‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकाला आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. पूर्वी नामजप करतांना देवतांची रूपे डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करणे; मात्र वैखरीतून होणारा नामजप मनातल्या मनात होऊ लागल्यावर त्याची आवश्यकता न भासणे आणि आता नामजप करतांना परात्पर गुरुदेवांचे सूक्ष्मातून दर्शन होणे

‘देवाच्या आणि गुरुदेवांच्या कृपेने माझी साधना चांगली चालली आहे. वर्ष २०१८ च्या मध्यापासून माझा आतून (मनातल्या मनात) अखंड नामजप होत आहे. हे सर्व मी विस्तृतपणे शब्दांत मांडू शकत नाही. संकेतस्थळावरील लेख पुनःपुन्हा वाचल्यामुळे माझ्या मनातील शंकांचे विनासायास निरसन होत आहे. ‘देवच चिंतन करवून घेतो आणि शंका दूर करतो’, असे मला वाटते. ‘देवाशी बोलणे’ हा माझा सर्वांत आवडता छंद आहे. गेले काही दिवस मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून दर्शन होत आहे. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते. पूर्वी मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या जपाच्या समवेत कुलदेवीचा आणि हनुमंताचा जप करतांना त्या त्या देवतांची रूपे डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असे; मात्र जसजसा माझा वैखरीतून होणारा नामजप मनातल्या मनात (मध्यमेतून) होऊ लागला, तसतशी मला देवतांची रूपे डोळ्यांसमोर आणण्याची आवश्यकता उरली नाही. सध्या मी नामजप करतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्मातून दर्शन होते. माझ्यासाठी ही एक नवीन अनुभूती आहे. त्या वेळी ‘परात्पर गुरुदेव सुहास्य मुद्रेने माझ्याकडे पहात आहेत’, असे मला जाणवते. मी त्यांना कधीही भेटलेलो नाही. मी संकेतस्थळावरील लेख वाचतो आणि ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकतो.

२. काल मला एक स्वप्न पडले. त्यात मला ‘मी परात्पर गुरुदेवांच्या समोर बसलो आहे’, असे दृश्य दिसले. दुसर्‍या दिवशी सकाळी मला जाग आली. तेव्हा ‘हनुमंताच्या नामजपाऐवजी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप होत आहे’, असे माझ्या लक्षात आले.’

– एक साधक, सोलन, भारत.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या  वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक