मडगाव, २१ फेब्रुवारी (वार्ता.) – बाणावली येथे १६ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या ‘धिर्यो’च्या (बैलांची झुंज) आयोजनावरून कोलवा पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले. पोलिसांनी ‘पिपल फॉर अॅनिमल्स’ (पी.एफ्.ए.) या प्राणीप्रेमी संघटनेच्या तक्रारीची नोंद घेऊन ही कारवाई केली. विशेष म्हणजे या प्रकरणी दोन्ही संशयितांना कह्यात घेऊन त्यांची २० मिनिटांत सुटका करण्यात आली. यामुळे पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
१६ फेब्रुवारी या दिवशी बाणावली येथील एका शेतात ‘धिर्यो’चे आयोजन करण्यात आले. या ‘धिर्यो’मध्ये एक बैल गंभीररित्या घायाळ झाला होता किंवा मरणासन्न अवस्थेत पडला होता. या प्रकरणी ‘पी.एफ्.ए.’च्या अध्यक्षा तथा अधिवक्त्या नॉर्मा आल्वारीस यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी पोलिसांकडे लेखी तक्रार नोंदवून याविषयी अन्वेषण करून संबंधितांच्या विरोधात ‘प्रथमदर्शनी अहवाल’ (एफ्.आय.आर्.) नोंद करण्याची मागणी केली. कोलवा पोलीस ठाण्यात चालू वर्षी एकूण सुमारे ३० ‘धिर्यों’चे आयोजन करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. कोलवा पोलिसांनी या प्रकरणी २० फेब्रुवारीच्या रात्री १.३० वाजता ‘प्राणी अत्याचार प्रतिबंध’ कायद्याखाली ‘वीर’ नावाच्या बैलाचा मालक जॉन फर्नांडिस आणि प्रतिस्पर्धी बैल ‘रामू’ याचा मालक विनय न्यूटन फर्नांडिस यांना कह्यात घेतले आणि त्यांची लगेच रात्री १.५१ वाजता ५ सहस्र रुपयांच्या हमीवर सुटका करण्यात आली. या वेळी संशयितांच्या विरोधात मनोरंजनासाठी प्राण्यांच्या झुंजीचे आयोजन करणे आदी कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले.