गुढीपाडव्यानिमित्त पुणे जिल्ह्यामध्ये केलेल्या ‘ऑनलाईन’ विहंगम धर्मप्रसाराच्या कार्याला जिज्ञासूंचा उदंड प्रतिसाद !

पुणे, १४ एप्रिल (वार्ता.) – गुढीपाडव्याचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व काय आहे ? धर्मशास्त्रानुसार आणि सध्याच्या आपत्काळात तो कसा साजरा करावा, हे लोकांना अवगत व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ माध्यमातून जिल्ह्यामध्ये विहंगम धर्मप्रसार चालू होता. ठिकठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रवचने, नामजप, फलक प्रसिद्धी यांच्या माध्यमातून अनेक जिज्ञासूंपर्यंत गुढीपाडव्याचे महत्त्व पोचवण्यात आले.

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, भोर, नाशिक रस्ता या भागांमध्ये गुढीपाडव्याचे महत्त्व सांगणारे ९० हून अधिक ‘ऑनलाईन’ प्रवचने घेण्यात आली. या प्रवचनांचा १ सहस्र ३०० हून अधिक जिज्ञासूंनी लाभ घेतला. तसेच कोरोना महामारीच्या काळात मनोबल वाढवणे आणि साधना करणे हे महत्त्वाचे झाल्याने ७८ हून अधिक ठिकाणी नामजपाचे आयोजन करण्यात आले होते. १५० हून अधिक सार्वजनिक, तसेच खासगी फलकांच्या माध्यमातून गुढीपाडव्याची शास्त्रीय, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक माहिती प्रसिद्ध करण्यात आली. सामाजिक माध्यमांवरूनही सनातन संस्थेने प्रसारित केलेले धर्मशास्त्र सांगणारे व्हिडिओ आणि प्रबोधनात्मक छायाचित्रे प्रसारित करण्यात आली. व्हॉट्सअपच्या माध्यमातून ५४ सहस्र ९९५ जणांनी तर फेसबूकच्या माध्यमातून ४ सहस्र ३४५ जणांनी याचा लाभ घेतला. तसेच विविध विषयांवरील धर्मशास्त्र सांगणारे व्हिडिओ ३ सहस्र ४०० जिज्ञासूंनी पाहिले.