आज शिवशक्ती यागास प्रारंभ
पिंगुळी – प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचा ७६ वा वाढदिवस आणि त्यांच्या विवाहाचा ५० वा वाढदिवस, येथील श्री गौरीशंकर मंदिराचा २६ वा वर्धापनदिन आणि महाशिवरात्री यांचे औचित्य साधून येथील प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात ‘शिवशक्ती यागा’चे आयोजन करण्यात आले आहे. १० मार्चला या यागाला येथे प्रारंभ होणार आहे. हा मंगलमय सोहळा कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करून मर्यादित भक्तांच्या उपस्थितीत होणार आहे.
१० मार्चला पहाटे काकड आरती, सकाळी ७ वाजता प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या समाधीचे पूजन आणि अभिषेक होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता ‘शिवशक्ती यागा’ला ग्रामपुरोहित श्री. दुर्गाप्रसाद दांडेकर, याज्ञिक महादेव गाडगीळ आणि १२ ब्रह्मवृंद यांच्या उपस्थितीत अन् भक्तीमय वातावरणात प्रारंभ होणार आहे. या वेळी विष्णुसहस्रनाम जप, यागाच्या अंतर्गत धार्मिक विधी, १ सहस्र १०८ वेळा कुंकूमार्चन, १२१ कमळपुष्प पूजा, आरती, मंत्रपुष्प, दुपारी १२ वाजता श्रींची आरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता सांजआरती आणि पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम होणार आहेत. हे सर्व कार्यक्रम कोरोनाच्या अनुषंगाने सामाजिक अंतर पाळणे, मास्क, सॅनिटायझर, थर्मल चेकिंग आणि अन्य सर्व नियम पाळून मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी भाविकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांनी केले आहे.
जागतिक महिलादिनानिमित्त ४०० महिलांना साड्या वाटण्याचा संकल्प
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज आणि प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांचे जन्मस्थान असलेले पिंगुळी गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील महिलांना एकूण ४०० साड्या वितरण करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचा शुभारंभ ८ मार्च या जागतिक महिलादिनाच्या दिवशी प.पू. सद्गुरु समर्थ विनायक (अण्णा) राऊळ महाराज यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.