फाल्गुन कृष्ण पक्ष द्वितीया (३० मार्च २०२०) या तिथीला असलेल्या ‘तुकारामबीज’च्या निमित्ताने…
काही नास्तिक लोक हिंदु धर्माचे सर्व ग्रंथ खोटे ठरवून तर्काने ‘तुकाराम महाराजांचा खून झाला’, असे सांगत सुटले आहेत; पण तुकाराम महाराजांचा खून झाला नसून सदेह वैकुंठगमनच झाले.
१. वैकुंठगमनाचे तत्कालीन संतांनी लिहिलेले अभंग
अ. सकळही माझी बोळवण करा ।
परतोनि घरा जावे तुम्ही ॥
– संत तुकाराम
आ. माझ्या भावे केली जोडी ।नजरेशी कल्प कोडी ॥
आणियेले धाडी । आणिले अवघे वैैकुंठ ॥
– संत कान्होबा
इ. म्हणे रामेश्वर सकळा पुसोनि ।
गेला तो विमानी बैसोनिया ॥
– रामेश्वर भट्ट
ई. सांगोनिया गेले वैकुंठासी लोला ।
धन्य भाग्य तुका देखियेला ॥
प्रयाण काळी देवे विमान पाठविले ।
कलीच्या कालामाजी अद्भुत वर्तविले ।
मानव देह घेऊनी निजधामी गेले।
निळा म्हणे सकळ संत तोषविले ॥
– संत निळोबाराय
असे वैकुंठगमनाचे सहस्रो अभंग असतांना तुम्ही खून कशावरून ठरवता ?
२. श्रीमद्भागवतात आलेले वैकुंठाचे वर्णन
‘संत तुकाराम महाराज वैकुंठगमन कि खून’ या पुस्तकात सुदाम सावरकर म्हणतात, ‘‘या जगात वैकुंठच नाही !’’ तथापि वैकुंठाचे वर्णन हिंदूंच्या सर्व धर्मग्रंथांत आलेले आहे. श्रीमद्भागवतातील तिसर्या स्कंदात १५ व्या अध्यायात १३ ते ५० या श्लोकांमध्ये वैकुंठाचे वर्णन आहे. त्यामुळे सुदाम सावरकरांचे म्हणणे मूर्खपणाचे लक्षण आहे.
अ. त एकदा भगवतो वैकुण्ठस्यामलात्मनः ।
ययुर्वैकुण्ठनिलयं सर्वलोकनमस्कृतम् ॥
– श्रीमद्भागवत, स्कंध ३, अध्याय १५, श्लोक १३
अर्थ : एकदा ते (सनकादी ऋषि) भगवान श्रीविष्णूच्या पवित्र अशा वैकुंठलोकाला गेले. हा वैकुंठलोक सर्वांना वंदनीय आहे.
काही म्हणतात की, त्या वेळी विमान होते का ? विमानाचे वर्णनसुद्धा भागवतात आहे. ते असे की,
आ. वैमानिकाः सललनाश्चरितानि शश्वद् ।
– श्रीमद्भागवत, स्कंध ३, अध्याय १५, श्लोक १७
अर्थ : श्रीविष्णूच्या वैकुंठ लोकातील पार्षद त्यांच्या स्त्रियांसह विमानाने भ्रमण करत होते.
– ह.भ.प. शुभम महाराज वक्ते (ह.भ.प. वक्ते महाराज यांचे नातू), पंढरपूर.