अमली पदार्थ नियंत्रण विभागाने गोव्यात ठिकठिकाणी घातलेल्या छापासत्रात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ कह्यात

अमली पदार्थ कायदा कमकुवत असल्याने कह्यात घेतलेले व्यावसायिक विनासायास जामिनावर सुटतात आणि पुन्हा तोच व्यवहार आणखी सुरक्षिततेने आणि सतर्कतेने मोठ्या प्रमाणात करतात. यासाठी केवळ छापासत्रांवर समाधान न मानता अमली पदार्थांविषयीचे कायदे कठोर आणि सक्षम करणे आवश्यक आहे !

पणजी, ८ मार्च (वार्ता.) – अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो) गोवा आणि मुंबई शाखेने संयुक्तपणे गोव्यात गेल्या काही दिवसांत छापासत्र आरंभून यामध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. या छापासत्रात २ विदेशींसह अनेक अमली पदार्थ व्यावसायिकांना कह्यात घेण्यात आले आहे.


७ आणि ८ मार्च असे दोन दिवस मझलवाडा, आसगाव येथे छापा टाकण्यात आला आणि यामध्ये ‘एल्.एस्.डी.’चे ४१ ‘ब्लॉट्स’, २८ ग्रॅम चरस, २२ ग्रॅम कोकेन, १ किलो १०० ग्रॅम गांजा, १६० ग्रॅम पांढर्‍या रंगाची पूड आणि ५०० ग्रॅम ‘ब्ल्यू क्रिस्टल’ पदार्थ आणि १० सहस्र रुपये भारतीय चलन कह्यात घेण्यात आले. या प्रकरणी उब्दाबुको (नायजेरियन नागरिक), जॉन आणि डॅव्हीड (कोंगो येथील नागरिक) यांना कह्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी उब्दाबुको याला गोवा पोलिसांनी एकदा कह्यात घेतले होते. त्यानंतर अमली पदार्थ नियंत्रण विभागाने ८ मार्च या दिवशी कुख्यात गुंड प्रसाद वाळके यांच्या रहात्या घरी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर ‘एल्.एस्.डी.’चे ‘ब्लॉट्स’ कह्यात घेतले आहेत.

याविषयी अधिक माहिती देतांना ‘आय.आर्.एस्.’ विभागाचे पदाधिकारी समीर वानखेडे म्हणाले, ‘‘अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे पथक कुख्यात गुंड प्रसाद वाळके आणि त्याचे सहकारी यांच्या शोधात आहेत. विविध प्रकारचे अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी वर्ष २०१८ मध्ये प्रसाद वाळके याच्या विरोधात यापूर्वीच गुन्हा प्रविष्ट झालेला आहे.’’ अमली पदार्थ नियंत्रण विभागाने ७ मार्च या दिवशी मिरामार येथील अमली पदार्थ व्यावसायिक हेमंत साहा उपाख्य ‘महाराजा’ याला कह्यात घेतले आहे. हेमंत साहा हा मूळचा मध्यप्रदेश येथील असून तो गेली अनेक वर्षे मोरजी भागात ‘बुयेना वीदा’ या नावाने शॅक चालवत होता. हेमंत साहा रहात असलेल्या जागेतून १५ ‘एल्.एस्.डी.’चे  ‘ब्लॉट्स’ आणि ३० ग्रॅम चरस कह्यात घेण्यात आले आहे.’’