१ ते १० मार्च या कालावधीत विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ८ मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार 

मुंबई – विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत होणार आहे. ८ मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून ९ आणि १० मार्च या दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल. यंदाच्या अधिवेशनात अशासकीय ठराव आणि लक्षवेधी होणार नाही. सध्या पुन्हा कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने अधिवेशनाचा कार्यकाळ अल्प करावा लागला आहे. सरकारला कामकाज करायचे नसल्याने अल्प काळ अधिवेशन घेणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात होणार नाही, असे सांगितले आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळाचे कामकाज चालवले जाईल. अनेक मंत्री आणि आमदार कोरोनाबाधित असल्याने ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात न घेता पुढच्या अधिवेशनात घेतली जाणार असल्याचे समजते.