संचारबंदीमुळे होळीचे कार्यक्रम रहित; मात्र किनार्‍यांवरील पार्ट्या, कॅसिनो, क्रूझ जहाज येथील गर्दीवर शासनाचे नियंत्रण नाही !

राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतरच्या जनतेच्या प्रतिक्रिया !

पणजी, २९ मार्च (वार्ता.) – कोेरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या कारणास्तव शासनाने राज्यभर १४४ कलम लागू केले आहे. या कारणामुळे सार्वजनिकरित्या होळी खेळण्यावर प्रतिबंध आला आहे. कोरोना महामारीमुळे शासनाने शासनपुरस्कृत शिमगोत्सवही रहित केला आहे; मात्र किनारी भागांत होणार्‍या पार्ट्या, तसेच पणजी येथील तरंगते कॅसिनो आणि क्रूझ जहाज या ठिकाणच्या गर्दीवर शासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. अशा पार्ट्यांची छायाचित्रे आणि चलचित्रे (व्हिडिओ) सामाजिक माध्यमांत प्रसारित करून अनेकांकडून शासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. याविषयी सामाजिक माध्यमांत पुढील प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

१. शासनाने संचारबंदी लावल्याने सार्वजनिक ठिकाणी होळी, ईस्टर, ईद उल फित्र, शब ए बरात आदी सण साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत; मात्र शासनाला कॅसिनोत होणारी गर्दी किंवा समुद्रकिनारी भागात होणार्‍या पार्ट्या कशा चालतात ?

२. शासनाने कला अकादमी, पणजी येथे ‘हुनर हट’ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यामध्ये विविध राज्यांतील ५०० हून अधिक कारागीर सहभाग झाले आहेत. हे प्रदर्शन ४ एप्रिलपर्यंत चालणार आहे आणि या ठिकाणी प्रतिदिन सायंकाळी मनोरंजनात्मक कार्यक्रम होतात आणि हे पहायला लोकांची गर्दी असते. या प्रदर्शनामुळेही संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार संचारबंदी लागू करण्यात येऊनही कोलवा समुद्रकिनार्‍यावर रविवार, २८ मार्च या दिवशी शेकडो पर्यटकांनी भेट दिली. विशेष म्हणजे या पर्यटकांनी संचारबंदीचे नियम सोडाच, तर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीचे मास्क घालणे, सामाजिक अंतर पाळणे या सर्वसाधारण नियमांचेही उल्लंघन केले. पर्यटकांवर देखरेख ठेवण्यासाठी शासन किंवा पोलीस यांची कोणतीही यंत्रणा या ठिकाणी नव्हती.

संचारबंदीवरून काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया

१. कोरोना महामारीसंबंधी सर्व नियमांचे पालन करून शासनाने शिमगोत्सवाला अनुज्ञप्ती द्यावी. रेव्ह पार्ट्या आणि कॅसिनो यांवर बंदी न घालता केवळ शिमगोत्सवावरच बंदी का ? – प्रा. सुभाष वेलिंगकर

२. मार्केटमध्ये लोकांची गर्दी असते. समुद्रकिनार्‍यांवर पार्ट्या सर्रासपणे चालू आहेत. समुद्रावर लोकांची गर्दी आहे; मग कोरोना महामारीचे कारण पुढे करून केवळ शिमगोत्सवच रहित का ?

– रिव्हॉल्युलुशनरी गोवन्स

३. चित्रकार सुबोध केरकर यांनी बिअरच्या बाटल्यांचा उशीसारखा वापर करून समुद्रकिनार्‍यावर झोपलेल्या पर्यटकांची छायाचित्रे सामाजिक माध्यमात प्रसारित केली आहेत. या छायाचित्रांवरून काँग्रेसचे गिरीश चोडणकर म्हणाले, ‘‘भाजप सरकार कायदा आणि सुव्यवस्था यांवर नियंत्रण ठेवू शकत नाही.’’