शिवाजी विद्यापिठाचा ६ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ दीक्षांत समारंभ !

 

कोल्हापूर – शिवाजी विद्यापिठाचा ५७ दीक्षांत समारंभ ६ एप्रिल या दिवशी ‘ऑनलाईन’ पद्धतीने होणार आहे. यंदा ७७ सहस्र ५४२ विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र घेणार आहेत, अशी माहिती कुलगुरु डॉ. टी.टी. शिर्के यांनी ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरु पुढे म्हणाले, ‘‘विद्यापिठाच्या राजर्षी शाहू सिनेट सभागृहात सकाळी ११ वाजता हा समारंभ होईल. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे उपस्थित रहाणार आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा ३५ सहस्र ५९७, वाणिज्य अन् व्यवस्थापन शाखा २१ सहस्र ९२७, मानव्यविद्या शाखा १७ सहस्र ८८३, तर आंतरविद्या शाखेच्या २ सहस्र १३५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र पोस्टाद्वारे वितरित केली जाणार आहेत.’’

‘ऑनलाईन’ दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी यू ट्यूबच्या लिंक विद्यापिठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कुलगुरु यांनी केले आहे.