सातारा, १४ मार्च (वार्ता.) – वाहतूकदारांनी खर्चावर आधारीत भाडे निश्चित करण्याविषयी मोटार वाहन कायद्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. इंधन (डिझेल) दरवाढ अल्प करणे आणि व्यवसायवृद्धीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याविषयी सरकारला १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. इंधन दरवाढीविषयी योग्य निर्णय न झाल्यास भविष्यात वाहतुकदारांना कठोर निर्णय घावा लागेल. तसेच देशभर आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी ‘ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस’चे अध्यक्ष कुलतरणसिंग अटवाल यांनी दिली.
‘ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस’चे माजी अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा आणि तालुका पातळीवरील ‘चालक-मालक वाहतूकदार भेट आणि सदस्य वृद्धी’ या देशव्यापी अभियानाच्या प्रथम टप्प्यास प्रारंभ सातारा येथून झाला.
या वेळी मान्यवरांनी मांडलेली सूत्रे खालीलप्रमाणे . . .
१. हमालांची मोनोपॉली मोडीत काढत ज्याचा माल त्याचा हमाल ही व्यवस्था निर्माण करण्यात यावी. तसेच महामार्गावरील माल वाहतुकीचा त्रास आणि असुविधा दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावा.
२. सरकार जनतेचे प्रश्न ऐकून आणि समजून घेण्याच्या मन:स्थितीत नाही. फास्टॅगमुळे टोलवसुली वाढत चालली आहे. या सर्वांवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा.
३. १५ वर्षांहून जुन्या वाहनांना सरकारने भंगारात काढण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे जेष्ठ वाहतूकदार देशोधडीला लागण्याची शक्यता आहे.