देवाप्रती पूर्ण शरणागत आणि भोळा भाव असलेले रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर !

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. प्रियांका लोटलीकर यांनी रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर यांच्याशी ‘साधनेचा प्रवास’ याविषयी साधलेला संवाद येथे दिला आहे. माघ शुक्ल पक्ष अष्टमी (२० फेब्रुवारी) या दिवशी पू. गुंजेकरमामा यांचा तिथीनुसार वाढदिवस झाला. त्यानिमित्त २४ फेब्रुवारी या दिवशी पू. शंकर गुंजेकर यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सुचलेले भजन आणि ते करत असलेल्या प्रार्थना हा भाग पाहिला. आज या मुलाखतीचा अंतिम भाग पाहूया.

(भाग ४)

भाग ३ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/453935.html

पू. शंकर गुंजेकर

१६. रामनाथी आश्रम दर्शन !

कु. प्रियांका लोटलीकर : मामा, तुम्ही कधी रामनाथी आश्रमात आला आहात का ?

पू. शंकरमामा : पूर्वी एकदा आलो होतो.

कु. प्रियांका लोटलीकर : त्या वेळी तुम्ही आश्रम बघितला होता का ?

पू. शंकरमामा : मला रामनाथी आश्रमात पाठवण्यासाठी रामनगरच्या साधकांनी बरेच प्रयत्न केले; पण मला भीती वाटायची. आश्रमातील साधक सगळे सुशिक्षित असतात. ‘मी जंगलात आणि चिखलात काम करणारा माणूस ! मला काही तिथे जमणार नाही. मला नीट बोलायला येत नाही. मग न गेलेलेच बरे !’, असे विचार माझ्या मनात यायचे. एकदा शंकरदादांनी (श्री. शंकर नरुटे यांनी) मला सांगितले, ‘‘आज तुम्ही रामनाथीला गेला नाहीत, तर यापुढे मी तुम्हाला कधीच सांगणार नाही.’’ अशी त्यांनी बळजोरी केली.

१६ अ. सूक्ष्मातून पाहिलेल्या रामनाथी आश्रमाचे वर्णन अगदी तंतोतंत जुळणे

पू. शंकरमामा : हो. नंतर आमची मंगलही म्हणाली, ‘‘आज्ञापालन म्हणून तरी जा रे. तुला तिथे कोण खातो कि काय ? जा. आश्रम बघून ये.’’ मी तिला म्हणालो, ‘‘मला आश्रम बघायची आवश्यकता नाही. मी आश्रम बघितला आहे.’’ मग ती मला म्हणाली, ‘‘बघितला आहेस, तर सांग कसा आहे ?’’ मग मी सांगितले, ‘‘आश्रमासमोर शेती आहे, असा मार्ग आहे, असा आश्रम आहे. आश्रम वरच्या बाजूला उंच  आहे. बरोबर कि चूक ?’’ मग मंगल म्हणाली, ‘‘बरोबर, अगदी बरोबर सांगितले.’’ मग मी म्हणालो, ‘‘बरोबर सांगितले, तर कशाला येऊ ?’’

कु. प्रियांका लोटलीकर : म्हणजे तुम्ही सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात येऊन गेला होतात.

१६ आ. परात्पर गुरु डॉक्टरांचे स्थुलातून झालेले दर्शन !

१६ आ १. मंगलला रामनाथीला पोचवण्याच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात गेल्यावर एका कार्यक्रमात परात्पर गुरु डॉक्टरांचे दर्शन झाले.

१६ आ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समोर बसलो किंवा त्यांच्याकडे पाहिले, तर ते काहीतरी विचारतील; म्हणून मागे बसणे आणि त्यांच्या दृष्टीकडे न पहाणे : एका कार्यक्रमात ‘मी पुढे बसलो, तर परम पूज्य मला काहीतरी विचारतील’; म्हणून मी मागे बसलो. माझ्या अंगावरचा शर्टही चांगला नव्हता. परम पूज्यांनी माझ्याकडे बघितले, तर मी खाली बघायचो. तेव्हा माझ्या मनात ‘मी त्यांच्याकडे बघितले, तर ते मला काहीतरी विचारतील’, अशी भीती होती.

१६ आ ३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मनातील सर्व विचार समजत असल्याची आलेली अनुभूती : माझ्या मनात विचार आला, ‘आपण प्रतिदिन सूक्ष्मातून परम पूज्यांचे चरण बघतोच ना !’ त्या वेळी परम पूज्यांनी त्यांचे पाय आतमध्ये घेतले. तेव्हा माझ्या मनात आले, ‘त्यांचे पाय बाहेर असते, तर स्थुलातून बघितले असते.’ माझ्या मनात असा विचार आल्यावर परम पूज्यांनी त्यांचे दोन्ही पाय सरळ केले. कार्यक्रम संपेपर्यंत त्यांनी पाय आतमध्ये घेतलेच नाहीत. मग मनात विचार आला, ‘इथे काही विचार करायचा नाही. बाबांना (परम पूज्यांना) सगळेच कळते’, असा विचार करून शेवटी गप्प बसलो.

कु. प्रियांका लोटलीकर : म्हणजे देवाने तुमच्या मनात येणारा प्रत्येक विचार ओळखून त्याप्रमाणे इच्छापूर्ती केली. मग परम पूज्यांना भेटल्यानंतर कसे वाटले ?

१६ आ ४. परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्वांसमोर उभे करून दोन अनुभूती सांगायला सांगणे, अनुभूती सांगून होईपर्यंत हात धरून ठेवणे आणि नंतर प्रेमाने मिठीत घेणे

पू. शंकरमामा : परम पूज्य म्हणाले, ‘‘तुझी अनुभूती सांगशील का ?’’ मी ‘‘हो’’ म्हणालो. मला बर्‍याच अनुभूती आल्या होत्या. परम पूज्य मला म्हणाले, ‘‘तुझ्या दोन अनुभूती सांग.’’ मी ‘‘हो’’ म्हणालो. मग ते म्हणाले, ‘‘उठून उभा रहा.’’ ते असे म्हणाल्यावर खरेतर मला भीती वाटली. ‘‘कसे सांगू ?’’ परम पूज्य म्हणाले, ‘‘समोर ये.’’ तेव्हाही मला भीती वाटली; पण आज्ञापालन म्हणून त्यांच्या समोर गेलो. परम पूज्यांनी माझा हात पकडला, मला जवळ घेतले आणि मिठी मारली. माझ्या पाठीवर हात ठेवला. मग म्हणाले, ‘‘एक अनुभूती सांग.’’ मी अनुभूती सांगेपर्यंत परम पूज्यांनी माझा हात पकडूनच ठेवला. मी अनुभूती सांगितल्यानंतर परम पूज्य भरपूर हसले. नंतर दुसरी अनुभूती सांगितली. दोन्ही अनुभूती सांगून पूर्ण होईपर्यंत परम पूज्यांनी माझा हात सोडलाच नाही.

१६ आ ५. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना ‘याच्याकडे पाहून काय वाटते ?’, असे विचारणे, साधकांनी ‘आज्ञापालन, भोळा आणि शरणागत भाव’, असे सांगणे : अनुभूती संपल्यानंतर त्यांनी तेथील साधकांना विचारले, ‘‘याच्याकडे बघून काय वाटते ? ते सांगा.’’ मग साधकांनी माझे थोडे निरीक्षण करून सांगितले, ‘‘आज्ञापालन, शरणागत आणि भोळा भाव आहे.’’ एका साधिकेने सांगितले, ‘‘यांच्या आज्ञाचक्रावर शंकर आसन घालून बसलेला दिसत आहे.’’ परम पूज्यांनी मला विचारले, ‘‘अजून काही सांगायचे आहे का ?’’ दोन अनुभूती सांगितल्यानंतर परम पूज्यांनी पुन्हा एकदा मिठीत घेतले आणि पुन्हा पाठीवर हात ठेवला. त्यांनी बर्‍याच वेळा मला मिठीत घेतले.

१६ आ ६. मार्गदर्शन संपल्यावर परात्पर गुरु डॉक्टर खोलीपर्यंत जाणे आणि पुन्हा परत येऊन जवळ बोलावून प्रेमाने मिठीत घेणे : कार्यक्रम संपल्यानंतर परम पूज्य जातांना आम्ही आपापल्या जागेवर उठून उभे राहिलो. परम पूज्य त्यांच्या खोलीपर्यंत गेले आणि परत आले. ते म्हणाले, ‘‘शंकर, इकडे ये.’’ तेव्हा ‘मी तर माझी ओळखही करून दिली नाही किंवा माझे नावही सांगितले नाही. ते शंकरदादांना (श्री. शंकर नरुटे यांना) बोलावत असतील’, असा विचार मी केला; पण ‘परम पूज्य बोलावत असून हे कुणी जात कसे नाहीत ?’, असा मी विचार करत होतो. एवढ्यात परम पूज्य मला म्हणाले, ‘‘तुलाच बोलावतो आहे. ये इकडे.’’ तेव्हा साधकही, ‘‘तुलाच बोलावत आहेत. जा, जा’’, असे म्हणाले. मग मी पुढे गेलो. थोडा लांबच थांबलो. परम पूज्य म्हणाले, ‘‘या बाजूला ये. तिथे थांबायचे नाही’’ आणि त्यांनी पुन्हा माझ्या हाताला धरून ओढून मिठीत घेतले. त्यांनी पुन्हा माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि थोपटले. मग ‘‘कसे काय चालले आहे ?’’, असे विचारले. मी म्हणालो, ‘‘चांगले आहे. व्यवहारात राहून साधना करणे थोडे कठीण होते.’’ तेव्हा परम पूज्य म्हणाले, ‘‘होय रे, मला ठाऊक आहेे.’’

१७. गायीशी बोलल्यावर तिने तसा प्रतिसाद देणे  

कु. प्रियांका लोटलीकर : तुम्ही गायींशी किंवा प्राण्यांशीही बोलता ना ?

पू. शंकरमामा : म्हणजे आताच बोलायला आरंभ केला आहे. कुणी कुणी म्हणतात, ‘गायीला कळते, गाय बोलते.’ आमच्या घरी दुसरी एक शेजारची गाय येते. मी तिला भाकरी देतो. ‘तिला बोललेले कळते का ? बघूया’, या विचाराने मी गायीला म्हणालो, ‘मला परम पूज्यांनी बोलावले, ते तुला आवडले का ? आवडले असेल, तर सांग.’ तेव्हा ती हंबरली. मग ‘मी रामनाथीला गेलो, तर तुला आवडेल का ? आनंद वाटेल का ? तू सांग.’ तेव्हा ती पुन्हा एकदा हंबरली. असे मी तिला ४ – ५ प्रश्‍न विचारले. त्या त्या वेळी ती हंबरली. नंतर आपल्या वाटेने परत निघाली. ती पुढे गेल्यावर मी तिला म्हणालो, ‘आता सांगितलेले सगळे खरे असेल, तर तू माझ्याकडे एकदा फिरून बघ.’ तेव्हा ती एकदा फिरली आणि परत एकदा हंबरली. तेव्हा मला पटले, ‘तिला हे सगळे कळत आहे.’

१८. पू. शंकर गुंजेकर यांनी ‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी केलेले प्रयत्न !

कु. प्रियांका लोटलीकर : मामा, तुम्ही समष्टीमध्ये प्रसारात जाता ना ? काही काही साधक ज्यांच्याकडून वारंवार चुका होत असतात, म्हणजे एक-दोनदा सांगूनसुद्धा त्यांच्याकडून कृती होत नाही, त्यांना तुम्ही त्यांच्या चुकांची जाणीव कशा प्रकारे करून देता ?

पू. शंकरमामा : कुठल्याही गावी गेल्यावर प्रथम तेथील ग्रामदेवतेला आणि स्थानदेवतेला प्रार्थना करून आरंभ करतो. ज्याच्याशी बोलायचे आहे, त्याच्याशी बोलण्यापूर्वी परम पूज्यांना प्रार्थना करतो. नंतर त्या साधकांना सांगतो, ‘दिवसभर नाम घेत सेवा करायची. इतर चर्चा करायची नाही. इतर चर्चा केली, नकारात्मक विचार आले असतील आणि थोड्या वेळाने त्याची जाणीव झाली, तर ते लिहून ठेवा.’ ते साधक ‘काय झाले ?’ ते नंतर येऊन सांगतात आणि त्यासाठी कान पकडून क्षमा मागतात. तेव्हा त्यांना सांगतो, ‘‘कान पकडून देवाची क्षमा मागा. साधकही ‘आजपासून चूक व्हायला नको’, म्हणून नाक घासून प्रार्थना करतात. साधकांनी प्रयत्न चालू केले आहेत. पहिल्यापेक्षा आता चुका न्यून व्हायला लागल्या आहेत.

१९. पू, शंकर गुंजेकर यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

कु. प्रियांका लोटलीकर : मामा, तुम्हाला आणखीन काही सांगायचे आहे का ? साधकांनी कसे वागायला पाहिजे किंवा आध्यात्मिक प्रगती कशी केली पाहिजे ? याविषयी काही सांगायचे आहे तुम्हाला ?

१९ अ. साधक कृती वरवरच्या करत असून कुठलीही गोष्ट त्यांच्या अंतर्मनापर्यंत न जाणे : ‘साधक दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचतात. सगळे नामजपादी उपायही करतात; पण मला असे वाटते, ‘ते सर्व वरवरचे होते. ते त्यांच्या अंतर्मनापर्यंत गेलेलेच नसते. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सर्व घडामोडी छापून येतात. साधक ते वाचतात आणि म्हणतात, ‘‘अरेरे, असे व्हायला नको होते.’’ मला वाटते, ‘ते वरवरचेच बोलतात. अंतर्मनाने ते स्वीकारलेलेच नसते आणि त्यांना त्याची खंतच वाटत नाही. हा केवळ दिखाऊपणा आहे. तुमच्या मनाला खंत वाटत नाही.

१९ आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्रास होऊ नये’, यासाठी तरी सर्वांनी साधना नीट मनापासून केली पाहिजे ! : परम पूज्यांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) वैयक्तिक असे प्रारब्ध नाही. समष्टीवर जे काही येते, ते परम पूज्यांवर येते. आम्ही साधकांनी साधना व्यवस्थित केली नाही, तर आमच्यावर संकटे येतात आणि ती सगळी परम पूज्य झेलतात. मग त्यांना त्रास होतो. आमच्यामुळे परम पूज्य भिंतीचा आधार घेऊन चालतात. बाबांना त्रास झाला, तर साधकांच्या मनाला लागत नाही का ? मग बाबांच्या जिवावर मुलांनी कसेही वागायचे, कसेही करायचे ? तुम्हाला काहीच वाटत नाही. परम पूज्य आपले सगळे त्रास घेतात आणि आपल्याला आनंद देतात. आपण गांभीर्याने साधना केली, तर परम पूज्यांना सोपे होईल.’

कु. प्रियांका लोटलीकर : पू. शंकरमामा, तुम्ही इथे आलात. तुमच्याकडून आम्हाला अमूल्य अशा गोष्टी शिकायला मिळाल्या. साधकांना अमूल्य, असे मार्गदर्शनही मिळाले. त्यामुळे आम्ही आपल्या चरणी कृतज्ञ आहोत आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून आता आपण थांबूया. नमस्कार !

(समाप्त)