न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी सलमान खान याने क्षमा मागितली

असे खोटे बोलणारे आरोपी आणि अविश्‍वासार्ह अभिनेते म्हणे तरुण पिढीचे आदर्श !

मुंबई – काळवीट हत्या प्रकरणात अभिनेता सलमान खान याने चुकीची माहिती देऊन न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी सरकारी अधिवक्ता भवानीसिंग भाटी यांनी केली होती. या प्रकरणात गुन्हा नोंद होण्याच्या भीतीने सलमान खान याने न्यायालयाची क्षमा मागितली आहे.

सलमान खानला वर्ष १९९८ मध्ये काळवीट हत्या प्रकरणी ६ दिवस कारागृहात रहावे लागले होते. त्यानंतर या प्रकरणी २००३ मध्ये सलमान खान याने न्यायालयात त्याचा शस्त्र परवाना हरवल्याचे सांगितले होते. त्याने वांद्रे पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली होती; मात्र सलमानचा शस्त्र परवाना हरवला नसून, नूतनीकरणासाठी पाठवण्यात आलेला असल्याची माहिती न्यायालयाला कळली होती. त्यानंतर सरकारी अधिवक्ता भवानीसिंग भाटी यांनी सलमानविरोधात न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली होती.

त्यावर आता सलमानचे अधिवक्ता सारस्वत यांनी न्यायालयाला सांगितले आहे की, सलमानने शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी दिल्याचे तो विसरल्याने २००३ या वर्षी न्यायालयात चुकीचे प्रतिज्ञापत्र दिले होते आणि यासाठी सलमानला क्षमा करावी, अशी मागणी त्यांनी सलमानच्या वतीने न्यायालयाकडे केली आहे.