सौ. अनुराधा निकम यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकाधारण, त्यांची प्रतिष्ठापना आणि पूजन सोहळ्यांच्या वेळी आलेल्या अनुभूती

६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अनुराधा निकम यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकाधारण, त्यांची प्रतिष्ठापना आणि पूजन सोहळ्यांच्या वेळी आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘१०.२.२०१९ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पादुकाधारण केल्या. नंतर १२.२.२०१९ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्या पादुकांची प्रतिष्ठापना करून पूजन केले. त्यानंतर १४.२.२०१९ या दिवशी साधकांच्या हृदयरूपी मंदिरात श्री गुरुपादुकांची स्थापना करण्याविषयी भाववृद्धी सत्संग झाला. त्या प्रसंगी त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सौ. अनुराधा निकम

१. ‘श्री गुरुपादुकाधारण कार्यक्रमाच्या प्रसंगी आलेल्या अनुभूती

अ. कार्यक्रमासाठी ध्वनीचित्रीकरण कक्षात जातांना मला उजवीकडील खोलीत नाग सूक्ष्मातून दिसत होते. तेव्हा ‘आज एवढे नाग सूक्ष्मातून का दिसत आहेत ?’, असा विचार माझ्या मनात आला.

आ. काही दिवसांपासून ‘या गुरुराया मम मंदिरा ।’ हे भजन मला सतत सूक्ष्मातून ऐकू येत होते. प्रत्यक्षात सोहळ्यापूर्वी ध्वनीक्षेपकावर हेच भजन ऐकवण्यात आले. त्यामुळे हे भजन ऐकतांना माझी भावजागृती झाली.

इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांशी पादुका ठेवून त्यांच्यावर पुष्पे अर्पण केली. त्या वेळी मला सूक्ष्मातून दिसले, ‘तिथे काळ्याभोर रंगाच्या २ शिवपिंड्या असून त्यांच्या आतील बाजूस नागदेवतांनी फणा काढला आहे अन् सद्गुरुद्वयी शिवपिंडीच्या बाजूला बसून पूजा करत आहेत.’

२. श्री गुरुपादुका प्रतिष्ठापना आणि पूजन सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती

अ. १२.२.२०१९ या दिवशी ‘दोन देवता काळ्या रंगाच्या २ शिवपिंड्यांची पूजा करत आहेत’ आणि स्थुलातील श्री गुरुपादुकांच्या अंगठ्याच्या ठिकाणी आतील बाजूस ‘सूक्ष्मातील नागदेवता शिवपिंडीवर बसल्या आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले.

आ. त्या वेळी मला अतिशय गारवा जाणवत होता आणि माझ्या मनाची निर्विचार स्थिती होती.

इ. गुरुपादुकांच्या अंगठ्याच्या ठिकाणी मला सतत सूक्ष्मातील नागदेवता दिसत होत्या.

ई. या सोहळ्याचे सूत्रसंचालन करणारे साधक श्री. विनायक शानभाग यांच्याभोवती २ – ३ फूट आकाराची प्रभावळ असल्याचे मला सूक्ष्मातून दिसत होते.

३. १४.२.२०१९ या दिवशी साधकांच्या हृदयरूपी मंदिरात श्री गुरुपादुकांची स्थापना करण्याविषयी झालेल्या भाववृद्धी सत्संगात आलेल्या अनुभूती

अ. सत्संग चालू असतांना ‘विसरूं कसा मी गुरुपादुकांना ।’, हे भजन मला अंतर्मनातून ऐकू येत होते.

आ. ‘मी गुरुचरणांना पादुकांसह घट्ट धरून ठेवले आहे’, असे मला वाटत होते.

इ. मला संपूर्ण सत्संगातच विदेही अवस्था जाणवली आणि त्या वेळी ‘डोळे उघडूच नयेत’, असे मला वाटत होते.

ई. त्या प्रसंगी मी पुष्कळ निर्विचार स्थिती आणि उच्च कोटीचा सत्संग अनुभवला.’

– सौ. अनुराधा निकम, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.२.२०१९)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक