१. पाय दुखत असतांना नृत्याचा सराव केल्यावर उपाय होऊन त्रास अल्प होणे
‘१६.४.२०२० या दिवशी माझे पाय पुष्कळ दुखत होते. मला आसंदीवरही बसता येत नव्हते. मला मांड्यांमध्ये अधिक वेदना जाणवत होत्या. सत्संग संपल्यावर मी एक घंटा नृत्याचा सराव केला आणि मला होणार्या वेदना पूर्णपणे थांबल्या. ‘नृत्याचा सराव करतांना सूक्ष्मातून माझ्या पायातून काहीतरी जड पदार्थ वितळून खाली पडत आहे’, असे मला जाणवले आणि पायाच्या शिरा मोकळ्या झाल्या. ही अनुभूती मी सहसाधिकेला सांगितली. त्या वेळी ती म्हणाली, ‘‘माझेही पाय दुखत होते. मी वेदनाशामक गोळ्या घेतल्या, तरी ते दुखायचे थांबले नाहीत; म्हणून मी सराव केला आणि त्रासाची तीव्रता अल्प झाली.’’ त्या वेळी ‘सरावाचा कालावधी नामजपादी उपायांच्या कालावधीत धरू शकता’, असे एका संतांनी सांगितले होते, त्याची प्रचीती आली.
२. नृत्याचा सराव करतांना हलके वाटणे आणि आध्यात्मिक लाभ होणे
१७.४.२०२० या दिवशी मी नृत्याचा सराव करत होते. त्या वेळी मी हातांची हालचाल एक-दोन मिनिटे केली, तरी ‘ते माझ्या शरिराचे अवयव आहेत’, असे मला जाणवत नव्हते, इतके ते हलके हलके वाटत होते. वार्यावर कागद उडालेला पहातांना जसे हलके वाटते, तसे मला वाटत होते. त्या दिवशी नृत्याचा सराव करतांना हलकेपणाची जाणीव दोनदा झाली आणि आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात झाल्याचे लक्षात आले.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या बालरूपातील आनंदलहरी मिळाल्यामुळे आध्यात्मिक लाभ होणे
१२.४.२०२० या दिवशी मी सराव करत असतांना पठणाला आलेले बालसाधक तेथे बसले होते. त्यांना पाहून ‘हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बालरूप आहे’, असे मला वाटले. मी त्यांच्यासमोर ६ ते ७ मिनिटे नृत्य केले, तरी एक घंटा नृत्य केल्यानंतर जसे लाभ होतात, तसे लाभ झाल्याचे मला जाणवले. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या बालरूपातील आनंदलहरी माझ्याकडे येत आहेत’, असे मला वाटले.’
– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |