जिल्ह्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संपावर

कोरोनाकाळात संपाचे हत्यार उपसणे कितपत योग्य आहे ? कोणताही संप म्हणजे हानीच ! ज्या काही समस्या असतील, त्या चर्चा करून सोडवल्यास जनतेचे हाल होणार नाहीत.

प्रतीकात्मक चित्र

सातारा, १ मे (वार्ता.) – स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक मागण्या सरकारदरबारी पडून आहेत. त्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत राज्यव्यापी संपाचे हत्यार या दुकानदारांनी उपसले आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संपावर जाणार आहेत, अशी माहिती सातारा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी दिली.

पाटील पुढे म्हणाले की, या संपामध्ये जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार सहभागी होणार आहेत. संपात सर्व दुकानदारांनी संघटीतपणे सहभागी व्हावे. संघटनेचे पुढील आदेश येईपर्यंत हा संप चालू ठेवावा. शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार दुकानदार नेहमीच सरकारला सहकार्य करत आहेत. अनेक वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्‍न शासनस्तरावर मांडले जात असून त्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. ते अद्याप मान्य न झाल्यामुळे संपावर जावे लागत आहे.