तरुणांनो, हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात घ्या !

१४ फेब्रुवारी २०२१ या दिवशी ‘व्हॅलेंटाईन डे’ आहे. त्या निमित्ताने…

श्री. अतुल दिघे

१. हिंदु धर्मात प्रेमाला निषिद्ध मानलेले नसणे

हिंदु धर्मात प्रेमाला किंवा प्रेम व्यक्त करण्याला कधीही निषिद्ध मानलेले नाही. हिंदु धर्मात मानसिक स्तराच्या प्रेमाच्याही पुढे असलेल्या आध्यात्मिक स्तराच्या (निरपेक्ष प्रेमाला) श्रेष्ठ मानले जाते. प्रेमभाव असल्याविना प्रीती हा गुण विकसित करता येत नाही; मग हिंदु धर्म प्रेमाचा निषेध कसा करणार ? (हिंदूंचा विरोध व्हॅलेंटाईन डेसारख्या असभ्य, असांस्कृतिक आणि असामाजिक प्रथेला आहे. असे डे साजरा केल्याविनाही मनुष्य आवश्यक ते साध्य करू शकतो. व्हॅलेंटाईन डे साजरा करून समाजात अनैतिकता पसरते, स्त्रियांचे शील भ्रष्ट होते, त्यांच्यावर अत्याचार होतात. यासाठी लोकांना त्याची जाणीव करून देणे, त्यांचे प्रबोधन करणे आणि अशा कुप्रथा थांबवणे, हेच स्वाभिमानी हिंदूंचे कर्तव्य आहे. – संकलक)

२. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करून प्रेम आपोआप वाढत नाही !

केवळ असे दिवस साजरे केल्याने आपल्यात प्रेम आणि मैत्री आपोआप कशी काय वाढणार ? आपल्यात प्रेमभाव वाढण्यासाठी प्रतिदिन प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठे काही काळाने आपल्यात प्रेमभाव निर्माण होतो.

३. ‘व्हॅलेंटाईन डे’लाच प्रेम व्यक्त करता येते, असे नाही !

मुला-मुलींचे एकमेकांवर प्रेम होणे नैसर्गिक आहे. व्हॅलेंटाईन डे नसला, तरीही ते एकमेकांविषयीचे प्रेम व्यक्त करू शकतात. व्हॅलेंटाईन डेला मुला-मुलींनी प्रेम व्यक्त केले नाही, तर पुढे कधीही ते प्रेम व्यक्त करू शकणार नाहीत, असे होऊ शकत नाही.

४. व्हॅलेंटाईन डे भारतात साजरा होत नव्हता; तेव्हा मुला-मुलींमध्ये प्रेम नसायचे का ?

५. हिंदूंच्या कृतीतूनच प्रेम व्यक्त होत असल्याने त्यांना पाश्‍चात्त्यांप्रमाणे ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’, असे सतत सांगण्याची आवश्यकता नसणे

पाश्‍चात्त्य विचारसरणीत नवरा, बायको आणि मुले एकमेकांना मी तुझ्यावर प्रेम करतो (I love you), असे सतत सांगतात. कुणी घराबाहेर निघत असेल, तेव्हा पापी घेऊन वरील वाक्य म्हणतात. मुळातच पाश्‍चात्त्यांमध्ये स्वकेंद्रितपणा आणि स्वार्थीपणा अधिक असल्यामुळे त्यांना असे वाक्य सतत म्हणून स्वतःचे प्रेम सिद्ध करावे लागते. याउलट हिंदु धर्मात त्याग, व्यापकत्व आणि प्रीती कशी वाढवावी ? हे शिकवले गेल्यामुळे हिंदु माता, पिता आणि मुले यांना एकमेकांना ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ (I love you), असे सतत सांगावे लागत नाही. त्यांच्या कृतीतूनच सर्व काही व्यक्त होत असते.

६. हिंदु युवक-युवतींनो, हे लक्षात घ्या !

६ अ. आपले यौवन देशासाठी अर्पण करणार्‍या क्रांतीकारकांना विसरू नका ! : आपली संस्कृती सांगते की, व्यक्तीपेक्षा कुटुंब, कुटुंबापेक्षा समाज आणि समाजापेक्षा देश अधिक महत्त्वाचा आहे. हाच दृष्टीकोन ठेवून भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांसारख्या अनेक विरांनी आपले यौवन अर्पण केले आणि त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. व्हॅलेंटाईनचा प्रेमाचा संदेश मानून ते लग्न करून बसले असते, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते का ?

६ आ. समाजव्यवस्था मोडकळीस आणणारा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या मागे आपण का लागलो आहोत ? याचा विचार करा ! : ‘इंटरनॅशनल बिझिनेस टाइम’ या इ-दैनिकानुसार ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी ‘सुसाईड हेल्पलाईन’ला सर्वांत जास्त दूरभाष येतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मनाप्रमाणे प्रेम न मिळाल्याने निर्माण होणारा एकाकीपणा आणि भग्न मानसिकता ही त्यामागची कारणे आहेत. असा हा समाजव्यवस्था मोडकळीस आणणारा आणि अनेकांना निराशेत घेऊन जाणारा दिवस साजरा करण्यामागे आपण का लागलो आहोत ? आपल्याकडे एक म्हण आहे, पुढच्यास ठेच, मागचा शहाणा. आपण पाश्‍चात्त्यांच्या चुकांतून शिकणार आहोत कि नाही ?

६ इ. हिंदु धर्माच्या आचरणाने जन्म-मृत्यूच्या पलीकडे जाता येते, हे लक्षात घेऊन धर्माचरण करा ! : व्हॅलेंटाईन डे आणि तशा प्रकारचे इतर डे पाश्‍चात्त्यांनी निर्माण केलेल्या कुप्रथा आहेत. आपण हिंदु धर्माचा अभ्यास करून त्याचे आचरण केल्यास केवळ एकच दिवस नव्हे, तर आपल्याला अनेक जन्म आणि जन्ममृत्यूच्या पलीकडे जाता येते. जे सुख आपल्याला अशा प्रकारचे डे साजरा करून मिळते; त्या सुखाच्याही पुढचा आनंद मिळवून देण्याची क्षमता हिंदु धर्माच्या शिकवणीत आहे; म्हणूनच व्हॅलेंटाईन डे सारखा दिवस साजरा करण्यापेक्षा हिंदु धर्माचे योग्य शिक्षण घेऊन धर्माचरण करा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही तसेच करायला उद्युक्त करा. लक्षात ठेवा, जो धर्माचे पालन करतो, त्याचे धर्म पालन (पोषण) करतो.

संकलक : श्री. अतुल दिघे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (वर्ष २०१४)