता, श्री गणेश, व्यास शिळा आणि सप्तर्षि यांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी प्रार्थना केली. त्यांनी केलेल्या प्रार्थनेमुळे निर्गुण स्तरावरील ईश्वरी शक्तीचा प्रवाह पृथ्वीच्या दिशेने प्रवाहित होऊन तो या तीन देवतांच्या माध्यमातून कार्यरत झाला आणि त्यानंतर तो प्रवाह धर्मध्वजामध्ये संक्रमित झाला.
२. गणपतिपूजन
श्री गणेशाचे पूजन केल्यावर त्याचे ‘ब्रह्मणस्पति’ हे रूप व्यष्टी स्तरावर कार्यरत होऊन पुष्कळ प्रमाणात ब्राह्मतेजाचे प्रक्षेपण झाले. त्यामुळे साधकांच्या कारणदेहावरील, म्हणजे बुद्धीवरील त्रासदायक आवरण न्यून होऊन त्यांच्या बुद्धीची प्रगल्भता वाढली. श्री गणेशाचे तत्त्व समष्टी स्तरावर विघ्नेशाच्या रूपाने कार्यरत होऊन क्षात्रतेजाचे प्रक्षेपण झाले. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील समस्त अडथळे आणि विघ्ने दूर होऊ लागली.
३. पुण्याहवाचन
पुरोहितांच्या मंगल वाणीतून ब्रह्मदेवानेच ध्वज स्थापनेचा संकल्प सिद्धीस जाण्याचा आशीर्वाद दिला. अशा प्रकारे पृथ्वीवर रामराज्य स्थापन होण्यासाठी ब्रह्मदेवानेच पुरोहितांच्या माध्यमातून आशीर्वाद दिल्याचे जाणवले.
४. धर्मध्वजाची स्थापना
प्रभु श्रीरामाचे चिन्ह असलेला भगव्या रंगाचा ध्वज हा ‘धर्मध्वज’ आहे. तो हिंदु राष्ट्राचे प्रतीक आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर स्थापन केलेल्या धर्मध्वजामध्ये धर्मशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती एकत्रितरित्या कार्यरत होऊन त्यांचे आश्रमाच्या वातावरणात प्रक्षेपण झाले. त्यामुळे केवळ रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातच नव्हे, तर देश-विदेशातील विविध ठिकाणी धर्मशक्तीचे केंद्र निर्माण झाले. त्यामुळे संपूर्ण विश्वात स्थुलातून हिंदु राष्ट्र (रामराज्य) निर्माण होण्यास साहाय्य होणार आहे.
५. धर्मध्वजाचे आरोहण
ध्वजाचे आरोहण केल्यावर श्री तन्नोटमाता, त्रिनेत्र गणेश आणि महर्षि व्यास यांची शिळा यांच्याकडून अनुक्रमे प्रक्षेपित होणारी धर्मशक्तीरूपी इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती यांचे एकत्रीकरण धर्मध्वजामध्ये झाले. ध्वजाचे आरोहण केल्यावर या तिन्ही शक्ती ध्वजाच्या माध्यमातून संपूर्ण वातावरणात तेज, वायू आणि आकाश या तत्त्वांच्या स्तरावर प्रक्षेपित होऊन वातावरणातील रज-तम गुणात्मक लहरींचे उच्चाटन झाले अन् संपूर्ण वातावरणाची शुद्धी झाली. तेजतत्त्वामुळे ध्वज दीप्तीमान दिसू लागला आणि या ध्वजातून पुष्कळ प्रमाणात केशरी रंगाचे किरण आसमंतात पसरतांना दिसले. वायुतत्त्वामुळे मनाला शीतल स्पर्श जाणवून भावजागृती झाली. आकाशतत्त्वामुळे श्रीविष्णूच्या हातातील पांचजन्य शंखाचा दीर्घ नाद ऐकू येऊन साधकांचे मनोदेह, कारणदेह आणि महाकारणदेह यांची शुद्धी झाली. त्यामुळे स्वर्गलोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक यांतून प्रक्षेपित होणार्या चैतन्यदायी लहरी पृथ्वीच्या दिशेने आकृष्ट झाल्या. त्यामुळे धर्मध्वजातून प्रक्षेपित होणार्या धर्मशक्तीच्या लहरी पृथ्वीवर सर्वत्र पसरल्या आणि सात्त्विक जिवांमध्ये धर्मबिजाचे रोपण झाले. त्यामुळे लवकरच सात्त्विक जिवांतील धर्मबिजातून धर्मशक्ती कार्यरत होऊन सर्वत्र ‘धर्मराज्य’, म्हणजे ‘रामराज्य’ किंवा ‘हिंदु राष्ट्र’ यांची स्थापना होणार आहे.
६. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धर्मध्वजाला प्रार्थना करणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी धर्मध्वजाला प्रार्थना केली. तेव्हा त्यांच्या मनातील समष्टी भाव आणि समष्टी कल्याणाची तळमळ पाहून प्रभु श्रीराम त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यानंतर धर्मध्वजावरील सिंहासनाधिष्ठित प्रभु श्रीरामांचे चित्र सजीव होऊन प्रभु श्रीरामाने त्यांचे अंशावतार असणार्या ‘श्रीरामस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात हिंदु राष्ट्राची (ईश्वरी राज्याची) स्थापना होणार आहे’, असा आशीर्वाद दिला.
कृतज्ञता
‘प्रभु श्रीरामाच्या कृपेमुळे धर्मध्वजाचे पूजन आणि त्याचे आरोहण केल्यावर सूक्ष्म स्तरावर काय परिणाम होतात ?’, हे अनुभवण्याची संधी मिळाली. यासाठी मी प्रभु श्रीरामाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.५.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |