तहसीलदारांच्या आश्‍वासनानंतर खाडीच्या पात्रातील अतिक्रमणाच्या विरोधातील रेवंडी ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित

आठ दिवसांत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याची चेतावणी

यावरून प्रशासनाला केवळ आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ?

रेवंडी ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित

मालवण – तालुक्यातील खालची रेवंडी येथील खाडीपात्रातील कांदळवनाची आणि पत्तन विभागाने बांधलेल्या बंधार्‍याची तोडफोड करून काही व्यक्तींनी खाडीपात्रात अतिक्रमण केले आहे. याविषयी तक्रार देऊनही कारवाई न झाल्याने संतप्त रेवंडीवासियांनी ५ एप्रिलला येथील खाडीपात्रात उतरून आंदोलन केले. याविषयी माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार अजय पाटणे यांनी घटनास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि अतिक्रमणाच्या विरोधात महसूल, वन अन् पत्तन विभाग यांच्याकडून कारवाई चालू असल्याचे पत्र ग्रामस्थांना दिले. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलन स्थगित करण्याची सूचनाही केली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी प्रशासनाला ८ दिवसांची मुदत देत ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले.

या वेळी ग्रामस्थांनी ‘८ दिवसांत कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, पत्तन विभाग, बंदर विभाग आणि वनविभाग यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली.