५ जुलैला मुंबई येथे पावसाळी अधिवेशन
मुंबई, ११ मार्च (वार्ता.) – गेल्या १ मार्चपासून चालू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे १० मार्च या दिवशी सूप वाजले. पुढील अधिवेशन ५ जुलै या दिवशी मुंबई येथे घेण्यात येईल, असे विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी घोषित केले. कोरोनाचे संकट असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी अल्प करण्यात आला होता. त्यामुळे या अधिवेशनातून राज्याच्या विकासासाठी फारसे काही साध्य करता आले नाही.
कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली असल्याने, तसेच तिजोरीत खडखडाट असल्याने राज्यातील सर्व क्षेत्रांतील विकासकामांवर मोठ्या रकमेची तरतूद करण्यात आलेली नाही, हे सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरून दिसून येते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरासरी कामकाज ५ घंटे चालले. प्रत्यक्ष कामकाज ८ घंटे ४८ मिनिटे झाले. एकूण कामकाजातील ३ घंटे वाया गेले. ३४८ प्रश्नांपैकी २९ अनुत्तरीत राहिले.