परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून रामनाथी आश्रमातील डॉ. रूपाली भाटकार यांना शिकायला मिळालेली सूत्रे

साधकांवर कृपेचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘मला जर कुणी विचारले, ‘माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंददायी क्षण कोणता ?’, तर त्याचे उत्तर असेल, ‘वर्ष १९९२ मध्ये झालेली परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांची भेट !’ हा अविस्मरणीय क्षण माझ्या हृदयात मी जतन करून ठेवला आहे. मला त्यांचा सत्संग लाभला, यासाठी मी स्वतःला पुष्कळ भाग्यवान समजते. त्यांच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. आज मी जी काही आहे, ती केवळ त्यांच्यामुळेच आहे. मला तर वाटते, ‘या जन्मापासून नव्हे, तर गेल्या अनेक जन्मांपासून ते मला मार्गदर्शन करत आहेत आणि माझ्यावर प्रीतीचा वर्षाव करत आहेत. माझे आई-वडील, बहीण-भाऊ, मित्र-मैत्रिणी, शिक्षक आणि समाजातील लोक यांच्या माध्यमातून तेच माझी काळजी घेत आहेत.’

त्यांच्या असंख्य दैवी गुणांपैकी काही गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. त्यांच्यातील हे सर्व दैवी गुण मला स्वतःमध्ये आणता आले नसले, तरी या लेखातून साधकांना प्रीतीचा सागर असलेल्या आपल्या गुरूंची महानता समजण्यास साहाय्य होईल.

डॉ. रूपाली भाटकार

१. सर्वांवर निरपेक्ष प्रेम (प्रीती) करणे

परात्पर गुरु डॉक्टर म्हणजे प्रीतीचा सागर आहेत. ते मनुष्य, प्राणी, पक्षी आणि प्रत्येक सजीव-निर्जीव वस्तू यांच्यावर प्रेम करतात. त्यांच्या मेहुण्याच्या घरी पाळीव कुत्रा होता. ते त्या कुत्र्याशी बोलत असत. तो कुत्राही त्यांच्याजवळ जात असे. ते त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत आणि कुत्र्याच्या डोळ्यांत पाहून बोलत. तो कुत्राही परात्पर गुरु डॉक्टरांना प्रेमाने प्रतिसाद देत असे.

२. क्षमाशीलता

एका साधकामध्ये पुष्कळ स्वभावदोष आणि अहं होता. त्यामुळे त्याचे वागणे विचित्र आणि असामान्य होते. असे असूनही त्याच्यातील ईश्‍वरप्राप्तीची तळमळ पाहून परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याला त्याच्या मानसिक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आणि त्याची साधना होण्यासाठी साहाय्य केले. त्या साधकाने परात्पर गुरु डॉक्टरांशी अयोग्य वर्तन केले, तरीही त्यांनी त्या साधकाविषयी मनात राग धरला नाही.

३. प्रत्येक कृती परिपूर्ण करणे

ऐहिक जीवनातील कोणतीही गोष्ट असो, उदा. कपडे धुणे, ते दोरीवर वाळत घालणे, कपडे पेटीत (‘सुटकेस’मध्ये) ठेवणे, जेवण वाढून घेणे, मांडणीत चपला ठेवणे इत्यादी अथवा आध्यात्मिक, उदा. अध्यात्माविषयी लिखाण करणे, वस्तूंचे जतन करणे, आध्यात्मिक लिखाण निवडणे, या सर्व गोष्टी ते अतिशय परिपूर्ण करतात.

४. साधकांकडून विविध गोष्टींचा सूक्ष्मातून अभ्यास करवून घेणे

‘साधकांना भेटणे, समाजातील संतांची भेट घेणे, मंदिरांना भेटी देणे किंवा सत्संगांसाठी जाणे’, यांसाठी आम्ही पूर्वी त्यांच्या समवेत जात असू. त्या वेळी प्रत्येक ठिकाणी गेल्यावर ते आम्हाला तेथील वस्तू, सभोवतालचा परिसर, लोक इत्यादींचे सूक्ष्म परीक्षण करण्यास सांगत. सूक्ष्मातील स्पंदनांचा आणि आध्यात्मिक परिमाणांचा ते आमच्याकडून अभ्यास करवून घेत असत. अशा प्रकारचा अभ्यास अन्य कोणत्याही आध्यात्मिक संस्थांमध्ये होत नसेल.

५. स्वावलंबी

विविध ठिकाणी अभ्यासवर्ग घेण्यासाठी ते भ्रमण करत असत. त्या वेळी जेवणाचे ताट धुणे, कपडे धुणे इत्यादी स्वतःची कामे ते स्वतःच करत.

६. वेळेचा योग्य वापर करणे

साधकांना मार्गदर्शन करणे, आध्यात्मिक लिखाणाचे वाचन करणे, साधकांना साहाय्य करण्याच्या दृष्टीने नियोजन करणे इत्यादी प्रत्येक गोष्टीचे त्यांनी नियोजन केलेले असते. ‘दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाणे, अनावश्यक गप्पा मारणे’, यांसारख्या गोष्टींत ते जराही वेळ घालवत नसत.

७. अन्नाचा एक कणही वाया न घालवणे

पूर्वी ते स्वतःच्या घरी रहात होते. तेव्हा ते शीतकपाटातील शिळे अन्न प्रथम ग्रहण करत असत आणि नंतर ताजे अन्न ग्रहण करत. अन्नाचा एकही कण ते वाया घालवत नाहीत. त्यांनी ताटात अन्नाचा कण टाकलेला मी कधीही पाहिला नाही.

८. पाणी आणि वीज यांचा आवश्यक तेवढाच वापर करणे

‘येणार्‍या आपत्काळात लोकांना पाणी मिळावे’, यासाठी ते पाण्याची बचत करतात आणि न्यूनतम पाणी वापरून अंघोळ करतात. पुष्कळ उन्हाळा असला, तरीही ते वातानुकूलन यंत्र वापरत नाहीत. ते खोलीतून बाहेर जातांना प्रत्येक वेळी दिवे आणि पंखे बंद करतात.

९. इतरांना देण्याची वृत्ती

एखाद्या साधकाने त्यांना एखादा पदार्थ दिला, तर तो समवेत असलेल्या साधकांना ते देतात. त्यांना आवडणारी वस्तूही ते इतरांना देतात, उदा. कुणीतरी त्यांच्यासाठी चॉकलेट्स आणली असतील, तर स्वतः न घेता ते त्यांनाच खायला देतात. अगदी क्वचितच ते स्वतः खातात. केवळ एवढेच नाही, तर अध्यात्मातील ज्ञानही ते इतरांना वाटण्यास सांगतात. ते समाजातील संत अथवा अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती यांना भेटतात. तेव्हा त्यांच्याकडून मिळालेले ज्ञान ते लिहून घेतात आणि अभ्यासवर्गात आम्हा साधकांना शिकवतात.

१०. प्रत्येक वेळी ते कृतज्ञता व्यक्त करून मगच प्रसाद-महाप्रसाद ग्रहण करतात.

११. साधकांना अध्यात्म शिकवणे

अध्यात्मप्रसारासाठी ते भ्रमण करत. त्या वेळी ते स्वतःसमवेत साधकांनाही नेत असत. यामागे ‘साधकांना अध्यात्म शिकवणे’, हाच त्यांचा हेतू असे. ‘आपले जीवन व्यावहारिक आणि आध्यात्मिक असे वेगळे करू शकत नाही. ते दोन्ही स्तरांवर जगले पाहिजे’, अशी त्यांची शिकवण आहे.

१२. घडणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारण्यास शिकवणे

व्यावहारिक जगात ‘माझ्या किंवा माझ्या नातेवाइकांच्याच संदर्भात असे का घडते ?’, असा विचार करून लोक दुःखी असतात. लोकांच्या मनात त्याविषयी नकारात्मकता असते. परात्पर गुरु डॉक्टर मात्र जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट स्वीकारण्यास आणि त्यावर योग्य मार्ग काढण्यास शिकवतात.

१३. शिकण्याची वृत्ती

परात्पर गुरु डॉक्टर सतत शिकण्याच्या स्थितीत असतात. यज्ञ करणारे पुरोहित, भविष्य कथन करणारेे ज्योतिषी, गायक आणि संगीतकार, वास्तुविशारद यांच्याकडून ते नेहमीच शिकत असतात. ते सर्वज्ञ असूनही ‘मला काही ठाऊक नाही’, याच स्थितीत असतात. वयाने लहान असो किंवा मोठे, ते इतरांकडून सतत शिकत असतात. दत्तगुरूंनी २४ गुरु केले आणि त्यांच्याकडून ते शिकले. परात्पर गुरु डॉक्टर दत्तगुरूंप्रमाणेच आहेत.

१४. ‘नामजप करत व्यावहारिक कर्तव्ये पार पाडली, तर त्यातच तुमची साधना होणार’, असे शिकवणे

माझी नोकरी, आई-वडील, बहीण-भाऊ, माझे घर यांसंदर्भातील कर्तव्यांपासून परावृत्त होण्यासाठी त्यांनी मला कधीच प्रोत्साहित केले नाही. उलट ‘नामजप करत व्यावहारिक कर्तव्ये पार पाडली, तर त्यातच तुमची साधनाच होणार’, असे त्यांनी शिकवले.

(क्रमश: उद्याच्या अंकात)

– डॉ. रूपाली भाटकार, गोवा (ऑगस्ट २०२०)