समाजात दहशत पसरवणार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
मलकापूर (बुलढाणा) – येथील नगरपालिकेच्या ऊर्दू शाळेत १० फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते हाजी रसीद खां यांचा ७१ वा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. या वेळी वाढदिवसानिमित्त केक कापण्यासाठी त्यांच्या काही हौशी कार्यकर्त्यांनी असंख्य तलवारी आणल्या होत्या. वाढदिवस साजरा करतांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तलवारी घेऊन नाच केला. (हाजी रसीद यांच्या समर्थकांनी उघडपणे तलवारी घेऊन नाच करणे, हा समाजात दहशत पसरवण्याचा प्रकार आहे. हा उघडपणे केलेला एकप्रकारे गुन्हाच आहे. असे असतांना पोलीस अशा घटना घडल्यावर इतरांवर जशी तत्परतेने कारवाई करतात, तशी हाजी आणि त्यांच्या समर्थक यांच्यावर का करत नाहीत ? – संपादक)
या व्हिडिओमध्ये विद्यमान नगराध्यक्ष हरीश रावळ यांसह इतर पदाधिकारी पहायला मिळत आहेत. हा वाढदिवस साजरा करतांना हाजी यांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतराचे पालन केले नाही, तसेच कुणाच्याही तोंडवळ्यावर ‘मास्क’ नाही. एका लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला अशा प्रकारे तलवारी आणून त्यासमवेत नाच केल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकते. (पोलिसांनी राजकीय दबावाला बळी न पडता संबंधित हाजी रसीद आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. – संपादक)