संभाजीनगर येथील पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांना आलेल्या अनुभूती आणि अनुभूती विज्ञानवाद्यांना न सांगण्यामागील कारण

संभाजीनगर येथील पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांना आलेल्या आध्यात्मिक स्तरावरील अनुभूती आणि स्वतःच्या अनुभूती विज्ञानवाद्यांना न सांगण्यामागील त्यांनी सांगितलेले कारण

पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर

१. साधकांनी स्वतःच्या अनुभूतींच्या छायेत आणि आनंदात अध्यात्माचा पुढील प्रवास करावा; पण ‘मला अनुभूती येते’, हा इतरांना पटवून देण्याचा अट्टहास करू नये !

‘अनेक साधकांना त्यांच्या साधनेच्या प्रवासात अनुभूती येत असतात. या अनुभूतीचा आनंद त्यांनी घ्यावा आणि त्या अनुभूतींच्या छायेत अध्यात्माचा स्वत:चा पुढील प्रवास करावा. अनेक वेळा मलाही अशा अनुभूती आल्या आहेत. ‘मला अनुभूती येते’, हा इतरांना पटवून देण्याचा अट्टहास करू नये. तुम्ही ज्यांच्याशी बोलता, ती माणसे तुमच्या या विचारांशी तर सोडाच; परंतु तुमच्या आध्यात्मिक प्रवासाच्या प्रयत्नांशीसुद्धा सहमत असतीलच किंवा तुमच्याविषयी त्यांना सहानुभूती असेलच, असे नसते. त्यामुळे तुम्ही तुमच्या अनुभूती त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, तर तुमची टिंगलटवाळी किंवा टर उडवली जाण्याची शक्यता असते. ‘ही तुमची अनुभूती नसून हा योगायोग आहे’, असा तर्क ते मांडू शकतात. अशा वेळी दुसर्‍याच्या तर्काचा नम्रपणे स्वीकार करावा आणि स्वत:ची अनुभूती स्वत:च्या मनात ठेवावी. शक्य असल्यास ज्यांचा यावर विश्‍वास नाही किंवा जे स्वतःला ‘विज्ञानवादी’ इत्यादी म्हणवतात, अशांशी या विषयावर चर्चा करू नये.

२. जीवनात आलेल्या काही अनुभूती

२ अ. पहिली अनुभूती आणि तिचे आध्यात्मिक अन् विज्ञानवाद्यांसाठी बौद्धिक स्तरावरील विश्‍लेषण

२ अ १. डोळ्यांमध्ये समस्या निर्माण झाल्याने काही दिवस अंधत्व येणे, उपचारांनंतर हळूहळू दिसू लागणे; मात्र दैनिक ‘सनातन प्रभात’ सोडून अन्य वर्तमानपत्रांतील लिखाण वाचता न येणे : माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये बर्‍याच समस्या निर्माण झाल्या होत्या. पहिले ५ – ६ दिवस मी दोन्ही डोळ्यांनी पूर्ण आंधळा होतो. उपचार चालू झाल्यावर मला हळूहळू एका डोळ्याने दिसू लागले. दुसर्‍या डोळ्याचे शस्त्रकर्म झाले असल्यामुळे दीड मासाने दुसर्‍या डोळ्याने दिसू लागले; परंतु दोन्ही डोळ्यांचा केंद्रबिंदू (Focus) व्यवस्थित केंद्रीभूत होत नव्हता. आरंभी मी माझ्या नातवंडांकडून दैनिकातील शीर्षक वाचून घेत असे. नंतर एक भिंग (Magnifying glass) आणून छोटी शीर्षके वाचण्याचा प्रयत्न करू लागलो. माझ्याकडे इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांतील अनेक वृत्तपत्रे येतात. साधारण ४ मास पूर्ण झाल्यावर मी सगळ्या दैनिकांतील लिखाण वाचण्याचा प्रयत्न केला; पण अडचण अशी येत होती की, इतर कुठल्याही दैनिकातील लिखाण उपनेत्र (चष्मा) लावूनही मला वाचता येत नव्हते; पण ‘सनातन प्रभात’मधील लिखाण मात्र मला व्यवस्थित वाचता येत होते.

२ अ २. ‘सनातन प्रभात’मध्ये असलेल्या चैतन्यामुळे तो वाचता येणे; मात्र हे इतरांना पटणे शक्य नसल्याने त्यांना बौद्धिक स्तरावरील कारण सांगणे : माझा हा अनुभव मी इतरांना सांगण्याचा प्रयत्न केला नाही. याचे कारण असे की, ते इतरांना पटणे शक्य नाही. ते असे सांगतील, ‘तुम्हाला ‘सनातन प्रभात’ वाचण्याची हौस आहे; म्हणून तुम्हाला तो वाचता येतो आणि इतर दैनिकांकडे तुम्ही एवढे लक्ष देत नाही; म्हणून तुम्हाला ती वाचता येत नाहीत.’ त्यांच्यासाठी मी असे सांगेन, ‘सनातन प्रभात’चा अंक कच्च्या कागदावर छापला जातो. त्यावरील अक्षरे (Contrast) स्पष्ट दिसतात; म्हणून मला तो वाचता येतो.’ केवळ ‘सनातन प्रभात’मधील लिखाण मला का वाचता येते ? इतर लिखाण का वाचता येत नाही ?’, तर ‘सनातन प्रभात’ मध्ये जी एक आध्यात्मिक शक्ती आहे किंवा त्यामध्ये जे काही चैतन्य आहे, त्यामुळे मला तो अंक वाचता येतो’, अशी माझी स्वतःची अनुभूती आहे आणि तिच्यावर माझा विश्‍वास आहे. इतरांचा त्यावर विश्‍वास बसणे शक्य नाही.

२ आ. दुसरी अनुभूती आणि तिचे आध्यात्मिक अन् बौद्धिक स्तरावरील विश्‍लेषण

२ आ १. अ‍ॅलोपॅथीची पुष्कळ औषध घ्यावी लागल्याने श्रवणशक्तीवर परिणाम होणे, कर्णयंत्र लावूनही फारसा उपयोग न होणे; मात्र गोव्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत बोलतांना त्यांचे बोलणे व्यवस्थित ऐकू येणे : या ३ – ४ मासांच्या कालावधीत मला ‘अ‍ॅलोपॅथी’ची ‘स्टिरॉईड’पासून ‘अ‍ॅन्टिबायोटिक’पर्यंत पुष्कळ औषधे घ्यावी लागली. या सगळ्याचा दुष्परिणाम माझ्या ऐकण्याच्या शक्तीवर झाला. मला नीट ऐकू येत नाही; म्हणून मी बरेच महाग असे कर्णयंत्र लावतो, तरीही फारसा पालट झालेला नाही. त्यामुळे कुणीही बोलले, तरी ‘मला ऐकू येत नाही’, ही माझी समस्या होती. जेव्हा मी गोव्याला निघालो, तेव्हा माझ्या मनात येत होते, ‘आपण रामनाथी आश्रमात चाललो आहे. तिथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलतांना मला ऐकू येईल का ?’ नंतर परात्पर गुरु डॉक्टरांशी बोलतांना माझ्या लक्षात आले, ‘त्यांचे बोलणे मला स्पष्ट ऐकू येत आहे.’

२ आ २. परात्पर गुरु डॉक्टरांचे बोलणे ऐकू येण्यामागील विज्ञानवाद्यांना पटावे; म्हणून सांगायचे बौद्धिक कारण : यावर एखादा विज्ञानवादी म्हणेल, ‘तुम्हाला डॉ. आठवले यांचेच बोलणे कसे स्पष्ट ऐकू येते ?’ मी त्या विज्ञानवाद्यांना असे सांगू शकतो, ‘संभाजीनगरसारख्या लांब ठिकाणाहून एक साधक आले आहेत. ‘त्यांचे म्हणणे आपण नीट ऐकून घेतले पाहिजे आणि आपले म्हणणे त्यांना ऐकवायला पाहिजे’, या परात्पर गुरु डॉक्टरांच्या तळमळीतून अन् विचारांतून त्यांनी मला ‘कुठल्या कानाने नीट ऐकू येते ?’, असे विचारले. त्यानुसार आसंदी त्या बाजूने फिरवून घ्यायला सांगितली. ‘मला नीट समजावे’, या तळमळीने ते कदाचित् व्यवस्थित आणि स्पष्ट बोलत असावेत; म्हणून मला त्यांचे सर्व बोलणे ऐकू येत होते.

२ आ ३. आध्यात्मिक कारण – परात्पर गुरु डॉक्टरांशी होणार्‍या संवादामध्ये त्यांच्या बोलण्यात असणार्‍या शक्तीमुळे त्यांचे बोलणे व्यवस्थित ऐकू येणे : त्या वेळची माझी स्वतःची अनुभूती अशी आहे की, इतरांच्या बोलण्याकडे माझे लक्ष नव्हते; परंतु परात्पर गुरु डॉक्टर माझ्याशी बोलत असतांना त्यांचे बोलणे मी लक्षपूर्वक ऐकत असल्याने मला ते ऐकू येत असावे किंवा त्यांच्या माझ्याशी होणार्‍या संवादामध्ये अशी एखादी शक्ती असावी की, तिच्यामुळे मला व्यवस्थित ऐकू येत होते.’ हा तिसरा माझा विचार जो मी आता मांडला आहे, ती माझी अनुभूती आहे. ही अनुभूती मी माझ्या मनाशी ठेवतो आणि त्याचा आनंद घेतो. इतरांना सांगतांना मात्र ‘मला अशी अनुभूती आली, माझे असे आहे’, इत्यादी सांगितले की, टिंगलटवाळी होण्याची शक्यता असते; म्हणून आपल्या अनुभूतीचा आनंद आपणच घ्यायचा असतो.

२ इ. एका संप्रदायाच्या प्रमुख स्वामीजींनी हिंदु देवस्थानांच्या कायद्यासंबंधी एका निवृत्त मुख्य न्यायाधिशांना भेटण्यास सांगणे, त्यांच्या भेटीविषयी मनात साशंकता निर्माण होणे; पण स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे खरोखर त्यांच्याशी भेट होणे : मला माझ्या आयुष्यामध्ये यापूर्वीही अशाच १ – २ अनुभूती आल्या आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे त्या दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये प्रसिद्धही झाल्या आहेत. त्यापैकी एक अनुभूती म्हणजे, एका संप्रदायाच्या प्रमुख स्वामीजींशी हासन (कर्नाटक राज्य) जिल्ह्यातील होळे, नरसिंगपूर येथे माझी भेट झाली होती. त्या वेळी मी त्यांच्याशी हिंदु देवस्थानांच्या कायद्यासंबंधी बोललो. त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही बेंगळुरूला चालला आहात, तर तिथे निवृत्त मुख्य न्यायाधिशांना (जे नंतर काही काळ राज्यपाल होते) भेटा आणि तुम्ही जे काही मला सांगितले, ते त्यांनाही सांगा.’’ ‘त्यांची अशी कशी भेट होईल ?’

असे वाटून मी त्यांच्या भेटीविषयी साशंक होतो. मी प्रमुख स्वामीजींना तसे बोलूनही दाखवले. तेव्हा ते एवढेच म्हणाले, ‘‘हो जाएगा ।’’ आणि खरंच नंतर माझी त्यांच्याशी भेट झाली.

माझ्या आयुष्यात मला अशा अनुभूती पुष्कळ आल्या आहेत. या अनुभूती मी माझ्या मनात ठेवतो. त्या दुसर्‍यांना सांगायचा प्रयत्न करत नाही. धन्यवाद !’

– (पू.) श्री. सुधाकर चपळगावकर, अधिवक्ता, उच्च न्यायालय (निवृत्त जिल्हा न्यायाधीश)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक