पंढरपूर – पंढरपूर पोटनिवडणुकीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरवण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या एके ठिकाणी २१ मार्च या दिवशी झालेल्या कार्यक्रमाला कोरोनाचे नियम डावलून शेकडोंनी गर्दी जमा झाली होती. अखेर कोरोना नियमांचे पालन न झाल्याने शहर पोलिसांनी आयोजकांवर कोरोनाविषयक नियम तोडल्याचा गुन्हा नोंद केला. ही पोटनिवडणूक १३ एप्रिल या दिवशी होत असून २३ मार्चपासून उमेदवारी आवेदन दाखल होण्यास प्रारंभ होत आहे.
(कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पंढरपुरात आषाढी वारी झाली नाही. यानंतर माघ वारी झाली नाही. पंढरपुरात दुकानदार, सामान्य नागरिक, वारकरी यांच्यावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले गेले. हे सर्व निर्बंध वारकर्यांसह सामान्यांनी प्रशासनास सहकार्य म्हणून पाळले. याउलट राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते मात्र सामाजिक अंतराच्या नियमांची उघडउघड पायमल्ली करत असल्याचे दिसते. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाविषयक नियम हे केवळ वारकरी आणि सर्वसामान्यांसाठीच असतात काय ? असा प्रश्न सामान्यांच्या मनात उपस्थित झाल्यास नवल ते काय ? – संपादक)
दोन दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनी पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राबवण्याविषयी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, ‘नागरिक आणि पंढरपुरात येणारे वारकरी यांना ज्या कठोरपणाने कोरोना नियम लावण्यात आले, तसे नियम पोटनिवडणुकीच्या प्रसंगी होणार्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना लावणार का ?’ असा प्रश्न विचारला असता सर्वच अधिकारी निरुत्तर झाले होते. प्रशासनाची भूमिका मेळाव्याप्रसंगी दिसून आली. |