अमेरिकेत शिवराज्याभिषेक ; शिवजयंतीनिमित्त मराठी बांधवांकडून महानाट्य

अख्खे शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत

अमेरिका – येथील कनेक्टिकटमधील DARHCT (देसीज आरौन्ड रॉकी हिल कनेक्टिकट) संस्था आणि कनेक्टिकट मराठी मंडळाच्या (CTMM) चमूने २० फेब्रुवारी या दिवशी अख्खे शिवचरित्र ३५ मिनिटांत नाट्य स्वरूपात प्रस्तुत केले. शिवजन्मापासून स्वराज्य स्थापनेच्या राज्याभिषेक सोहोळ्यापर्यंत सर्व घटनांचा समावेश असलेला बहुमाध्यमिक म्हणजे नाच, पोवाडे, नाट्य, देशी खेळ समाविष्ट असलेले फिरोदिया करंडकाच्या स्वरूपात केलेला कलाविष्कार प्रत्यक्ष उपस्थित प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. कोरोना काळातली सगळी बंधने आणि काळजी घेऊन आयोजित केलेला हा कार्यक्रम न्यू जर्सी मध्ये मल्लखांब फेडेरेशन यूएसए आणि इंडियन कॉन्सुलेट (भारतीय दुतावासाने) यांनी शिवजयंतीनिमित्त आयोजित केला होता.

या शिवसोहळ्याचा प्रारंभ २० जानेवारी या दिवशी झाली. इतक्या अल्प वेळेत आणि सद्य परिस्थितीच्या मर्यादांमध्ये उभी राहिलेली ही कलाकृती हे एक आश्‍चर्य म्हणण्यासारखे आहे. केवळ ३ पूर्ण तालमी आणि प्रतिदिन केलेले झूम आणि व्हॉट्सअँप कॉल्स यांनी हे नाटक उभे राहिले. मल्लखांब संघटनेशी संलग्न असलेले श्री. उपेंद्र वाटवे यांनी या प्रस्तावित कार्यक्रमाची कल्पना DARHCT च्या टीमला दिली होती. संकल्पना आणि संहिता लिहिण्याचे काम गौतम नाईक आणि प्राजक्ता दीक्षित यांनी चालू केले. संयोजनामध्ये दुर्गेश जोशी, किरण परांजपे आणि मुकुंद आवटी यांनी मुख्य हातभार लावला.

तिथे जमलेल्या प्रेक्षकांना या प्रयोगांनी शिवकाळात नेऊन ठेवले. ह्या कार्यक्रमाला उपस्थित असेलेले भारताचे कॉऊंसेल जनरल श्री. रणधीर जैस्वाल यांनी या कार्यक्रमाचे पुष्कळ कौतुक केले. मल्लखांब फेडेरेशन ऑफ यूएसएकडून चिन्मय पाटणकर आणि कुटुंबीय, राहुल जोशी, महेश वाणी आणि नीरज नरगुंड यांनी शिव जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सुरेख कार्यक्रमाला राज्याचे मंत्री आणि अन्य सन्माननीय अतिथी यांनी स्वतः किंवा ऑनलाईन उपस्थिती लावली. या कार्यक्रमात न्यू जर्सी येथील मल्लखांब संघानी डोळ्याचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली. अमेरिकेतील हिम वादळाला न जुमानता कनेक्टिकटहून २ ते ३ घंटे प्रवास करून या मावळ्यांनी न्यू जर्सीचा गड जिंकला आणि उपस्थित आणि लाईव्ह वेबकास्टिंगद्वारे बघणार्‍या प्रेक्षकांची मनेसुद्धा !