१. सनातन संस्थेवर होणार्या आरोपांविषयी कुणी प्रश्न विचारल्यास त्यांना संस्थेचे निर्दोषत्व पटवून देण्यात उणा पडणे
‘मी कोल्हापूर येथे कायदेविषयक (LLB) पदवीचे शिक्षण घेत आहे. मी महाविद्यालयात आणि वसतीगृहामध्ये असतांना मला बरेच लोक सनातन संस्थेवर होणार्या आरोपांविषयी विचारायचे. मी त्यांना ‘सनातन संस्थेवर होणारे आरोप बिनबुडाचे आहेत’, असे सांगायचो. त्यांना संस्थेचे निर्दोषत्व पटवून द्यायचा प्रयत्न करायचो; परंतु मी दिलेल्या उत्तरांनी त्यांचे समाधान होत नसे. मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला उणा पडायचो.
२. ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’ला उपस्थित राहिल्यावर व्यष्टी साधनेचे महत्त्व कळणे आणि त्यानुसार प्रयत्नांना आरंभ करणे
मी ऑक्टोबर २०१८ मध्ये कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे झालेल्या ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’ला उपस्थित होतो. तिथे मला ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’, नामजपादी उपाय यांचे महत्त्व समजले. त्यानुसार मी व्यष्टी साधनेचे प्रयत्न करायला आरंभ केला.
३. साधनेला प्रारंभ केल्यानंतर कुणी सनातन संस्थेवर होणार्या आरोपांविषयी विचारल्यास परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी प्रार्थना केल्याने आरोपांच्या निरर्थकतेविषयीची सूत्रे सुचून समोरच्याला संस्थेचे निर्दोषत्व पटवून देता येणे
मी साधनेला प्रारंभ केल्यानंतर मला माझ्यामध्ये पालट जाणवायला लागला. नंतर मला कुणी सनातन संस्थेवर होणार्या आरोपांविषयी विचारले, तर मी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी प्रार्थना करत असे. त्यानंतर मी त्यांना ‘सनातन संस्था कशी निर्दोष आहे ?’, हे सांगत असे. तेव्हा मला यासंदर्भातील सूत्रे आपोआप सुचू लागली आणि मी दिलेल्या उत्तरांनी समोरच्यांना सनातन संस्थेचे निर्दोषत्व पटू लागले. या माध्यमातून मला साधना आणि शरणागतभाव यांची पुष्कळ मोठी अनुभूती आली.’
– श्री. शुभम शिवराम देसाई, डेगवे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग. (२६.१२.२०१८)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |