साधना करू लागल्यावर साधनेत येणार्‍या अडचणी श्रीकृष्णाच्या कृपेमुळे दूर होणे आणि स्वभावातही पालट होणे

श्री. धीरज सुभाष भोळे

१. ‘श्रीकृष्ण साधना करवून घेत आहे’, असे अनुभवणे

‘२८.२.२०१९ या दिवशी माझ्या जीवनात पालट झाला. या दिवशी यावल गावात हिंदु जनजागृती समितीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन केले होते. मी त्या सभेला गेलो होतो. तेथे माझी दोन साधकांशी भेट झाली. नंतर ते आमच्या घरी धर्मशिक्षणवर्ग घेण्यासाठी येऊ लागले. त्यांनी आम्हाला साधनेचे महत्त्व सांगितले. त्यानंतर ‘श्रीकृष्ण आमच्याकडून साधना करवून घेत आहे’, असे मला अनुभवायला मिळाले.

२. भगवंताच्या कृपेमुळे भावाचा साधनेला असलेला विरोध न्यून होणे

मी धर्मशिक्षणवर्गाला जात होतो. तेव्हा माझा मोठा भाऊ विरोध करत होता; कारण भावाचे म्हणणे होते, ‘आपण व्यापारी असल्यामुळे प्रथम आपल्या व्यवसायाकडे लक्ष देणे हे आपले काम आहे.’ असे असूनही मी धर्मशिक्षणवर्गाला जात होतो. भगवंत माझ्याकडून साधना करून घेत होता आणि भावाचा विरोध न्यून होत गेला. आता तो मला सांगतो ‘तू धर्मशिक्षणवर्गाला जात जा.’ त्यामुळे भगवंत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होते.

३. प्रत्येक सेवेच्या वेळी अडचण येणे, तरी श्रीकृष्णाच्या कृपेमुळे सेवेला वेळेत जाता येणे

आमच्या यावल गावाजवळ असलेल्या ‘विरावली’ गावात प्रवचन होते. त्या सेवेसाठी मला जायचे होते; परंतु त्या दिवशी आमच्या गोशाळेतील कामगार न आल्यामुळे मला गायींना चरायला घेऊन जावे लागले. तेव्हा मोठ्या भावाला अधिकोषात (बँकेत) महत्त्वाचे काम होते. ‘आता मला सेवेला जायला मिळणार नाही’, असे मला वाटत होते, तरी सेवेला जाण्याची इच्छा होती. म्हणून मी सकाळपासून श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करत होतो, ‘हे भगवंता, मला विरावलीला सेवेला जायची पुष्कळ इच्छा आहे; परंतु तू बघत आहेस गोशाळेची सेवा करणेही महत्त्वाचे आहे, तरी तुला जसे अपेक्षित आहे, तसे तू माझ्याकडून करून घे.’ माझा दिवसभर नामजप चालू असल्यामुळे भगवंताने माझ्यावर कृपा केली. देवाने आमच्याकडील दुसर्‍या कामगाराला कामावर येण्याची बुद्धी दिली आणि मला वेळेत सेवेसाठी जाता आले. त्यामुळे वेळोवेळी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होत होती.

मला प्रत्येक सेवेच्या वेळी काहीतरी अडचण यायची; म्हणून मी सहसाधकांना सांगायचो ‘मला सेवेला यायला जमणार नाही.’ तेव्हा ते म्हणायचे, ‘तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी असेच सांगता आणि श्रीकृष्ण तुम्हाला वेळेत सेवेसाठी पाठवतो.’

४. साधनेमुळे स्वतःत झालेले पालट पाहून स्वतःवर विश्‍वास न बसणे

मी साधनेत आलो आणि माझ्या स्वभावात पुष्कळ पालट झाला. हे पालट श्रीकृष्णानेच करवून घेतले. आधी मी दुकानातून घरी आल्यावर दूरदर्शनवरील कार्यक्रम बघायचो आणि पत्नीशी लहान लहान गोष्टींवरून भांडायचो. तेव्हा मला घरात आल्यावर ‘मी राजा आणि घरातील सदस्य माझी प्रजा’, असे वाटायचे. त्यांनी मी सांगेन तेच करायला हवे आणि त्यांनी मला घरातील कोणतीच कामे सांगू नये. मी जेवण झाल्यावर ताट तेथेच ठेवून दूरदर्शन पहात बसायचो. श्रीकृष्णाने मला साधनेत आणले आणि माझे दूरदर्शन पहाणे बंद झाले. आता मी घरात आल्यावर नामजप करतो, तसेच पत्नीला ‘घरात काही काम आहे का ?’, असे विचारून तिला साहाय्य करतो. जेवण झाल्यावर सर्व भांडी स्वतः उचलून ठेवतो आणि तिला सांगतो ‘‘तू स्वयंपाक केला आहेस, तरी आता काही वेळ बस. मी भांडी उचलतो आणि झाडून घेतो.’’ हा सर्व पालट बघून माझाच माझ्यावर विश्‍वास बसत नाही.

‘माझ्या जीवनात गुरुदेव पुष्कळ विलंबाने आले’, याची मला खंत वाटते; परंतु माझ्या प्रारब्धामुळे मी कुठेतरी अल्प पडलो. त्यामुळे साधनेत येण्यास विलंब झाला. तरी मला भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेत आणून माझ्यात पालट करून घेतले. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !’

– श्री. धीरज सुभाष भोळे, यावल, जिल्हा जळगाव. (१६.९.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक