‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य अन् आध्यात्मिक संशोधन’ या ग्रंथासंदर्भात धर्माभिमानी श्री. राजू धरियण्णवर यांना आलेल्या अनुभूती !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य अन् आध्यात्मिक संशोधन’ या ग्रंथासंदर्भात हुब्बळ्ळी येथील धर्माभिमानी श्री. राजू धरियण्णवर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. मुखपृष्ठावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून ‘ते प्रत्यक्ष समोर आहेत’, असे वाटून भावाश्रू येणे आणि गुरुदेवांचे आशीर्वाद देत असलेले छायाचित्र पाहून स्वतः धन्य झाल्याचे वाटून सुरक्षित वाटणे

श्री. राजू धरियण्णवर

‘७.१.२०२१ (गुरुवार) या दिवशी हुब्बळ्ळी येथील एका साधकाकडून मला ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य अन् आध्यात्मिक संशोधन’ हा ग्रंथ मिळाला. मी त्या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहिले आणि माझ्या डोळ्यांत भावाश्रू आले. ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) प्रत्यक्ष माझ्यासमोर उभे आहेत’, असे मला वाटले. त्या वेळी मला माझ्या डोक्यावर आणि नंतर माझ्या शरिराच्या वरील भागांत मुंग्या आल्याप्रमाणे जाणवले. ‘ग्रंथातील आतील पानांवरील छायाचित्रे आणि त्यांच्या खालील लिखाण यांतून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने येत आहेत’, असे मला जाणवले. त्यांपैकी गुरुदेवांचे आशीर्वाद देत असलेले छायाचित्र पहातांना ‘मी धन्य झालो’, असे वाटून मला सुरक्षितही वाटले.

माझी मुलगी ५ व्या इयत्तेत शिकत आहे. मी तिला ते छायाचित्र दाखवले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘मला पुष्कळ सकारात्मक वाटत आहे. त्यांच्यामुळे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे) आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, तसेच तेच आपले रक्षण करणार आहेत.’’

२. स्वतःला दर्शन देण्यासाठी गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर ते रात्री स्वप्नात येऊन स्मित करत असल्याचे दिसणे

त्या रात्री झोपण्यापूर्वी मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘तुम्ही सर्वत्र आहात. तुम्ही माझ्या घरी आला आहात. कृपा करून मला तुमचे दर्शन द्या.’ त्या रात्री गुरुदेव माझ्या स्वप्नात आले. ‘ते माझ्याकडे पहात हात हलवत स्मित करत आहेत’, असे मला दिसले.

‘गुरुदेव सूक्ष्मातून माझे संरक्षण करत आहेत आणि ईश्‍वरप्राप्तीसाठी मला मार्गदर्शन करत आहेत’, असे मला वाटते. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोमल चरणकमली कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. राजू धरियण्णवर, हुब्बळ्ळी, कर्नाटक. (२५.१.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक