‘कर्नाटक राज्यात धर्मप्रेमींसाठी साधनेविषयी सत्संग असतो. सत्संगात अनेक धर्मप्रेमी सहभागी असतात. सत्संगात गुरुकृपायोगानुसार साधना, गुरूंचे महत्त्व, सुख-दुःख इत्यादी विषय घेतले जातात. त्यामुळे त्यांच्यात पुष्कळ पालट जाणवतात. ते भावस्थितीत राहून अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. ते सत्संगात जसे सांगतात, तशी कृती करण्याचा प्रयत्न करतात. त्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. परात्पर गुरुदेव यांना प्रार्थना केल्यावर धर्मप्रेमी राजू यांना आलेला थकवा दूर होणे
हुबळीचे धर्मप्रेमी श्री. राजू हे प्रत्येक सेवेला भावाची जोड देऊन प्रयत्न करतात. एकदा त्यांना काही कामासाठी बाहेर ‘लॉज’मध्ये रहावे लागले. तिथे त्यांना सकाळी उठतांना पुष्कळ थकवा जाणवत होता; म्हणून ‘मला कोरोना झाला आहे का ? मग माझ्या परिवाराची स्थिती काय होईल ?’, असे विचार मनात येत होते. त्या वेळी त्यांनी गुरुदेवांच्या चरणी ‘गुरुदेवा, तुम्ही माझ्या समवेत आहात, तर तुम्हीच माझे रक्षण करा’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर त्यांना ५ मिनिटांसाठी झोप लागली. तेव्हा गुरुदेवांनी त्यांच्या शरिराला स्पर्श केला आणि आश्चर्य म्हणजे ५ मिनिटांनी ते झोपेतून उठल्यावर त्यांना वाटणारा थकवा निघून गेला होता. या प्रसंगामुळे श्री. राजूअण्णा यांची साधनेविषयी श्रद्धा पुष्कळ वाढली आहे.
२. परात्पर गुरुदेवांना समवेत घेऊन धर्मप्रेमी दिवाळी साजरी करणे
‘दिवाळीच्या दिवशी तुम्ही सर्वांनी कसा भाव ठेवला होता ?’, असे विचारले. तेव्हा श्री. राजूअण्णा म्हणाले, ‘‘या वेळी ‘आम्ही गुरुदेवांना घेऊनच दिवाळी साजरी करत आहोत’, असा भाव ठेवला होता.’’ इतर धर्मप्रेमींनी सांगितले, ‘‘या वेळी आम्ही दिवाळीचा अर्थ समजून घेऊन ती साजरी केली. त्यामुळे त्यातील आनंद आम्हाला अनुभवता आला.’’
३. धर्मप्रेमी डॉ. मंजुनाथ साधनेत आनंद घेत असणे
मैसुरूचे धर्मप्रेमी डॉ. मंजुनाथ (एका साधिकेचे पती) यांनी सांगितले, ‘‘मी माझ्या पत्नीला साधनेसाठी आरंभी साहाय्य करत नव्हतो; पण आता ती माझ्या साधनेचा आढावा घेते. त्यामुळे मी आता रुग्णालयात येणार्या रुग्णांना नामजप सांगतो. तेव्हा मला पुष्कळ आनंद मिळतो.’’
४. धर्मप्रेमी श्री. नीलेश यांची आपत्काळात तुम्ही जे सांगाल, ते ऐकण्याची सिद्धता असणे
एक धर्मप्रेमी श्री. नीलेश मला म्हणाले, ‘‘आपत्काळात जिथे साधक रहातील, तिथे मी रहाणार आहे. माझ्या आई-बाबांना मी माझ्या भावाच्या घरी ठेवतो; कारण मला साधनाच करायची आहे. तुम्ही जसे सांगाल, तसे मी करीन.’’ त्यांच्या या बोलण्यातून ‘त्यांची आपत्काळाची सिद्धता चांगली झाली आहे’, हे शिकायला मिळाले.
५. धर्मप्रेमी श्री. राजू यांना दसर्याच्या दिवशी सत्संगात साक्षात् देवीचे दर्शन देणे
धर्मप्रेमी श्री. राजू यांना दसर्याच्या दिवशी झालेल्या सत्संगातील भावार्चनेत ‘प्रत्यक्ष देवीचे दर्शन झाले’, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘मी प्रतिदिन ‘मला दर्शन दे’, अशी देवीला प्रार्थना करतो; पण दर्शन होत नव्हते. आज सत्संगात देवीने मला दर्शन दिले.’’
६. धर्मप्रेमींकडून शिकायला मिळालेली अन्य सूत्रे
अ. धर्मप्रेमी सत्संगात त्यांचे अनुभव सांगतात, तेव्हा त्यांची भावजागृती झालेली असते. ते भावस्थितीतच बोलत असतात.
आ. धर्मप्रेमींना पू. रमानंद गौडा यांचे मार्गदर्शन मिळते, तेव्हा ते संतांच्या मार्गदर्शनाचा लाभ करून घेतात आणि त्यांच्या चैतन्यमय वाणीने त्यांना साधना करण्यास स्फूर्ती मिळते.
इ. धर्मप्रेमींना काळानुसार साधनेचे महत्त्व लक्षात येत आहे. त्यांची अल्प कालावधीत भावजागृती होत आहे आणि त्यांच्यात पालट जाणवत आहे. त्यामुळे ‘हा सर्व काळाचा महिमा आहे’, असे लक्षात येते. ‘केवळ आणि केवळ गुरुदेवच त्यांना काळानुसार सिद्ध करत आहेत’, असे मला धर्मप्रेमींच्या माध्यमातून शिकायला मिळत आहे. त्यासाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. गुरुप्रसाद गौडा, मंगळुरू (२४.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |