राज्यातील २८ जिल्ह्यांना अवेळी पावसाची चेतावणी; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यांवर अवकाळीचे सावट !

संभाजीनगर – राज्यातील २८ जिल्ह्यांना गारपीट आणि पाऊस पडण्याची चेतावणी देण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी या दिवशी नागपूर शहर, भंडारा, बाळापूर (जिल्हा अकोला), खामगाव (जिल्हा बुलडाणा) परिसरात हलका पाऊस झाला. हवामानशास्त्र विभागानुसार चक्राकार वारे आणि पूर्वेकडील वारे यांमुळे या चक्रवात स्थितीपासून उत्तर कर्नाटकपर्यंत अल्प दाबाचा पट्टा सक्रीय आहे, तसेच खंडित वार्‍यांचे प्रवाह, बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा आणि उत्तर भारताकडून येणारे थंड वारे यांमुळे अवेळी पावसास पोषक वातावरण आहे.

पुणे वेधशाळेने मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथे १९ फेब्रुवारी या दिवशी मेघगर्जनेसह पावसाची चेतावणी दिली आहे. जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी भागात १७ फेब्रुवारी या दिवशी गारांसह पाऊस झाला. करमाडजवळ लाडसावंगीतही रात्री गारपीट झाली. परभणी जिल्ह्यात परभणी, पोखर्णी, दैठणा इत्यादी भागांत मुसळधार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातही १७ आणि १८ फेब्रुवारी या दिवशी पाऊस पडला.

धुळे, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट लागू !

कुलाबा वेधशाळेने राज्यातील २९ जिल्ह्यांना गारपिटीसह पावसाची चेतावणी दिली आहे. धुळे, जळगाव, नाशिक, संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, तर नंदुरबार, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे अवकाळी पावसामुळे रब्बी पिके आणि फळ झाडांची हानी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कासेगाव (तालुका पंढरपूर) परिसरात १८ फेब्रुवारीच्या पहाटे अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे द्राक्ष बागांना काही प्रमाणात फटका बसला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार १७ फेब्रुवारीच्या रात्री तालुक्याच्या अनेक भागांत वादळी वारे सुटले, तसेच पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. यामुळे रब्बी पिकांसह फळबागांचीही हानी झाली आहे.

जव्हार (जिल्हा पालघर) येथे विजेच्या कडकडाटांसह गारांचा पाऊस

ठाणे, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – जव्हारमध्ये १८ फेब्रुवारी या दिवशी दुपारी ४ च्या सुमारास अवकाळी पावसाला विजेच्या कडकडाटांसह आरंभ झाला. दुपारपासून शहरात पावसाचे वातावरण होते. जवळपास ४५ मिनिटे पाऊस धो धो बरसला, त्यात काही वेळ गारांचाही मारा झाला. या वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसाने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. आंबा आणि काजू यांना आलेला मोहोर गळला आहे.

पनवेल येथे रात्री ७.३० वाजता सोसाट्याच्या वार्‍यांसह मुसळधार पाऊस पडला.

ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट म्हणजे काय ?

कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. आवश्यकता असेल आणि महत्त्वाचे काम असेल, तरच घराबाहेर पडा, असा संदेश जनतेला देण्यासाठी ऑरेंज अलर्ट घोषित केला जातो. पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या पालटामुळे संकट ओढवू शकते. दैनंदिन कामे रखडू शकतात. जनतेने सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट लागू करण्यात येतो.