जीवनाचे सार असलेल्या श्रीमद्भगवद्गीतेचा शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये समावेश करणे आवश्यक ! – अभिनेत्री मौनी रॉय

  • एवढ्या मोठ्या चित्रपटसृष्टीत केवळ एखाद-दुसरी व्यक्तीच श्रीमद्भगवद्गीतेविषयी अशी मागणी करते, हे लक्षात घ्या ! मुळात अशी मागणीही करावी लागण्याची आवश्यकता नाही. केंद्रातील सरकारनेच असा निर्णय घेतला पाहिजे होता, असे हिंदूंना वाटते !
  • निधर्मी देशात धर्माला दूर ठेवण्यात आल्याने समाजाची नैतिकता अधोगतीला गेली आहे. तिला पुन्हा स्थापित करण्यासाठी धर्मशिक्षणाला आणि साधनेला पर्याय नाही !

मुंबई – दळणवळण बंदीच्या काळात मी पुष्कळ धार्मिक झाले होते. त्या वेळी मी माझा मित्र घेत असलेल्या गीतेच्या वर्गांमध्ये सहभागी झाले होते. मला वाटते की, शाळेच्या अभ्यासक्रमामध्ये श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश केला पाहिजे. हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवनाचे सार आहे. त्यात खरे ज्ञान आहे. कोणताही प्रश्‍न असला, तरी गीतेमध्ये त्याचे उत्तर मिळतेच, असे प्रतिपादन अभिनेत्री मौनी रॉय यांनी एका वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

मौनी रॉय यांनी म्हटले की,

१. लहानपणापासून आमच्या घरात गीतेचे पठण केले जात होते. मी तेव्हा गीता वाचण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्या वेळी मला अधिक काही कळत नव्हते; मात्र आता मला श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व लक्षात आले असून संपूर्ण जगामध्ये त्याचा प्रसार करण्यासाठी मी काम करत आहे.

२. चित्रपटसृष्टीमध्ये काम करणार्‍या प्रत्येकाने गीता वाचली पाहिजे; कारण या क्षेत्रात व्यक्ती इतकी व्यस्त होऊन जाते की, ती स्वतःला विसरते. अशा वेळी गीता साहाय्य करू शकते.

३. आम्ही अक्षरशः अज्ञानामध्ये जगत आहोत. खरेतर आपण वेद, उपनिषदे आदी ग्रंथ असलेल्या देशातील आहोत आणि तरीही आपण काहीही करत नाही. गाव असो कि शहर सर्वांना गीतेची अत्यंत आवश्यकता आहे.